फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स..... (जय हो...!)

*जय हो......!*
~~~~~~~~   
       फिनिक्स माॅल ऑफ द मिलेनियल्स, वाकड, पुणे या सुमारे 10-12 एकरात विस्तारित असलेल्या, सध्या सहा मजली असलेल्या अवाढव्य-अवाढव्यतम अशा अत्याधुनिक "परिसरा"तील आयनॉक्स मध्ये काल दि.16 मार्च 2024 ला 'सैतान' (की शैतान?) नावाचा तद्दन फालतू व कल्पनादारिद्र्याचा उत्कृष्ट उदाहरण/नमुना(?) असलेला सिनेमा "देखला". (आणि सारीडाॅनच्या टेबलेट्सची विक्री वाढवण्यात थोडासा हातभार लावला.)
     या अवाढव्यतम माॅल मधील अवर्णनीय(?) गर्दी 'देखून' मला कैदेतून सुटलेल्या बंदीवानांचे वर्तन कसे असू शकेल याचा, 'याचि देही याचि डोळा' स्वानुभव घेता आला. 
      मी तीस वर्षे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात वरीष्ठ राजपत्रित अधिकारी म्हणून कार्यरत असताना मुंबई, पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, औरंगाबाद(?), नाशिक, नागपूर सारख्या महा ते महत्तम नागरी भागातही राहण्या/असण्याचा थोडाफार अनुभव घेतला आहे. या अशा अनुभवाच्या असहनीय मनस्तापाला मी पेलू शकण्यास स्वतःला असमर्थ जाणून, माझ्या निवृत्तीनंतर, सध्या गेली अकरा वर्षे, मी माझ्या छोट्याशा खेडेगावात (झाडीपट्टीतील जन्मगावी) राहतो आहे. कन्या आणि जावई पुण्यात असल्याने सध्या पुण्यातील वास्तव्याचा अल्पकालिक मनस्ताप(?) झेलतो(!) आहे. 
       वर उल्लेखित अवाढव्यतम माॅल मधील बेफाम व बेफाट अशा बेमुर्वत गर्दीचा स्वानुभव मला एकूणच मानवजातीच्या भवितव्याबाबत साशंक करून गेला. माझा हा स्वानुभव मला, माझ्या दृष्टीने अस्वाभाविक व अनैसर्गिक वाटत असला तरी कदाचित तो आजचा स्वाभाविक व क्रमप्राप्त असा जग-स्वभाव असावा आणि या व्यामिश्रतम माहौलचे आकलन करताना मी काहीसा चुकतही असेन! (काय म्हणता? 😇)
      .... पण नुकताच होऊन गेलेला "कोरोनाकाळ" मला माझ्या गावात कणभरही जाणवला(!) नाही. उलट संपूर्ण पृथ्वीवरील नागरी भागातील या (कर्दन)काळाच्या सैतानी(?) सावटा(?)चे स्मरणचित्र मात्र, मलाच नव्हे तर कोणालाच विसरताच येत नाही. ही #कटूतम-वस्तुस्थिती काय दर्शविते, याचे प्रत्येक मानवाने स्वतःच आपापले आकलन मांडावे, असे मला आवर्जून नमूद करावेसे वाटते. 
असो. जय हो.......!
😇😊😆😅😂
¤
@ॲड.लखनसिंह कटरे.
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया.
(पुणे/17.03.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन