साहित्यिक गुणवत्ता वर्धन : विचारार्थ काही बिंदू

*साहित्यिक गुणवत्ता वर्धन : विचारार्थ काही बिंदू*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
              @ॲड.लखनसिंह कटरे, 
       -----------------------------------------------
*(1)* (बोली)भाषेचे रक्षण केवळ ती आपली मातृभाषा आहे म्हणून होत नसते. नुसता अभिमान असून भागत नाही. आपल्या (बोली)भाषेत तितके सकस, सशक्त असे काही सतत निर्माण होत रहावे लागते. त्यासाठी आम्हाला/सर्वांना प्रयत्न करावे लागतात. श्रम आणि साधने कारणी लावावी लागतात. (श्री विजय दर्डा : संपादकीय : लोकमत दीपोत्सव 2023)

*(2)* आपल्या जाणिवेचा परीघ ओलांडून पुढे गेल्याशिवाय आपल्याला क्षितिजापलीकडले नाविन्यपूर्ण असे सकस, सशक्त व टिकाऊ/दर्जेदार असे काही गवसणे कठीण असते. आणि त्याशिवाय आपले विचार उत्क्रांत होण्याची प्रक्रिया सुद्धा थंडावते. यासंदर्भात व्हिक्टर ह्यूगो यांचे एक सुप्रसिद्ध विधान विचारणीय ठरावे. ह्यूगो म्हणतात, 'जिची वेळ आली आहे अशा कल्पनेला पृथ्वीवरील कोणतीही शक्ती थांबवू शकत नाही." अर्थातच आपल्या जाणिवेचा परीघ फैलावल्याशिवाय "ही वेळ आलीय" हे कळणे कठीणच ठरते/ठरेल.
         वस्तूतः आपल्या जाणिवेचा परीघ ओलांडल्याशिवाय वैचारिक खुलेपणाला वाव मिळत नसतो व त्याचे पर्यावसान वैचारिक कुंठितते मध्ये होऊ लागते. वैचारिक खुलेपणा ही संकल्पना समजून/उमजून घेताना नव्याच्या नवलाईने दिपायचे नाही किंवा जुन्याला कुरवाळतही बसायचे नाही, अशी शोधकवृत्ती जोपासावी लागते. अशा शोधकवृत्तीमुळे कोणत्याही टप्प्यावर मूलगामी फेरविचार करण्याची आपली क्षमता विकसित होते/होऊ लागते. 
            याचसंदर्भात आणखी नमूद करावयाचे ते असे की, आपण जेव्हा कोणत्याही प्रकारचे साहित्य लिहितो/प्रसवतो त्यावेळेस आम्हाला सुसंगती व विसंगती या दोन्ही संज्ञा/संकल्पनांची जाणीवपूर्वक माहिती असणे आवश्यक ठरत असते. या दोन्ही संज्ञा/संकल्पनेच्या संदर्भात महात्मा गांधी, डाॅ.बाबासाहेब आंबेडकर आणि विख्यात अर्थशास्त्री जाॅन मेनार्ड केन्स यांचे विचार मला विचारणीय व आचरणीय वाटतात. ते विचार असे, 

       *(एक)* "मी कधीच सुसंगत राहण्याचा प्रयत्न करीत नाही. माझ्या सत्याच्या शोधात मी अनेक कल्पना नाकारल्या आणि नवीन गोष्टी स्वीकारल्या. ... माझा ईश्वर प्रत्येक क्षणी जी सत्याची आज्ञा देतो, तिच्या पालनासाठी मी सतत तयार असतो. म्हणून माझ्या एकाच विषयावरील दोन ठिकाणच्या लेखनात जर कोणाला विसंगती वाटत असली आणि जर तरीही त्यांचा माझ्या शहाणपणावर विश्वास असला, तर त्याने माझ्या लिखाणातील एकाच विषयावरील शावटचे मत स्वीकारावे."
-- महात्मा गांधी (दि.29 एप्रिल 1933 C.W.55, P.61)

     *(दोन)* "इमर्सन यांनी असे म्हटले आहे की, सुसंगती हा गाढवाचा गुण असतो आणि मी स्वतःला गाढव बनवू इच्छित नाही. कोणताही माणूस केवळ सुसंगतीच्या नावाखाली स्वतःला आपल्या विचारांना बांधून ठेवू शकत नाही." असे सांगून आंबेडकर पुढे लिहितात : "सुसंगतीपेक्षा जबाबदारी महत्त्वाची असते. प्रत्येक जबाबदार माणसाने तो जे शिकला त्याचा त्याग करण्याचे शिकलेच पाहिजे. (Must learn to unlearn what he has learned.) प्रत्येक जबाबदार माणसाने आपल्या पूर्वीच्या विचारांचा सतत पुनर्विचार करण्याचे शिकले पाहिजे. आणि पूर्वीच्या विचारांत बदल करण्याचे धाडस दाखविले पाहिजे. परंतु अर्थातच त्यासाठी समर्पक आणि पुरेशी कारणेही आवश्यक असतात. कोणताही विचार हा अखेरचा कधीच नसतो..."
-- डाॅ.आंबेडकर (Dr.Babasaheb Ambedkar, Writings and Speeches, Vol. I, p.139. Education Department of Maharashtra Bombay (1979).
["गांधी : पराभूत राजकारणी आणि विजयी महात्मा" या श्री.रावसाहेब कसबे यांच्या ग्रंथांतून साभार उद्घृत]

     *(तीन)* "When the facts change, I change my mind, what do you do sir?" = ["जेव्हा तथ्येच बदलतात, तेव्हा मीही माझी मते बदलतो - तुम्ही काय करता महोदय?"] - जाॅन मेनार्ड केन्स.

*(3)* अशा या लेखन/साहित्य/वाङ्मय प्रकारांतील सर्वात कठीणतम लेखनप्रकार म्हणजे कवितालेखन हा लेखनप्रकार होय. मराठी, भारतीय आणि जागतिक परिप्रेक्षातूनही कवितेकडे पाहण्याचा साक्षेपी वाचकांचा, समीक्षकांचा, विचारवंतांचा दृष्टिकोन हा फक्त माहिती किंवा फक्त वर्णन असा नसतो. हा दृष्टिकोन केव्हाच कालबाह्य झाला आहे. बदलते कालमान व कालभान तथा वाङ्मयविषयक जागतिक विचार-संज्ञा यांच्या आलोकात आता कवितेकडून विचाराची, तर्कक्षमतेच्या विकासाची आणि वाचकाला स्वतःहून विचार करण्यास प्रवृत्त करण्याचीही अपेक्षा व्यक्त केली जाते. फक्त कालसापेक्षताच नव्हे तर कालनिरपेक्षता/कालातितता हा सुद्धा आपला अंगभूत गुणविशेष म्हणून मिरवणारी पद्यरचनाच आजकाल कविता या नामाभिधानाला पात्र ठरते. 
      कविता या संज्ञा/संकल्पनेचा अन्वयार्थ समजून घ्यावयाचा असल्यास कवितेतील शब्दांच्या सरळ अर्थाच्या पलीकडील गुह्य/लपलेला/व्यंगार्थाचे (hidden words between the lines चे) आकलन होणे आवश्यक असते. कवितेमध्ये असा शब्दांपलीकडीलचा अर्थ नसेल तर ती रचना म्हणजे खऱ्या अर्थाने 'कविता' नव्हेच, असेच म्हणावे लागेल. फक्त शब्द-जोडणी, फक्त यमक-साधणी म्हणजेच कविता नव्हे, हे समजून घेतले पाहिजे. एक अतिशय प्रचलित व साधारण असे उदाहरण असे की, 

    "एक मच्छर साला, 
     बना देता है आदमी को हिजड़ा" 

ह्या, चित्रपट कलावंत नाना पाटेकरने संवाद रुपात बोललेल्या दोन सुप्रसिद्ध व सुपरिचित ओळी म्हणजे दोन ओळींची एक (टपोरी? का असेना) कविताच आहे. मच्छर मारताना टाळी वाजवण्याच्या हस्तक्रियेचीच कृती करावी लागते आणि अशी हस्तकृती करण्यासाठी किन्नर व्यक्ती सुप्रसिद्ध आहे. म्हणजे अशी ही मच्छर मारणाऱ्याच्या व किन्नर व्यक्तीच्या हस्तकृतीतील साम्यता व अर्थातच आपल्या क्षमतेची हतबवलता, या दोन ओळीच्या रचनेत अध्याहृत आहे. असा या दोन ओळीत स्पष्ट दिसत नसलेला, पण दडून असलेला, अर्थ ज्याला कळला त्यालाच या दोन ओळीतील कविता समजेल. अन्यथा ह्या दोन ओळी म्हणजे "आणखी एक नाना पाटेकरचा डायलॉग" एवढाच त्याचा टपोरी अर्थच गवसेल, समजेल, उमजेल. तर अशी ही शब्दांच्या अर्थामागे दडलेली/लपलेली/गुह्य/अध्याहृत अर्थमीमांसा व अर्थनिर्णयन-क्षमता आपल्या अंगाखांद्यावर मिरविणारी रचनाच, खऱ्या अर्थाने कविता व पर्यायाने वाङ्मय या नामाभिधानाला पात्र ठरत असते/ठरू शकते हे आम्हाला समजून/उमजून घ्यावे लागेल. 

*(4)* कथा, ललित लेख, वैचारिक लेख, कादंबरी हे लेखन/साहित्य हे सर्व वाङ्मय प्रकार सुद्धा आजकाल जागतिक स्तरावर आपली एक विशिष्ट व वेगळीच ओळख निर्माण करीत आहेत. म्हणूनच ह्या सर्व अद्ययावत लेखन/साहित्य प्रकारांचे वाचन, मनन, चिंतन करणे हे अशा प्रकारच्या लेखन/साहित्य लिहू इच्छिणाऱ्यांसाठी परमावश्यक (mandatory) झाले आहे. वाचन >> चिंतन >> मनन >> लेखन ही लेखनाची/साहित्याची अनिवार्य अशी क्रमबद्धताच आहे. (अर्थात, आम्हाला शब्दांच्या लक्षणा, अभिधा व व्यंजना या अर्थाभिव्यक्ति व अर्थावलोनाच्या शक्तींशी किमान तोंडओळख तरी असणे अपेक्षित व अध्याहृत असते.)

*(5)* साहित्य, संस्कृती आणि निसर्ग यांचा त्रिमितीय आंतरसंबंध समजून उमजून घेणे कोणत्याही सुविद्य व साक्षेपी लेखक/कवी/साहित्यिकासाठी परमावश्यक (Mandatory) बाब असते. यासंदर्भात काही गोष्टींची/संज्ञा-संकल्पनांची जाण असणे व त्यांचे आकलन होणे/करून घेणे सुद्धा अर्थातच क्रमप्राप्त ठरत असते. वस्तूतः निसर्ग हा नेहमीच सुंदर, विलोभनीय असतो असे नाही; बऱ्याच वेळा तो वैराण, विद्रूप, भयानक, लहरी सुद्धा असतो. निसर्गाचे असे हे "असणे" समजून उमजून घेतल्याशिवाय निसर्ग उकलता येत नाही. तसेच संस्कृती या संकल्पनेचेही विविध पैलू व रंग सुद्धा समजून उमजून घेणे क्रमप्राप्त ठरत असते. संस्कृती ही कधीच धुऊन-पुसून नितळ करायची नसते; संस्कृतीच्या कुंकवाच्या करंड्यात जुन्या कुंकवावर नव्या कुंकवाचे पूट येते/चढत असते, ही वस्तुस्थिती समजून उमजून घेणे प्रत्येक लेखक/कवी/साहित्यिकाला अनिवार्य ठरत असते. साहित्य सर्जनाच्या संदर्भात क्रमप्राप्त ठरत असलेल्या, संस्कृती आणि निसर्ग या उपरनिर्दिष्ट बाबींचे अवगाहन म्हणूनच परमावश्यक ठरत असते.

*(6)* जगातील काही सुप्रसिद्ध प्रकाशन संस्था, काही शब्दकोश यांच्याद्वारे 'वर्ड ऑफ दी इयर'ची (वर्षातील सर्वाधिक वापरलेला किंवा प्रभाव पाडणारा शब्दाची) निवड करतात. या 2024 मधील ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस द्वारे असा वर्ड ऑफ दी इयर ठरलाय 'ब्रेन राॅट/Brain-Rot' हा शब्द. याचा मराठीतील अर्थ म्हणजे 'मेंदूचे सडलेपण'. या शब्दाची निवड आपल्याला सावध करते की, आम्ही समाजमाध्यमी मंत्रचळेपणाची शिकार होऊ नये म्हणून. आजकालचे समाजमाध्यम म्हणजे माहिती (ज्ञान नव्हे!) मिळवण्याचा एक सुलभ मार्ग, संपर्क-संवाद, थोडेसे टाइमपासी मनोरंजन, अनाठायी तुलना, अनाठायी अपेक्षा आणि अनाठायीच एकांगी स्वार्थप्रेरित कथनांची मांदियाळीच ठरू पाहत आहे. प्रत्यक्ष वर्तमानातील वास्तव घटना जाणीवपूर्वक डावलून आपलीच ढपली वाजवण्याची कोती वृत्ती सुद्धा आजकाल मेंदूच्या सडलेपणाची/ब्रेन राॅटची प्रतीक म्हणून आपल्या पुढे येत आहे. 

      ||याचे एक उदाहरण असे की, पूर्व विदर्भातील लोकबोली असलेल्या झाडीबोलीच्या नवव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा स्वागताध्यक्ष, याच झाडीबोलीच्या दहाव्या संमेलनातील प्रमुख चर्चक, अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष, शाही थाटाने पार पडलेल्या बाराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा प्रमुख संयोजक, सव्वीसाव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा कार्याध्यक्ष व प्रमुख आयोजक राहिलेल्या व्यक्तीचा 'भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण : महाराष्ट्र' या जगभरातील भाषांतून अनुवादित झालेल्या, सुप्रसिद्ध भाषाशास्त्री डाॅ.गणेश देवी यांच्या प्रमुख संपादकत्वाखाली पुणे येथील पद्मगंधा प्रकाशनाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या, महाग्रंथात "झाडीबोली" बद्दल लिहिलेल्या 11-12 पृष्ठाच्या, डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या लेखात, या वर नमूद व्यक्तीचा (या टिपणाच्या लेखकाचा/माझा) साधा नामोल्लेख सुद्धा नाही. एवढेच नव्हे तर, हयात असेपर्यंत सर्वच झाडीबोली साहित्य संमेलनातून आपल्या पहाडी आवाजात झाडी गौरव गीत सादर करून उपस्थितांना झाडीपट्टी आणि झाडीबोलीच्या रसास्वादाने भारावून टाकणाऱ्या स्व.गजानन बागडे गुरुजी यांचा सुद्धा नामोल्लेख डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांच्या या लेखात नाही. ही अशी अनाठायी, द्वेषजनित व स्वार्थप्रेरित एकांगी लेखनप्रक्रिया म्हणजे "ब्रेन राॅट"चे एक उत्कृष्ट उदाहरणच म्हणावे काय?||

*(7)* कोणतेही वाङ्मयीन लिखाण करताना या किमान अशा सहाही बाबींचे तथा संज्ञा-संकल्पनांचे अवलंबन/अनुपालन/अवगाहन/अनुसरण केले गेले तरच त्या लेखन/साहित्याचा/वाङ्मयाचा दर्जा व त्याची गुणवत्ता टिकून राहू शकेल. आणि दर्जा/गुणवत्ता घसरला/ली, साहित्य/लेखन दर्जाहीन होऊ लागले तर ही बाब अर्थातच त्या बोली/भाषेला मारकच ठरते व अशाने त्या बोली/भाषेचे भवितव्य अंधारमयच ठरण्याची शक्यता बळावू लागते. ही जबाबदारी ओळखून ती पेलणे हे आमचे, मराठी भाषकांसह सर्वच बोलीभाषकांचेही आद्य कर्तव्यच ठरते, असे मला नम्रतापूर्वक आवर्जून सांगावेसे वाटते.
     (एखाद्याला माझे हे लिखाण म्हणजे लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे किंवा अव्यापारेषु व्यापारासारखे वाटल्यास, अर्थातच अग्रिम क्षमस्व! आणखी काय?)
¤¤¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
(बोरकन्हार-441902, जि.गोंदिया)
●सदस्य, मराठी भाषा सल्लागार समिती, साहित्य अकादमी, दिल्ली.(राष्ट्रीय साहित्य संस्थान, संस्कृति मंत्रालय, भारत सरकार)
●विदर्भ प्रांत अध्यक्ष, अखिल भारतीय साहित्य परिषद, दिल्ली.
●राष्ट्रीय अध्यक्ष, पोवारी बोली, साहित्य, कला, संस्कृती मंडळ, नागपूर. 
●ex-सदस्य, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई.
●संमेलनाध्यक्ष, अकरावे झाडीबोली साहित्य संमेलन, वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर : जानेवारी 2004. 
●संमेलनाध्यक्ष, दुसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन, नागपूर, डिसेंबर 2021.
●स्वागताध्यक्ष, नववे झाडीबोली साहित्य संमेलन, बोरकन्हार, जि.गोंदिया, फेब्रुवारी 2002.
●संयोजक व संरक्षक, सव्वीसावे झाडीबोली साहित्य संमेलन, बोरकन्हार, जि.गोंदिया, डिसेंबर 2018.
●संयोजक, बारावे झाडीबोली साहित्य संमेलन, चंद्रपूर, जानेवारी 2005.
●यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक द्वारा अधिचालित एम.ए. (लोकप्रशासन) करिता दोन क्रमिक पुस्तकांचे लेखन.
●राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शतक महोत्सवी उपक्रमात, विद्यापीठातून गेल्या शंभर वर्षांत शिक्षण घेऊन बाहेर पडलेल्या ज्या 100 स्काॅलर्सचा नुकताच, 03 ऑगस्ट 2024 ला, सत्कार करण्यात आला, त्यापैकी मी एक, (ॲड.लखनसिंह कटरे.)
●राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या बी.काॅम. प्रथम वर्षाच्या मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात कविता समाविष्ट. 
●मराठी, हिंदी, झाडीबोली व पोवारी बोलीत एकूण एकोणीस/19 नावाजलेली (कविता, कथा, लेखसंग्रह) पुस्तके प्रकाशित. 
●मराठी व हिंदीच्या विविध सुप्रसिद्ध व नामांकित नियतकालिकांतून विविध विषयांवरील सुमारे 20-25 वैचारिक लेख प्रकाशित. 
●निवृत्त डीडीआर (जिल्हा निबंधक), सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभाग, महाराष्ट्र शासन. 
●उपसरपंच, ग्रामपंचायत, बोरकन्हार, जि.गोंदिया.
●कार्याध्यक्ष, (सामाजिक न्याय विभाग, गोंदिया, महाराष्ट्र शासन द्वारा प्राधिकृत) गोंदिया जिल्हा ज्येष्ठ नागरिक संघ, गोंदिया. 
●जिल्हा अध्यक्ष, गोंदिया जिल्हा कृतिशील निवृत्त शासकीय अधिकारी/कर्मचारी महासंघ, मुख्यालय पुणे.
(#1600)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

  1. यावर अजूनही एकही प्रतिक्रिया उमटली नाही!

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन