मी : एक वैदर्भीय
*मी : एक वैदर्भीय* ~~~~~~~~~~~~ 'परिवर्तनाचा वाटसरु'च्या दि.01-15 सप्टेंबर 2022 च्या अंकात प्रकाशित प्रज्ञासूर्य शेंडे यांचा '1953चा नागपूर करार आणि सद्यस्थिती' हा तथ्याधारित संशोधनपर लेख वाचून मलाही त्यावर व्यक्त व्हावेसे वाटल्यानेच हा माझा, अल्पबुद्धि-आकलनाचा, संक्षिप्त लेखन-प्रपंच. मी ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक, सामाजिक, साहित्यिक, राजकीय, तार्किक, आर्थिक आणि तद्विषयक सयुक्तिक/साधार दृष्टिकोनातून कट्टर विदर्भवादी असल्याने त्या लेखात नमूद तथ्यात्मक वस्तुस्थितीचे पुनरावलोकन करून अर्थातच उद्विग्न झालो. संक्षिप्त रुपात का असेना, विदर्भाबाहेरील लोकांना कळू शकेल अशा पद्धतीने 1953चा नागपूर करार आणि संविधानातील अनुच्छेद 371(2) मधील तरतुदींचा महाराष्ट्रातील आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांनी केलेला विश्वासघात तथा तद्जनित बट्ट्याबोळासह संख्याशास्त्रीय संख्यात्मक आकडेवारी देऊन शेंडे यांनी महत्त्वपूर्ण काम केले आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद व त्यांचे आभार सुद्धा. 1960 नंतरच्या गेल्या सुमारे 64 वर्षांत सर्वाधिक...