एक आनंद यात्रा : बुलडाणा, दि.24.08.2019

बुलडाणा/दि.24.08.2019
~~~~~~~~~~~~~~
□एक आनंद यात्रा□
~~~~~~~~~~~~~
     2003 ते 2006 दरम्यान मी चंद्रपूर येथे DDR असताना बहुतेक वेळा मला बसने/एस्टीने चंद्रपूर ते नागपूर असा प्रवास करावा लागत असे . तो माझा आजवरचा शेवटचा बस/एस्टी प्रवास होता. अशा बस/एस्टी प्रवासाची एक वेगळीच मजा असते, पण ती मजा मी हरवून बसलो होतो. माझ्या कित्येक कविता आणि काही कथा/लेख याचे मूळ माझ्या अशा बस/एस्टी प्रवासाच्या अनुभवात ग्रथित(!) आहेत. बस/एस्टी च्या प्रवासात भेटणारे सहप्रवासी, ड्रायव्हर, कंडक्टर यांच्यातील संवाद, संभाषण मला नेहमी स्फूर्ती देत आले आहेत.
     परंतु माझ्या काही अपरिहार्य कारणांमुळे मला 2006 नंतर आजपर्यंत बस/एस्टी चा प्रवास करण्याची संधी उपभोगता आली नव्हती. (एका अपघातात मी काहीसा दिव्यांग झाल्याने व त्यानंतरच्या कँसरमैत्रीच्या कालावधीतील विविध शस्त्रक्रिया (एकूण आठ शस्त्रक्रिया) यामुळे मी बस/एस्टी ने प्रवास करण्याची संधी नाकारत होतो.) 
     पण यावेळी ही संधी उपभोगावीच या इराद्याने श्री.नरेंद्र लांजेवार यांच्याद्वारे आयोजित राज्यस्तरीय महिला साहित्य संमेलन, बुलडाणा येथे उपस्थित राहण्याचे ठरविले. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने मंडळाचा सदस्य या निमित्ताने मी या संमेलनात उपस्थित रहावे असे मंडळाच्या सभेत ठरल्याने माझी ती संधी कायम झाली. 
       दि.24.08.19 ला मी गोंदिया वरून महाराष्ट्र एक्सप्रेस ने मलकापूर पर्यंत आलो. आणि त्यानंतर मलकापूर ते बुलडाणा हा प्रवास एस्टीने करून मी ती संधी साधली. अर्थात खूप खूप खूप मजा आली. एस्टी मध्ये जागा धरण्याच्या प्रयत्नापासून गर्दीत बसमध्ये चढण्याची पूर्वीची सवय पुन्हा पुनरूज्जीवित करता आली. 
       या प्रवासासाठी मलकापूर येथील महेश अर्बन चे श्री.अग्रवाल यांची मदतही मिळाली. खूप दिवसांनी प्रवासाचा खरा(!!!) आनंद अनुभवता आला. आणि या प्रवासात काही "लेखन-बीज" सुद्धा सापडलेत, ते केव्हातरी उपजतीलच !
       त्याबद्दल प्रगती वाचनालय, बुलडाणा, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, नरेंद्र लांजेवार व चमू यांचा मी आभारी आहे व राहीन.
¤¤¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
(बुलडाणा, 24.08.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन