जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन (New, with Translation in English)
*जागतिकीकरणानंतरचे पोवार समाजाचे व त्यांच्या पोवारी बोलीचे वास्तव : एक आकलन* (New, with Translation in English)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मुख्यतः मध्यप्रदेश, महाराष्ट्र(विदर्भ), राजस्थान(अंशतः) या भागात वसलेल्या अल्पसंख्य पोवार/पंवार समाजाबद्दल इतर समाज बांधवात भरपूर गैर व भ्रामक समज/अपसमज आहेत. या पोवार समाजाची आपली एक वेगळीच बोलीभाषा असून तिला पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली या नावाने ओळखले जाते. ही बोली अजूनही मुख्यतः ध्वनीनिष्ठ/ध्वनीबद्ध/मौखिकच असून आता हळूहळू तिला लिपीनिष्ठ/लिपीबद्ध/लिखित करण्याचे जोरशोराचे प्रयत्न सुरू झाले आहेत. दि.04 ऑक्टोबर 2018 ला सर्वप्रथम यासंदर्भात डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे, मी, देवेन्द्र चौधरी या त्रयींच्या आग्रही व विनम्र पुढाकाराने तथा पोवार समाजातील अन्य मान्यवरांच्या सुखद आशीर्वादाने ही बोली साहित्य क्षेत्रात यावी, या बोलीत विविध प्रकारचे साहित्य निर्माण व्हावे, यासाठी सफल प्रयत्नाची सुरुवात करण्यात आली. या प्रारंभिक बीज-प्रयत्नाचा आता विविध पारंब्यांसह एक विशाल वटवृक्ष होऊ लागला आहे. या बोलीला साहित्य क्षेत्रात आणून ती लिपीबद्ध/लिपीनिष्ठ/लिखित करण्याच्या या जगन्नाथ-रथाला आता सर्व सान-थोर समाजबांधवांचे सक्रिय सहकार्य व त्यांचा सन्निध सहभागही लाभत आहे.
महाराष्ट्रातील अगदी पूर्वटोकावरील विदर्भ भागातील गोंदिया, भंडारा, तथा अंशतः नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, अमरावती या जिल्ह्यात पोवार समाज मुख्यतः वैनगंगा आणि वाघ, पांगोली या मुख्य नद्यांच्या सान्निध्यात किंवा सुपीक जमिनीच्या आसपास वसलेला आढळून येतो.
पोवार समाजाची पोवारी बोली फक्त मौखिकच राहिल्याने ती लुप्तप्राय होऊ लागल्याची बाब या समाजातील, इतर भाषेत लिहिणाऱ्या, साहित्यिकांना सर्वप्रथम आढळून आली. शिक्षण, नोकरी, व्यवसाय या निमित्ताने मूळ शेती व्यवसायातून हा समाज काहीसा तुटत शहरवासी व नोकरीपेशा होऊ लागल्याने व आपली पोवारी बोली बोलायला (कदाचित) संकोच वाटत असल्याने शहरवासी झालेल्या पोवार समाजातून पोवारी बोली हळूहळू हद्दपार होऊ लागली होती. म्हणजे ही बोली टिकविण्याची मुख्य जबाबदारी ज्यांनी उचलणे आवश्यक होते, तेच शिक्षित कुटूंब या बोलीपासून दूर जात असल्याची दुर्दैवी बाब लक्षात आल्यावर तिच्या संरक्षण, विकासाची चिंता काही अभ्यासकांना जाणवू लागली. आणि अशा अभ्यासकांनी स्वतः पुढाकार घेऊन पोवारी बोली विषयक न्यूनगंड दूर करण्यासाठी प्रयत्न आरंभिले. अशा अभ्यासकांमध्ये स्व.जयपालसिंह पटले, डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे सारख्या नागपूर निवासी झालेल्या मूळ ग्रामवासींचा तसेच साकोली निवासी स्व.ॲड.मनराज पटेल, मी स्वतः व इतर मान्यवरांचाही प्रामुख्याने समावेश आहे.
भाषा ही सर्व प्रकारच्या विकासाला कारणीभूत असते. कोणत्याही समाजाची बोली-भाषा ही त्या समाजाच्या इतिहास, संस्कृती, रिती-रिवाज, पर्यावरण, समाजकारण, यांची प्रत्यक्ष वाहक व साक्ष असते. पर्यायाने आजच्या या युगात आपापल्या "मूळाकडे पाहण्याच्या" दृष्टीने आपापल्या प्राचीनतम बोलीचे अनन्यसाधारण महत्त्व लक्षात आल्याने तिच्या अस्तित्वरक्षणासाठी व संवर्धनासाठी जागरूक समाज-मन व जन सज्ज झाले/होत आहेत.
भारतीय अर्थकारण, राजकारण, समाजकारण, साहित्यकारण, विचारपद्धती व ग्राहक व्यवस्थेवर सकारात्मक/नकारात्मक असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष परिणाम आणि प्रभाव पाडणाऱ्या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)च्या प्रभावाला व अस्तित्वाला कोणालाही नाकारता येत नाही/येणार नाही. तथापि १९९१ नंतरच्या या संथ बदलाचे परिणाम व प्रभाव प्रारंभी "विशेष न जाणवणारे" असे राहिल्याने सुमारे २000 पर्यंत या बदलांची विशेष अशी दखल साहित्य क्षेत्रात व पर्यायाने भाषा व बोली क्षेत्रात विशेषत्वाने घेण्यात आल्याचे दिसत नाही. परंतु २००० नंतर हे बदल प्रत्येक भारतीयाच्या अंगावर, मनावर, इच्छेवर, विचारपद्धतीवर अगदी जोमाने आदळू लागल्यावर त्याचा प्रभाव व परिणाम प्रत्येकच भारतीय भाषेतील साहित्यावर जाणवू लागला. अशा या संक्रमण अवस्थेत बोलींचे भवितव्य काय, हा प्रश्न प्रत्येक बोली-बोलकां*ना भेडसावू लागला. कारण कोणतीही बोली ही फक्त संभाषण, संप्रेषण, कम्युनिकेशन पुरतीच मर्यादित नसून तिच्याद्वारे त्या-त्या बोली-बोलकांच्या सांस्कृतिक, आनुवंशिक, सामाजिक, आर्थिक, पुरातत्वीय इतिहासाचे रक्षण व संवर्धन सुद्धा होत असते/झाले असते. त्यामुळे त्या-त्या बोली-बोलकांना आपापली बोली टिकविणे व तिचे संवर्धन करून तिचे लिखित स्वरूपात जतन करणे आवश्यक व अनिवार्य वाटू लागले. अगदी अशीच स्थिती पोवारी/पंवारी/पवारी(?) बोलीच्या बोली-बोलकांना सुद्धा भेडसावू लागली व या बोलीच्या संवर्धन, विकसन, लेखन(लिपीबद्ध), संकलनासाठी पोवारी-बोली-बोलक जागृत झाले.
अशातच या इतिहास-प्रसिद्ध पोवारी/पंवारी/पवारी(?) बोलीच्या "नावा"बद्दल काही भ्रम सुद्धा उद्भवू लागले. वस्तूतः महाराष्ट्रात या बोलीवर मराठी, झाडीबोली, गोंडीबोली यांच्या संगतीचा स्वाभाविक अभिसरण होऊनही तिला आपले "पोवारी" हे प्राचीन नाव टिकवता आले असले तरी मध्यप्रदेशात मात्र हिंदीच्या संगतीने तिला "पंवारी/पवारी" असे नाव पडल्याचे दिसून येते. एकंदरीत या बोलीच्या "नावा"वर "संगतीचा परिणाम"(?) व्हायचा तो झालाच. सारांशाने म्हणावयाचे म्हणजे पोवारी/पंवारी/पवारी(?) ही नावे स्थलभेदामुळे वेगळी-वेगळी वाटत(?) असली तरी ती प्राचीनतम अशा पोवार समाजाच्या बोलीचीच "नावे" आहेत, हे स्पष्ट व्हावे. या संदर्भात भाषाशास्त्रीय, उच्चारशास्त्रीय व परिसर वैशिष्ट्यांचा प्रभाव यांचा, संबंधित अभ्यासकांनी अभ्यास करून, त्याबरहुकुम आपला वैज्ञानिक दृष्टिकोनाधारित निष्कर्ष निर्धारित करणे ही आता काळाची गरज होऊन बसली आहे.
महाराष्ट्रातील गोंदिया, भंडारा व काहीसा चंद्रपूर व गडचिरोली या जिल्ह्यांत तथा नागपूर जिल्ह्यातील रामटेक, मौदा तसेच अमरावती व यवतमाळ जिल्ह्यातील काही भागातील काही मोठ्या गावांमध्ये पोवार मालगुजार, जमीनदार व पाटील असल्याने त्या-त्या गावात दुसऱ्या समाजातील लोक सुद्धा बोलताना पोवारी बोलीचा सर्रास वापर करीत असत/करतात, असे आढळून येते. अशीच वस्तुस्थिती मध्यप्रदेशातील बालाघाट, शिवनी, छिंदवाडा व बैतूल जिल्ह्यातही पहावयास मिळते, असे काही अभ्यासकांचे सांगणे आहे. म्हणजेच पोवारी बोली ही फक्त पोवार समाजापूरतीच मर्यादित न राहता पोवार-बाहुल्य गावातून पोवारी बोलीला एका लोक-बोलीचे रूपही मिळाले होते/आहे, असेही आढळून येते.
अशा या प्राचीनतम, ऐतिहासिक पोवारीबोलीचा उगम/उद्गम कसा झाला याचे निदान संबंधित विषयाचे संशोधक करतीलच, तसे संशोधन सुरू सुद्धा आहे. वास्तविक रित्या कोणतीही बोली ही "ध्वनीनिष्ठ" असते तर प्रमाण भाषा ही "लिपीनिष्ठ" असते. आणि त्यामुळेच बोलींना जेव्हा जेव्हा लिपीबद्ध करण्याचा प्रयत्न होतो, तेव्हा बहुतेक वेळा 'लिपीची मर्यादा' त्यासाठी अडसर ठरू लागते व बोलीचा इतिहास शोधणे दुष्कर होऊन बसते. या बोली आणि प्रमाण भाषा यांच्या आंतरसंबंधाबद्दल एक जागतिक किर्तीचे तत्वज्ञ, भाषाशास्त्री श्री.गणेश देवी म्हणतात की, *"प्राचीन काळी संस्कृत भाषेत 'व्याख्या' या शब्दासाठी 'भाषा' शब्दाचा उपयोग होत असे. ........पण 'भाषा' या शब्दात एक लपलेला अर्थ आहे, तो म्हणजे 'आवाज, ध्वनी'. खास करून केवळ लिपी असणाऱ्या बोलीसच भाषा समजण्याच्या दहशतवादी प्रवृत्तीस शह द्यायचा असेल तर भाषा म्हणजे बोली किंवा बोल - अर्थात 'आवाज' मानणेच सयुक्तिक होईल."* याच संदर्भात कन्नड कादंबरीकार यू.आर.अनंतमूर्ती म्हणतात की, *"भारतीय भाषांचा मूळस्रोत त्या भाषांच्या अंगणात व परसघरात आहे. पण ह्याही पलीकडे जाऊन असे स्वीकारले पाहिजे, की मान्य भाषांच्या अस्तित्वाची व प्रगतीची गुरुकिल्ली पोटभाषांच्या (बोलींच्या) हाती आहे."* यावरून बोलींचे व बोली टिकवून ठेवण्याचे ऐतिहासिक व सामाजिक/सांस्कृतिक महत्व व त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास किती परमावश्यक आहे, हे स्पष्ट व्हावे.
डाॅ.श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे (भाषा व पोटभाषा/बोली संबंधीचे) विचार येथे पुन्हा उद्घृत करावेसे वाटतात. ते म्हणतात, *"मानवी उत्क्रांतीतील कितीतरी गोष्टी अशा आहेत, की ज्यांविषयी कोणतेही शास्त्रीय विधान करणे अशक्य बनावे. त्यासंबंधी केवळ ठोकताळे बांधता यावेत आणि तेही असे की थेट त्यांच्या विरुद्धचे ठोकताळेही तेवढेच तर्कशुद्ध वाटावेत. भाषा या सामाजिक संस्थेची सुरुवात, तिच्या उद्भवाची नेमकी कारणे, तिच्या सुरुवातीच्या जडणघडणीतील घटनाक्रम हे उत्क्रांतीच्या ग्रंथातील सुरुवातीच्या व अस्पष्ट अक्षरांत लिहिलेल्या पानांप्रमाणे आहेत."* ते पुढे म्हणतात की, *"विश्वाची उत्पत्ती होत असताना कोणत्या प्रकारचा ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही, ह्यासंबंधी मत व्यक्त करणे शक्य असले तरीही ते मत सिद्ध करणे अशक्य आहे. ईश्वर अपौरुषेय आहे किंवा नाही यावर मत व्यक्त करण्यासारखेच तेही मत केवळ तत्त्वज्ञानात्मक तर्कसिद्धांताच्या स्वरूपाचे राहील. मानवाला व मानवाआधीच्या इतर प्राणिमात्राला, ध्वनिसंवेदन प्राप्त होण्याआधी, ध्वनी निर्माण झाला होता किंवा नाही हेही निश्चित करणे अशक्य आहे. अतीन्द्रिय अनुभवातून ऐकू येणारा सततचा ध्वनी - अनाहत नाद आणि स्वरयंत्रातून श्वास तोडून--जोडून बनविलेला ध्वनी हे दोन्ही एकाच प्रवृत्तीचे असतात किंवा नाही हे सांगणेही कठीण आहे. शिवाय अर्थव्यवहारासाठी (येथे आर्थिकव्यवहार अपेक्षित नसून शब्दार्थव्यवहार/meaning ध्वनित आहे) केवळ ध्वनीनियंत्रणाचाच मार्ग मनुष्यप्राण्याने का निवडला, डोळ्यांची भाषा विकसित करून अर्थ (meaning)- व्यवहार करण्याची क्षमता उपलब्ध असतानाही ती पूर्णपणे विकसित का केली नाही, हे सारे प्रश्न जरी विचारता आले तरीही त्यांची उत्तरे केवळ तर्काच्यापलीकडे नीटशी स्पष्टपणे मांडता येत नाहीत."* हे थोडेसे लांबलेले उद्-घृत, बोलीविषयक अभ्यासाचे, इतिहासाचे व बोलीच्या जतनाचे महत्त्व तथा बोलीचे भाषाव्यवहारातील स्थान-महात्म्य स्पष्ट करीत असल्याने हे धाडस केले आहे.
यासंदर्भात पोवारी बोलीचा विचार करताना काही ऐतिहासिक तथ्य सुद्धा विचारात घ्यावे लागतात हे स्पष्ट आहे. त्या अनुषंगाने ई.स.१०१० ते १०५५ या कालावधीदरम्यान होऊन गेलेले सम्राट राजा भोज हे पोवार समाजाचे प्रमुख पूर्वज मानले जात असून ते स्वतः संस्कृतादि भाषांचे विद्वान होते, ते एक उत्कृष्ट व अपराजित शासकच नव्हे तर विविध विद्वत्तापूर्ण ग्रंथांचे कर्ते होते, त्यांच्या दरबारात उत्कृष्ट लेखकांची/विद्वानांची "हजेरी" असायची, असे हे ऐतिहासिक तथ्य लक्षात घेऊन ते आजच्या घडीला या पोवारीबोलीचे मुख्य प्रवर्तक मानल्यास वावगे ठरणार नाही. त्यामुळे सम्राट राजा भोज यांच्या बृहद अशा राज्यपरिसरातील मालवा, धार या भागातील भाषिक व बोलीक* संस्कृतीचे संस्कार या पोवारीबोलीवर असणे स्वाभाविकच आहे. म्हणूनच या बोलीत आज इतक्या संक्रमणानंतरही मारवाडी, राजस्थानी, गुजराती, मालवी, निमाडी, आदि भाषा/बोलींचे अंश सापडतात.
अकराव्या--बाराव्या शतकातील व त्यानंतरच्या मुस्लिम वंशीय आक्रमकांच्या आक्रमणानंतर तसेच नागपूर (रामटेक/नगरधन) परिसरातील तत्कालीन परमार(पोवार) राज्यकर्त्यांच्या आगमनानंतर पोवार समाजात दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया घडून हा पोवार समाज वैनगंगा, वाघ, पांगोली या प्रमुख नद्यांच्या सुपीक प्रदेशात स्थायिक झाला. शिवाय राजा जगदेव यांच्या नगरधन(रामटेक) येथील राज्य स्थापनेनंतर सुद्धा पोवार समाजातील योद्ध्यांचे विदर्भात स्थलांतर झाले व बदलत्या समयानुकुल व परिस्थितीनुकुल या पोवार समाजाने तलवार त्यागून नांगर हाती धरला. या कामी गोंडवन भागातील गोंड राजांनी पोवार समाजाला जमीनदारी, मालगुजारी, पाटीलकी देऊन त्यांना शेतीसाठी जंगल/जमीन उपलब्ध करून देण्यात महत्वाची भूमिका निभावल्याचे आजवरच्या काही प्राथमिक संशोधनातून निष्पन्न होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील माणिकगड किल्ला आणि पोंभुर्णा/गोंडपिपरी,....... येथील संशोधन सुद्धा या पोवार समाजाच्या विदर्भातील तत्कालीन अस्तित्वाची साक्ष देतात, असेही काही संशोधक सांगतात. शिवाय मराठा/नागपूरकर भोसले यांच्या कालावधीत सध्याच्या गोंदिया जिल्ह्यातील कामठा या तत्कालीन परगण्याचे तत्कालीन प्रमुख चिमणाजी बहेकार यांच्या नेतृत्वाखाली पोवार योद्ध्यांनी कटक-युद्धात बजावलेल्या जबरदस्त विजयी कामगिरीने खुश होऊन त्या-त्या पोवार योद्ध्यांना मालगुजारी देण्यात आली, असेही काही इतिहासकारांचे निदान आहे.
जागतिकीकरणाच्या या "उठ, जा आणि खा!" (उजाखा*) च्या युगात अचानकच प्रत्येक मानव-घटकामध्ये आपले मूळ शोधण्याची प्रेरणा कशी काय जागृत झाली, हा संशोधनाचाच विषय ठरावा. मात्र आनंदाची व कदाचित आश्चर्याची सुद्धा बाब म्हणजे या प्रेरणेने विविधतेबद्दल दुस्वास न उमलता विविधतेतील एकता शोधण्याची प्रक्रिया सुद्धा मानव-घटकात अनायासेच कार्यान्वित झाली असल्याचे दिसून येते. त्या दृष्टीने विचार करता अशाच एका झाडीबोलीच्या एका संशोधक/अभ्यासकाचे मत या प्रकरणी विचारार्ह ठरते. त्यानुसार झाडीबोली ही मराठी भाषेची आजीच मानली जावी असे त्यांचे प्रतिपादन आहे. कारण संस्कृत ही सर्व आधुनिक भाषांची जननी मानली तर संस्कृत ची जननी ही त्या आधुनिक भाषांची आजीच होणार ना! वस्तूतः संस्कृत ही काही स्वयंस्फूर्त/स्वनिर्मित भाषा नव्हे/नसावीच. म्हणजे संस्कृत ही संस्कारित भाषा कोणत्यातरी पुरातन बोलीपासून/बोलीतून तयार(!) झाली हे स्पष्टच आहे. आणि झाडीबोलीचे कूळ व मूळ अजूनतरी कोणालाही शोधता आले नसून झाडीबोलीतील खूप सारे शब्द मात्र संस्कृतात थोड्याबहुत फरकाने जसेच्या तसे स्वीकारले/वापरले गेले असल्याचे झाडीबोलीच्या या संशोधक/अभ्यासकाचे निष्कर्ष आहेत. पर्यायाने झाडीबोली ---> संस्कृत --> मराठी या क्रमाने झाडीबोली ही मराठीची आजी लागते, असा त्या संशोधकाचा आढावा आहे. अशाच प्रकारे पोवारी बोलीचे सुद्धा कूळ व मूळ अजूनही शोधले गेले नसल्याने पोवारी बोली सुद्धा संस्कृतची आई/सावत्र(?) आईच शोभावी!
या संदर्भात एका पौराणिक मिथकाची हकीगत अशी की, परशुरामाने काही विशिष्ट कारणांमुळे क्रोधप्रवण होऊन संपूर्ण पृथ्वी निःक्षत्रिय करण्यासाठी एकवीस वेळा तत्कालीन क्षत्रियांची सरसकट कत्तल केली. तेव्हा समाजात राजाअभावी माजलेल्या अनागोंदी, अराजक, भयावह स्थितीने आतंकित, भयकंपित व आशंकित होऊन ऋषी वशिष्ठ यांनी आबू पर्वत क्षेत्रात क्षत्रिय-उत्पत्ती(!) साठी यज्ञ करून त्या यज्ञाग्निमधून चार क्षत्रिय वीर उत्पन्न/निर्माण(!) केले. यज्ञातून उत्पत्ती झाल्याने त्यांना "अग्नीवंशी क्षत्रिय" असे संबोधिले गेले. त्या चार वीरांपैकी एक महावीर म्हणजे पोवारांचा सर्वप्रथम पूर्वज, परमार किंवा प्रमार असे त्याचे तत्कालीन सर्वसमावेशक नामाभिधान! या परमार/प्रमार चा अपभ्रंश होता-होता अखेर पोवार/पंवार/पवार(?) हे नाव काळाच्या अंगणात स्थिर झाले, असे प्रथमदर्शनी दिसून येते. तर अशा या तत्कालीन परमार/प्रमारांची बोली/भाषा म्हणजेच आजची ही संस्कारित पोवारी/पंवारी/पवारी(?) बोली होय. असे हे पौराणिक मिथक लक्षात घेता पोवारी बोलीचे कूळ व मूळ शोधणे कसे व किती दुष्कर आहे हे स्पष्ट होऊन श्री.गणेश देवी यांचे यासंबंधीचे मत किती सयुक्तिक व प्रासंगिक आहे हे सुद्धा स्पष्ट होते.
शिवाय डाॅ.दशरथ स्वामी यांच्या संशोधनपर लिखाणाचे (अग्निपुराण, पंवार वंश) अवलोकन केले असता असे दिसून येते की, सम्राट अशोकाच्या अहिंसात्मक बौद्धधर्म प्रसाराच्या परिणामांमुळे त्याच्या पूत्र-पौत्रांच्या राज्यकालावधीत (इ.स.पूर्व २३२ - २१५) युद्धाशिवाय राज्य टिकविणे असंभव झाल्याच्या काळात लढवैय्या व योद्धा असलेल्या पोवार समाजाचा नव्याने उद्गम झाला असावा, असा कयास वर्तवण्यात येतो. यावरूनही वर नमूद केलेले श्री.गणेश देवी यांच्या यासंबंधीच्या व्यामिश्रतम मताची महतीच अधोरेखित होते.
पोवार समाजात प्रारंभी मूर्तीपूजा अस्तित्वात नव्हती असे दिसून येते. देवघरात एक, पुढच्या बाजूला अतिलघु चौकोन चिकटलेला थोडासा मोठा मातीचा चौकोनी बोहोला* व अंगणात दुसरा तसाच मातीचाच चौकोनी बोहोला, एवढेच पोवार समाजाचे मुख्य देव/दैवत म्हणता येतील. वर्षातून दोनदा या बोहल्यांवरील काल्पनिक देवांची व लोखंडी वा इतर धातूच्या पणतीची जागा मात्र कुटूंब प्रमुखाद्वारे पूजा करून आलटून पालटून बदलली जाते. याला "देव उतरवणे" असे म्हटले जाते. हे बोहले म्हणजे शिवाचे प्रतीक मानले जातात. म्हणजेच पोवार समाज शिवपूजक होता/आहे, हे स्पष्ट होते. आता इतर समाजाच्या संपर्कात आल्यानंतर मात्र पोवार समाजातही बहू-मूर्तीपूजेने आपले स्थान निश्चित केले आहे. तसेच पोवार समाजाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आजही पोवार समाजात हुंडापद्धत अस्तित्वात नाही. (इतर समाजाची देखासिखी मुळे काही क्षुल्लक अपवाद आढळून येतात, तेव्हा त्यांच्यावर अत्यधिक सामाजिक दबाव निर्माण होऊन त्यांनाही यापासून परावृत्त करण्याचे कार्य केले जाते.) याउलट ४०-५० वर्षांपूर्वी गरीब पोवार कुटूंबात वधूपक्षाला वरपक्षाकडून "दक्षिणा" देण्याची पद्धत होती. पोवार समाजाची ही वैशिष्ट्ये इतर समाजावर सकारात्मक प्रभाव टाकत असत. परंतु सध्याच्या या "उजाखा"च्या युगात पारिवारीक alienation, विभक्त कुटुंबे, परस्परांतील अंतर, वाढल्याने व समाज-समूहा ऐवजी व्यक्ती-महत्वापोटी असे सर्वच सामाजिक प्रभाव प्रभावहीन ठरू लागले आहेत. *शिवाय आणखी एक अद्भुत वैशिष्ट्य म्हणजे पोवार समाजात "भिकारी" अजिबात नाहीत. तसेच पोवार समाजातील एकाही वृद्धाला (स्त्री/पुरुष) अजून तरी वृध्दाश्रमात जायची/रहायची पाळी आलेली नाही, अशी पोवार समाजाची सुदृढ कुटूंब-व्यवस्था अजूनही टिकून आहे.*
भारत सरकारच्या एका जुन्या सर्वेक्षणानुसार हिंदी ची उपभाषा/पोटभाषा/बोली म्हणून पोवारी बोलीचा/भाषेचा उल्लेख भाषासूचीत केलेला आहे. त्यानुसार पोवारी बोलणाऱ्या भाषकांचा क्रमांक ४२ वा असून तत्कालीन अंदाजाच्या आधारे ३८-४० लक्ष लोकसंख्या असलेल्या पोवार समाजातील ४,२५,७४५ पोवार लोक बोलचालीत अजूनही पोवारी बोली/भाषेचा वापर करतात, असे नमूद आहे. (ही आकडेवारी जुनीच असून सद्यस्थितीत मिथकीय वाटते.)
पोवारी बोली/भाषेवर सर्वप्रथम इंग्रजी भाषातज्ज्ञ सर जाॅर्ज अब्राहम गियर्सन यांनी संशोधन केले. दुसरे इंग्रजी विद्वान आर.व्ही.रसेल यांनी त्यांच्या "CASTS AND TRIBES OF C.P. AND BERAR" या ग्रंथात पोवारी बोली/भाषेचा आणखी थोडासा अभ्यास मांडला. नागपूर विद्यापीठातील डाॅ.सु.बा.कुलकर्णी यांनी प्रथमच, १९७२ मध्ये पोवारी बोली/भाषेचा शास्त्रोक्त अभ्यास करून Ph.D. साठी प्रबंध सादर केला व त्यांना नागपूर विद्यापीठाद्वारे ती पदवी प्रदान करण्यात आली. १९९९ मध्ये डाॅ.मंजू अवस्थी यांनी बालाघाट जिल्ह्यातील बोलींचा (पोवारी ही मुख्य बोली) अभ्यास सादर करून रायपूर विद्यापीठाची D.Lit. पदवी प्राप्त केली. (तथापि, त्यांनी पोवार समाजाबद्दल एक अत्यंत चुकीचा, विपर्यस्त, काल्पनिक व अनैतिहासिक असा बदनामीकारक निष्कर्ष दर्शविला. त्यांची ती निराधार अशी भयंकर चूक त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी शेवटी आपली चूक सपशेल कबूल करून तो निष्कर्ष रद्दबातल केला व त्याबद्दल दिलगिरी सुद्धा व्यक्त केली.) त्यानंतर डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी २०११ पासून पोवारी बोली/भाषेचा भाषावैज्ञानिक पद्धतीने अभ्यासाचा विडा उचलला असून त्यांनी "पवारी ज्ञानदीप" हा महत्वाचा ग्रंथ सिद्ध केला आहे. नागपूरचेच स्व.जयपालसिंह पटले यांनी "पवार गाथा" व अन्य ५-६ महत्त्वाची पुस्तके पोवारी बोली/भाषेत अनुवादित/प्रकाशित केली आहेत.
यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे पोवारांचा विदर्भ संपर्क ही एक दीर्घकालीन स्थलांतराची प्रक्रिया आहे. अकराव्या शतकात नागपूरकडील प्रदेश मध्यप्रदेशातील धारच्या परमारवंशीय राजांच्या (राजा भोजशी संबंधित) मांडलिकीखाली होता. याची साक्ष भांदक येथील शके १०६८ च्या नागनाथ मंदिरातील मराठी शिलालेखात आढळून येते. या शिलालेखात धर्मशील राजा पवार याने मंदिराचा जीर्णोद्धार व नव्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असे म्हटले आहे. नागपूरकर भोसल्यांच्या कारकीर्दीत तर अनेक पोवारांनी कटकपर्य॔त स्वाऱ्या करून समशेर गाजविली आणि आपण शूर क्षत्रियांचे वंशज आहोत हे सिद्ध केले. समशेरीप्रमाणेच नांगर धरण्यातही पोवारांचा हात कोणी धरणार नाही. त्यांनी पूर्व विदर्भात व पश्चिम मध्य प्रदेशात गावोगावी तलाव बांधून वैनगंगेचे खोरे सुजलाम आणि सुफलाम करून टाकले आहे. पोवार समाजातील लोकांनी बांधलेले तलाव, जे सध्या माजी मालगुजारी (मा.मा.) तलाव म्हणून ओळखले जात असून ते तत्कालीन तंत्रज्ञानातील प्रगतीचे द्योतकच ठरतात.
पूर्व वैदर्भीय पोवारांच्या या दीर्घकालीन विदर्भ वास्तव्यामुळे त्यांच्या भाषेचा मूळ तोंडवळाच बदलून गेला आहे. तिचा घाट जरी माळवी असला तरी थाट मात्र नागपूरी (झाडीबोलीय) आहे. पोवारी बोली/भाषेची स्वर व्यवस्था अधिकांश हिंदी भाषेप्रमाणेच आहे. या बोलीत "ळ" हा ध्वनी नाही. मराठी शब्दातील "ळ"काराचा "र"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. यामुळे होळीची होरी आणि शेळीची सेरी होते. कधीकधी "ळ" चा "ड" देखील होतो. उदा. उथळ चे उथड व धर्मशाळा चे धरमसाडा असे रूप होते. शब्दारंभीच्या "व" चा "ब" होतो. जसे:- वेळू चा बेरू, वाळू चा बारू, विहीर चा बिहीर इ.
पोवारांच्या बोली/भाषेत "श" हा ध्वनी नाही. "श"काराचा "स"कार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे शिंगाचे सिंग व शेंगेचे सेंग होते. दन्त्य व तालव्य स्पर्शसंघर्षी ध्वनींमध्येही व्यवच्छेद आढळत नाही. प्रायः मुक्त-परिवर्तनच आढळते. यामुळे मराठीतील चांदी, चाळण, चवळी, जांभई, जावई, जुना, झाकणी यासारखे शब्द पोवारीत चांदि, चारनि, चवरि, जांबइ, जवाई, जुनो, झाकनि याप्रमाणे उच्चारले जातात. या बोली/भाषेत "ण" हा ध्वनी नसल्याने बाणाचा बान बनतो व वेणीची बेनी बनते. शब्दारंभीच्या ए आणि ओ या स्वरांना य आणि व असे आगम होतात. यामुळे एकाचा येक व ओठाचा वठ होतो.
पोवारीत हिंदीप्रमाणे पुल्लिंग आणि स्त्रीलिंग अशी लिंगे आहेत. या बोली/भाषेत आंगन, कनिस, घुबड, चमडा, जंगल, जांबुर इ. मराठीत नपुसकलिंगी असणारे शब्द पुल्लिंगी आहेत. तर नाक, पदक, परसाद, सरन, मालिस यासारखे शब्द स्त्रीलिंगी आहेत. सामान्यतः पुल्लिंगी नामे अकारान्त व स्त्रीलिंगी नामे इकारान्त असतात. विशेष म्हणजे, या बोली/भाषेत नामांना वचनविकार होत नाही. यामुळे येक घर, दुय घर, येक टुरा, दुय टुरा असेच अविचल रूप राहते. नामांचे सामान्य रूपही होत नाही. षष्ठीचा प्रत्यय "को" तर सप्तमीचा प्रत्यय "मा" असा आहे. जसे:- उनको नवकर, वको भाई, हातमा, बगीचामा, इ.
अशा या ऐतिहासिक पोवारी/पंवारी/पवारी बोलीचे जागतिकीकरणानंतरचेे स्थान आता पुन्हा पुनर्स्थापित होत असून महाविद्यालयात शिक्षण घेत असलेेेेली पोवार समाजातील तरुण पिढी महाविद्यालयातही आजकाल आपापसात सर्रास पोवारी बोलीत बोलू लागली आहे. शिवाय ह्या बोलीत साहित्य-निर्मिती सुद्धा होत असून त्या साहित्याच्या प्रचार-प्रसारासाठी ऑक्टोबर २०१८ मध्ये "राष्ट्रीय पोवारी/पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळा"ची स्थापना करण्यात आली असून ०३ फेब्रुवारी २०१९ ला तिरोडा (जि.गोंदिया) येथे पहिले अखिल भारतीय पोवारी/पवारी साहित्य संमेलन यशस्वीपणे पार पाडण्यात आले. दुसरे व तिसरे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलने अनुक्रमे नागपूर व पांढुरणा (मध्यप्रदेश) येथे यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले आहेत. या दुसऱ्या व तिसऱ्या संमेलनांचे संमेलनाध्यक्षपद अनुक्रमे ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत व माजी राजपत्रित अधिकारी ॲड.लखनसिंह कटरे आणि सुप्रसिद्ध कवी/गझलकार ॲड.देवेंद्र चौधरी यांनी भूषविले होते. चौथे संमेलन मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील कटंगी(थाना) येथे दि.२४.१२.२०२३ ला आयोजित करण्यात आले होते. या चौथ्या पोवारी बोली साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे यांनी भूषविले होते. पाचवे साहित्य संमेलन फेब्रुवारी 2025 मध्ये भंडारा येथे घेण्याचे धाटत असून त्यासाठी लवकरच संमेलनाध्यक्षाची निवड करण्यात येणार आहे.
एकंदरीत "ध्वनीनिष्ठ"(मौखिक) पोवारी बोली आता या जागतिकीकरणानंतरच्या रेट्याने "लिपीनिष्ठ" (लिखित) होण्याचा स्वावलंबी मार्ग अनुसरत आहे. आणि पर्यायाने मराठी व हिंदी ह्या प्रमाण भाषांना भिन्न-विभिन्न असे नवनवीन शब्द पूरवून प्रमाण भाषांना आणखी सुदृढ व समृद्ध करण्यासाठी सज्ज होत आहे.
□□
◇विशेष टीप :- पोवार समाज हा मूलतः प्राचीनकालीन लढवय्या/लढाऊ समाज असल्याचे ऐतिहासिक दाखले मिळत असून याच समाजाशी संबंधित मानला जात असलेला भोयर/पवार समाज हा मूलतः शेतकरी असल्याचेही इंग्रजकालीन सेन्सस नुसार अनुमानित होत आहे. अशा या व्यामिश्रतम व वादसंपृक्त बाबींच्या प्रकाशात वर्धा, नागपूर या महाराष्ट्रातील तर छिंदवाडा, बैतूल या मध्यप्रदेशातील जिल्ह्यात वसलेला भोयर/पवार समाज व त्यांची बोली, भोयरी/पवारी, ही पोवारी बोलीशी काहीशी मिळतीजुळती तर काहीशी वेगळी सुद्धा असल्याचे दिसून येते. या संदर्भात वेगवेगळी मते असून त्या-त्या मतधारकांकडे, पूरक ठरू शकतील असे काही ऐतिहासिक पुरावे सुद्धा उपलब्ध असल्याचे त्यांचे-त्यांचे दावे असल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. सबब अशा या तूर्त वादग्रस्त ठरत असलेल्या काही बाबी व संदर्भ त्या-त्या दृष्टिकोनातून तपासून घेणे तद्विषयक अभ्यासकांना व संशोधकांना क्रमप्राप्त असेल. कारण कोणताही अभ्यास व संशोधन या वैज्ञानिक प्रक्रिया असून त्यांना अंतिम बिंदू नसतो.)
□□ (शब्दसंख्या : सुमारे ३०५०)
(*बोलक = बोलणारे, *बोहोला = मातीचा चौकोनी ओटा)
□□
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-४४१९०२,
ता.आमगांव, जि.गोंदिया
(विदर्भ-महाराष्ट्र)
(मोबाईल : +917066968350)
¤
(आधार व आभार :
1)डाॅ.सु.बा.कुलकर्णी,
2)डाॅ.श्री.गणेश देवी,
3)डाॅ.ज्ञानेश्वर टेंभरे,
4)स्व.जयपाल सिंह पटले)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
टीप :- या लेखाचा एक असंस्कारित संक्षिप्त भाग "अक्षरयात्रा" या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या (2018-2019 या वर्षीच्या) वार्षिकांकात प्रकाशित झालेला आहे.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Translation in English
---------------------------------------
👇
*"Globalization and the Powar Community: A Reality Check"*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
@Adv.LakhanSingh Katre
-------------------------------------------
The Powar/Panwar community, primarily residing in the states of Madhya Pradesh, Maharashtra (Vidarbha), and Rajasthan (partially), is often misunderstood by other communities. This community has its own unique dialect, known as Powari/Panwari/Pawari, which is mainly spoken and not written.
However, efforts are being made to document and write this dialect. On October 4, 2018, a successful attempt was made to introduce this dialect in the literary world, thanks to the efforts of Dr.Dnyaneshwar Tembhare, myself, and Devendra Chaudhari, along with the blessings of other esteemed members of the Powar community.
Today, this dialect is being developed and written, and many community members are actively contributing to this effort. In Maharashtra, particularly in the Vidarbha region, the Powar community is mainly found in the districts of Gondia, Bhandara, and partially in Nagpur, Chandrapur, Gadchiroli, Yavatmal, and Amravati, primarily along the rivers of Wainganga and Wagh, Pangoli.
The Powari dialect of the Powar community was on the verge of disappearing as it was only spoken and not written. This realization first dawned on the community's writers and litterateurs who wrote in other languages, like myself and Dr.Dnyaneshwar Tembhare. As the community shifted from its traditional occupation of farming to education, jobs, and business, and became more urbanized, the use of the Powari dialect gradually declined. In fact, the very people who were expected to preserve the dialect were the ones who were moving away from it.
However, some researchers and scholars felt the need to protect and develop the Powari dialect. They took the initiative to work on the dialect and create awareness about its importance. Some notable personalities who have contributed to this effort include late Jaypalsingh Patle, Dr. Dnyaneshwar Tembhare, late Advocate Manraj Patel, and myself, among others.
Language is a key driver of development. A community's dialect is a reflection of its history, culture, customs, environment, and social dynamics. In today's era, there is a growing realization of the importance of preserving one's roots and heritage. As a result, people are becoming more aware of the need to protect and promote their traditional dialects.
The impact of liberalization, globalization, and privatization (LPG) on Indian economy, politics, society, literature, thought process, and consumer system has been significant. While the effects of these changes were not immediately apparent, by around 2000, their impact on Indian languages and dialects became noticeable.
In this transitional phase, the future of dialects became a concern for their speakers. Dialects are not just a means of communication, but also a way to preserve the cultural, genetic, social, economic, and historical heritage of their speakers.
As a result, speakers of various dialects, including Powari/Panwari/Pawari, felt the need to preserve and promote their dialects. They realized the importance of developing a written form of their dialect to ensure its survival. This led to a renewed effort among Powari speakers to develop, document, and promote their dialect.
The name of the Powari/Panwari/Pawari dialect has been subject to some confusion. While it has retained its original name "Powari" in Maharashtra, despite influences from Marathi, Jhadiboli, and Gondiboli, in Madhya Pradesh, it has come to be known as "Panwari/Pawari" due to its association with Hindi. In summary, the names "Powari", "Panwari", and "Pawari" refer to the same ancient dialect of the Powar community, with variations in name due to regional differences.
A scientific study of the dialect, taking into account linguistic, phonetic, and environmental factors, is necessary to establish a conclusive understanding of the scientific nomenclature of the dialect.
In Maharashtra, the Powari dialect is widely spoken in districts such as Gondia, Bhandara, Chandrapur, and Gadchiroli, as well as in some parts of Nagpur, Amravati, and Yavatmal. Similarly, in Madhya Pradesh, the dialect is spoken in districts such as Balaghat, Shivni, Chhindwara, and Betul. Interestingly, the Powari dialect has transcended its association with the Powar community and has become a common dialect spoken by people of other communities in Powar-dominated villages, effectively becoming a folk dialect.
The origin of the ancient Powari dialect is a topic of research, and scholars are working to uncover its history. Generally, dialects are sound-based, while standard languages are script-based. When attempts are made to document a dialect, the limitations of the script often become a hindrance, making it challenging to uncover the dialect's history.
Renowned linguist Dr.Ganesh Devi states, _"In ancient times, the word 'vyakhya' (व्याख्या) (meaning explanation) was used to refer to the Sanskrit language. However, the word 'bhasha' (language) has a hidden meaning, which is 'sound' or 'voice'. To counter the tendency to consider only script-based languages as true languages, it would be more accurate to consider language as dialect or sound."_
Kannada novelist U.R. Ananthamurthy adds, _"The roots of Indian languages lie in their own backyard and neighborhood. However, it must be acknowledged that the key to the existence and development of standard languages lies in the hands of dialects."_
These statements highlight the historical, social, and cultural significance of dialects and the importance of studying them from a scientific perspective.
Dr.Ganesh Devi's thoughts on language and dialects are worth quoting again. He says, _"Many aspects of human evolution are impossible to define or explain. We can only make educated guesses, and even those guesses can be argued against. The origins of language, the reasons for its emergence, and the early events that shaped it are like the first, unclear pages of the book of evolution."_
He further states, _"It is impossible to say whether any sound was produced during the creation of the universe. Even if we could express an opinion, it would be impossible to prove. Similarly, it is impossible to determine whether God is apaurusheya (uncreated) or not. Such opinions would remain purely philosophical and theoretical. It is also impossible to say whether sound existed before humans and other living beings developed the ability to perceive it. The constant, supernatural sound that is heard in meditation - the anahat naad - and the sound produced by the vocal cords through breathing, are both part of the same phenomenon, or are they? It is difficult to say. Moreover, why did humans choose to use sound control for communication, when the ability to communicate through visual means was available? These questions can be asked, but their answers cannot be explained clearly."_
This lengthy quote is included herewith7 to emphasize the importance of studying dialects, their history, and their preservation, as well as their significance in language communication.
Considering the historical context of the Powari dialect, some historical facts must be taken into account. Notably, Emperor Raja Bhoj, who ruled from 1010 to 1055 CE, is considered a prominent ancestor of the Powar community. He was a scholar of Sanskrit and other languages, an unparalleled ruler, and the author of various scholarly books. His court was attended by renowned writers and scholars.
Given these historical facts, it is reasonable to consider Emperor Raja Bhoj as a key promoter of the Powari dialect. Consequently, it is natural that the linguistic and cultural influences of Malwa, Dhara, and other regions of his vast empire would have left an imprint on the Powari dialect. This explains why, even after so much transformation, the dialect still retains elements of Marwari, Rajasthani, Gujarati, Malvi, Nimadi, and other languages/dialects.
Following the Muslim invasions of the eleventh and twelfth centuries, as well as the arrival of the Paramara (Powar) rulers in the Nagpur (Ramtek/Nagardhan) area, the Powar community underwent a prolonged process of migration. Eventually, they settled in the fertile regions of the Wainganga, Wagh, and Pangoli rivers. Additionally, after King Jagdev established his kingdom in Nagardhan (Ramtek), Powar warriors migrated to Vidarbha, adapting to the changing times and circumstances, and eventually laying down their swords to take up the plow.
Research suggests that the Gond kings of the Gondwana region played a crucial role in providing land to the Powar community for agriculture, as well as granting them the rights of zamindari, malguzari, and patilki. The discovery of the Manikgarh fort in Chandrapur district and the research at Pombhurna/Gondpipri provide evidence of the Powar community's historical presence in Vidarbha. Some historians also mention that during the Maratha/Nagpurkar Bhosle period, Powar warriors led by Chimnaji Bahekar, the chief of the Kamtha paragana in present-day Gondia district, achieved a decisive victory in the Katak war, and as a reward, they were granted malguzari/zamindari rights.
In the era of globalization, where the mantra is "get up, go, and grab!", it is intriguing to note how people have suddenly become interested in exploring their roots. This phenomenon is worthy of research. However, it is heartening to see that this quest for one's roots has also led to an appreciation of diversity and a search for unity within that diversity.
A researcher's opinion about the Jhadiboli dialect is relevant in this context. According to him, Jhadiboli should be considered the grandmother of the Marathi language. His reasoning is that if Sanskrit is considered the mother of all modern languages, then the language from which Sanskrit originated should be considered the grandmother of those languages. In other words, Sanskrit is not a self-created language but rather a refined language developed from some ancient dialect.
This researcher points out that many words in Jhadiboli have been borrowed into Sanskrit with slight modifications. Since Jhadiboli's roots and origins are still unknown, it can be inferred that Jhadiboli → Sanskrit → Marathi is a possible sequence, making Jhadiboli the grandmother of Marathi.
Similarly, the origins of the Powari dialect are also unknown, leading one to wonder if Powari might also be considered the mother or stepmother of Sanskrit!
A mythological story sheds some light on the origins of the Powar community. According to legend, Parashurama, enraged for certain reasons, killed all the Kshatriyas on earth twenty-one times, leading to a situation of chaos and anarchy. To restore order, Rishi Vashishta performed a yajna on Mount Abu and created four Kshatriya warriors from the sacred fire. One of these warriors, Mahavir, is said to be the first ancestor of the Powar community, also known as Paramara or Pramar. Over time, the name Paramara/ Pramar evolved into Powar/Panwar/Pawar.
Given this mythological background, it becomes clear how difficult it is to trace the origins of the Powari dialect. This underscores the validity of Dr.Ganesh Devi's opinion on the matter.
Dr. Dasharath Swami's research-based writing (Agnipuran, Panwar Vansh) suggests that due to Emperor Ashoka's non-violent Buddhist propagation, his descendants' kingdoms (232-215 BCE) found it impossible to maintain power without war. This led to the emergence of the Powar community as a warrior class.
This theory reinforces Dr.Ganesh Devi's views on the origins of languages and dialects.
Initially, the Powar community did not practice idol worship. Their primary deities were two mud structures: one in the courtyard and another near the entrance. These structures, called "bohola," (बोहोला), were considered symbolic of Lord Shiva. Twice a year, the family head would perform a ritual and change the position of these structures, a practice known as "dev utaravane" (changing the deity). This indicates that the Powar community was primarily Shaivite.
However, after interacting with other communities, the Powar community also adopted multi-idol worship.
Another distinctive feature of the Powar community is the absence of the dowry system. (Some minor exceptions exist, but social pressure ensures that these instances are rare and discouraged.)
In contrast, 40-50 years ago, poor Powar families would receive "dakshina" (a gift) from the groom's side during weddings.
These unique aspects of the Powar community had a positive impact on other societies. However, in today's fast-paced world, where individualism and alienation are increasing, these social influences are waning.
Additionally, two more remarkable features of the Powar community are:
1. There are no beggars in the Powar community.
2. Not a single elderly person (male or female) in the Powar community has been sent to an old-age home, reflecting the community's strong family bonds and values.
According to an old survey by the Government of India, Powari is listed as a dialect/sub-language of Hindi. The survey estimated that around 4,25,745 people in the Powar community, which had a population of 3.8-4 million at that time, still use the Powari dialect in their daily conversations. (Please note that this data is outdated and may seem mythical today.)
The first person to research the Powari dialect was British linguist Sir George Abraham Grierson. Another British scholar, R.V. Russell, also studied the dialect and included his findings in his book "Castes and Tribes of C.P. and Berar."
Dr.S.B.Kulkarni from Nagpur University was the first person in the recent years, to conduct a scientific study of the Powari dialect, and he submitted his Ph.D. thesis in 1972. In 1999, Dr. Manju Awasthi presented her research on the dialects of Balaghat district (including Powari) and received her D.Lit. degree from Raipur University. (However, she made a false and defamatory conclusion about the Powar community, which she later retracted and apologized for.)
Dr. Dnyaneshwar Tembhere has been conducting a scientific study of the Powari dialect since 2011 and has authored an important book titled "Pawari Gyanadeep." Late Jaypalsingh Patle from Nagpur has translated and published several important books, including "Pawar Gatha," in the Powari dialect.
The connection between the Powars and Vidarbha is a result of a long process of migration. In the 11th century, the region around Nagpur was under the control of the Paramara dynasty (related to Raja Bhoj) of Dhar in Madhya Pradesh. Evidence of this can be found in the Marathi inscription on the Nag Nath temple at Bhandak, which dates back to 1068 CE. The inscription mentions that a devout king named Pavara renovated the temple and installed a new idol.
During the reign of the Nagpurkar Bhosles, many Powars demonstrated their bravery in battles and proved themselves to be descendants of great warriors. The Powars were not only skilled in warfare but also in farming. They built numerous lakes and ponds in eastern Vidarbha and western Madhya Pradesh, making the Wainganga valley fertile and prosperous. The lakes built by the Powar community, now known as the former Malguzari (Ma.Ma/मा.मा./माजी मालगुजारी) lakes, are a testament to their engineering skills.
The long-term presence of the Powars in Vidarbha has altered the tone and tenor of their language. Although its base is Malvi, the dialect has been influenced by the local language (Jhadiboli). The sound system of the Powari dialect is similar to that of Hindi. The sound "ळ" (ḷ) is not present in this dialect. The "ळ" sound in Marathi words is often replaced with the "र" (r) sound. For example, "होळी" (Holi) becomes "होरी," and "शेळी" (sheep) becomes "सेरी." Sometimes, the "ळ" sound is replaced with the "ड" (ḍ) sound, as in "उथळ" (uthaḷ) becoming "उथड" (uthaḍ) and "धर्मशाळा" (dharmashāḷā) becoming "धरमसाडा" (dharma-sāḍā). The initial "व" (va) sound in words often changes to "ब" (ba), as in "वेळू" (veḷū) becoming "बेरू" (berū), "वाळू" (vāḷū) becoming "बारू" (bārū), and "विहीर" (vihīr) becoming "बिहीर" (bihīr).
The Powari dialect does not have the "श" (sha) sound. Instead, the "श" sound is replaced with the "स" (sa) sound. For example, "शिंग" (shinga) becomes "सिंग" (singa), and "शेंग" (shenga) becomes "सेंग" (senga).
In the Powari dialect, the distinction between dental and cerebral stops is not maintained. Instead, free variation is observed. As a result, words like "चांदी" (chāndī), "चाळण" (chāḷaṇ), and "चवळी" (chavaḷī) are pronounced as "चांदि" (chāndi), "चारनि" (chārni), and "चवरि" (chavari) respectively.
The Powari dialect does not have the "ण" (ṇa) sound. As a result, words like "बाण" (bāṇa) become "बान" (bāna), and "वेणी" (veṇī) becomes "बेनी" (benī).
In the Powari dialect, words that start with the vowels "ए" (e) and "ओ" (o) are prefixed with the vowels "य" (ya) and "व" (va) respectively. As a result, words like "एक" (eka) become "येक" (yeka), and "ओठ" (oṭha) becomes "वठ" (vaṭha).
The Powari dialect has two genders: masculine and feminine. Words that are neuter in Marathi are masculine in Powari. For example, "आंगन" (āṅgana), "कनिस" (kanisa), and "घुबड" (ghubaḍa) are masculine in Powari. On the other hand, words like "नाक" (nāka), "पदक" (padaka), and "परसाद" (parasāda) are feminine in Powari.
In the Powari dialect, nouns do not change form according to number. For example, "येक घर" (yeka ghara) means "one house," and "दुय घर" (duya ghara) means "two houses." The genitive case is formed by adding the suffix "को" (ko) to the noun. For example, "उनको नवकर" (unko navakara) means "their servant." The locative case is formed by adding the suffix "मा" (mā) to the noun. For example, "हातमा" (hātamā) means "in the hand."
The Powari dialect is being revived, and efforts are being made to promote it. The first All-India Powari Sahitya Sammelan (literary conference) was held in Tirora, Gondia, in February 2019. The second and third conferences were held in Nagpur, Maharashtra and Pandhurna, Madhya Pradesh, respectively. The President of these literary conferences were Adv.Lakhansingh Katre(myself) and Adv.Devendra Chaudhari. The fourth conference was held in Katangi, Balaghat, Madhya Pradesh, on December 24, 2023. The president of this conference was Dr.Dnyaneshwar Tembhare. The fifth conference is scheduled to be held in Bhandara in February 2025.
The Powari dialect, which was previously only a spoken language, is now becoming a written language due to wide-ranging impact of globalization. As a result, it is contributing new words to standard languages like Marathi and Hindi, making them stronger and more enriched.
▪︎
[Special Note: The Powar community is primarily a warrior community, as evidenced by historical records. However, the Bhoyar/Pawar community, which is believed to be related to the Powars, is primarily an agricultural community, as per the British-era census. The Bhoyar/Pawar community, found in the districts of Wardha and Nagpur in Maharashtra, and Chhindwara and Betul in Madhya Pradesh, speaks a dialect called Bhoyari/Pawari, which is similar to yet distinct from Powari.
There are differing opinions on this matter, and each side claims to have historical evidence to support their claims. Therefore, it is up to researchers and scholars to investigate these claims further, historically, archeologically and scientifically.]
¤
(Word count: approximately 3290)
¤
@Adv.LakhanSingh Katre,
Borkanhar-441902, Distt.Gondia,
(Vidarbha-Maharashtra)
Mob. +917066968350
Email : lskatre55@gmail.com
¤
References:
---------------------
Dr.S.B. Kulkarni
Dr.Ganesh Devi
Dr.Dnyaneshwar Tembhere
Late Jaypalsingh Patle
▪︎
Note: A Marathi condensed version of this article was published in the annual issue of marathi "Akshar Yatra" by Akhil Bharatiya Marathi Sahitya Mahamandal (2018-2019).
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment