माझे एक गुरुजी : श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे
माझे एक गुरुजी : श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~ >> 1966-67 या शैक्षणिक वर्षात मी आमच्या बोरकन्हार गावच्या शाळेतील सहाव्या वर्गाचा विद्यार्थी होतो. परंतु आमच्या गावातील शाळेच्या या सहाव्या आणि पाचव्या सुद्धा वर्गाला तत्कालीन जिल्हा परिषदेने मध्येच मान्यता नाकारल्याने दिवाळीच्या सुटीनंतर आमच्या गावातील पाचवी आणि सहावी चे वर्ग बंद झाले. >> त्यामुळे मला जवळच्याच (3 किमी वरील) अंजोराच्या शाळेत, दिवाळीनंतर, सहावीत प्रवेश घ्यावा लागला व मी अंजोरा येथील उच्च माध्यमिक शाळेचा सहावीचा विद्यार्थी झालो. त्यावेळी आमच्या वर्गात चंद्रप्रकाश हरिणखेडे, हरिदयाल डोंगरे, गेंदलाल वालदे, रामेश्वर बहेकार, महादेव चौधरी अशी हुशार विद्यार्थ्यांची एक फळीच होती. मला या फळीसोबत मैत्री आणि स्पर्धाही करायची होती. >> सहाव्या वर्गाचे आमचे वर्गशिक्षक श्री.उरकुडे गुरुजी असल्याचे आठवते.उरकुडे गुरुजी आम्हाला मराठी, इतिहास, भूगोल,नागरिक शास्त्र, चित्रकला हे विषय शिकवत तर इंग्रजी आणि हिंदी साठी श्री.बाजपेयी गुरुजी व गणितासाठी श्री.रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजी होते. दोनोडे गु...