योगी अरविंद आणि त्यांची कविता : एक स्मरण-यात्रा
*योगी अरविंद आणि त्यांची कविता : एक स्मरण-यात्रा* ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ @ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार. ----------------------------------------------- >> 1964-65 या शैक्षणिक वर्षात मी चौथ्या वर्गात होतो. आमचे वर्गशिक्षक श्री.सोना बुगाजी बहेकार हे होते. हे त्यावेळेस मुख्याध्यापक सुद्धा होते व त्यांना सतत बीडी ओढण्याची सवय होती. त्यामुळे त्यांचे शिकवण्याकडे दुर्लक्ष होत असे. अशा वेळेस आमचे वर्ग 1 ते 3 चे शिक्षक राहिलेले श्री.सीताराम भुराजी चुटे हे मध्ये मध्ये आमच्या चौथीचा शिक्षण-भार उचलत असत. चुटे गुरुजी हे एका डोळ्याने पूर्णतः दिव्यांग असले तरी शिकवण्यात त्यांचा हात कोणी धरू शकत नव्हता. माझे हस्ताक्षर, माझे गणित आणि मराठी हे विषय सुंदर व मजबूत होण्यामागे माझ्या आईइतकेच या चुटे गुरुजींचेही श्रम(!) व उपकार आहेत. >> चौथीच्या आमच्या वर्गशिक्षकाचे शिकवण्याकडे दुर्लक्ष असल्यामुळे आम्ही जरा ढेपाळलेच होतो. माझ्या आईच्या आणि मधून मधून चुटे गुरुजींच्या कृपेने मी अभ्यासात जरा ठीकठाक होतो. त्यावेळेस चौथीची बोर्डाची परीक्षा असायची. आमची परीक्षा आमच्या गावी न होता तीन किम...