साहित्यिक गुणवत्ता वर्धन : विचारार्थ काही बिंदू
*साहित्यिक गुणवत्ता वर्धन : विचारार्थ काही बिंदू* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, ----------------------------------------------- *(1)* (बोली)भाषेचे रक्षण केवळ ती आपली मातृभाषा आहे म्हणून होत नसते. नुसता अभिमान असून भागत नाही. आपल्या (बोली)भाषेत तितके सकस, सशक्त असे काही सतत निर्माण होत रहावे लागते. त्यासाठी आम्हाला/सर्वांना प्रयत्न करावे लागतात. श्रम आणि साधने कारणी लावावी लागतात. (श्री विजय दर्डा : संपादकीय : लोकमत दीपोत्सव 2023) *(2)* आपल्या जाणिवेचा परीघ ओलांडून पुढे गेल्याशिवाय आपल्याला क्षितिजापलीकडले नाविन्यपूर्ण असे सकस, सशक्त व टिकाऊ/दर्जेदार असे काही गवसणे कठीण असते. आणि त्याशिवाय आपले विचार उत्क्रांत होण्याची प्रक्रिया सुद्धा थंडावते. यासंदर्भात व्हिक्टर ह्यूगो यांचे एक सुप्रसिद्ध विधान विचारणीय ठरावे. ह्यूगो म्हणतात, 'जिची वेळ आली आहे अशा कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही." अर्थातच आपल्या जाणिवेचा परीघ फैलावल्याशिवाय "ही वेळ आलीय" हे कळणे कठीणच ठरते/ठरेल. ...