एक शोकांतिकाच (?)
एक शोकांतिकाच (!)
------------------------------
(निसर्ग-शरण)आनंद यादव यांच्या संपादकत्वाखाली पुण्याहून एकेकाळी प्रकाशित होत असलेल्या तत्कालीन मराठी मासिक, "विचार भारती" च्या मार्च/एप्रिल 1988 च्या "ग्रामीण साहित्य विशेषांका"त माझा एक लेख "नवोदित ग्रामीण साहित्यिक आणि अभिव्यक्ती : काही विचार" प्रकाशित करण्यात आलेला होता. त्यात मी ग्रामीण साहित्यिकांच्या अभिव्यक्ती आणि लिखाणाची तुलना अस्पर्शीत, अनिर्बंध अशा अरण्यात नैसर्गिक वाढ होणा-या वृक्षाशी केली होती, तर बहुतेक "शहरी(?) साहित्य" हे बोनसाय वृक्षासारखे असते असेही सोदाहरण स्पष्ट केले होते. मी आजही आपल्या या मतावर कायम आहे, आणि म्हणूनच मला माझ्या ग्रामीण-स्तर(?)-अभिव्यक्तीची बिलकुल लाज(!) वाटत नाही. मला माझ्या अभिव्यक्ती बद्दल कोणताही न्यूनगंड वा भयगंड नाही. माझ्या गावापासून अगदी दोन किमी वर महाकवी भवभूतीचे गाव, पदमपूर, आहे आणि हा भवभूती आमचा, झाडीपट्टीचा, साहित्यिक-पूर्वज आहे. ज्याने आपल्या अस्सल अभिव्यक्तीशी कोणतीही तडजोड न करता भविष्य-काळावर त्याच्या योग्यतेचे मोजमाप सोपवले. आणि आज आपण भवभूतीच्या आत्मानुभूतिची व आत्मविश्वासाची प्रचिती घेत आहोत. अशा भवभूतीच्या; आम्हा साहित्यिक-वंशजांना; तथाकथित श्रेष्ठ, प्रस्थापित, बोनसाय-संस्कृती-संवर्धक, विचार-डबक्यांचे स्वामी, ...यांच्या शाबासकीची अपेक्षाच नसते. म्हणूनच आम्ही आमची गैरपारंपरिक नवनिर्मिती व आपली ग्रामीण अभिव्यक्ती-शैली टिकवून आहोत; झाडीबोली व पोवारीबोली सारख्या साहित्य माध्यमांतून!
परंतु आपल्यापैकीच काही स्वनामधन्य ग्रामीण साहित्यिक गाव सोडून शहरवासी होताच आपल्या ग्रामीण-अभिव्यक्ती-शैलीला पुढे ठेवायला व आणायला भयंकर लाजू लागतात, त्यांना त्या तथाकथित श्रेष्ठादि बोनसाय संवर्धकांची शाबासकी(?) महत्वाची वाटत असते. त्या हवामहली शाबासकीला ते भूलतात व आपले अस्सल "प्रभाव-क्षेत्र" काय होते हे पूर्णतः विसरून(?) अनैसर्गिक तथा कृत्रिम प्रभाव-क्षेत्राला बिनशर्त शरण जातात. ही शोकांतिका आहे. ही #BitterReality आहे. असो.
@लखनसिंह कटरे/29.10.2018
Comments
Post a Comment