मी : एक निवृत्त डीडीआर
*मी* : *एक निवृत्त डीडीआर*
~~~~~~~~~~~~~~~~~
MPSC उत्तीर्ण झाल्यावर तत्कालीन DTO ह्या माझ्या प्रथम पसंतीच्या पदभरतीला मा.उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असल्याने दुसऱ्या/तिसऱ्या पसंतीचे पद स्वीकृत करणार किंवा कसे, अशा आशयाची, MPSC कडून मला विचारणा झाली होती. मी तेव्हा (1983-84) देवरी येथील जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे गणित-विज्ञानाचा शिक्षक म्हणून कार्यरत होतो. देवरी येथेच हायवे (तत्कालीन नंबर 6, आताचा नंबर 53) वर RTO चे चेकपोस्ट होते. (आजही आहे.) तिथे जाऊन DTO बद्दल व तद्विषयक न्यायालयीन स्थगनादेशाच्या निर्णयाबद्दल विचारणा केली असता, मला तेथील कर्मचाऱ्यांद्वारे दुसर्या-तिसऱ्या पसंतीचे पद स्वीकृत करण्याचा सल्ला देण्यात आला. कारण तेथे कार्यरत असलेल्या वाहतूक निरीक्षकांनी, त्यांना पदोन्नती न देता डायरेक्ट DTO घेण्याला मा.उच्च न्यायालयात विरोध करणारी याचिका केली होती व ते त्यात जिंकणारच असा त्यांचा होरा होता. (यापूर्वी बीडीओ, सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर, असिस्टंट रेल्वे स्टेशन मास्टर, एसटीत एटीएस ह्या पदांसाठी माझी निवड होऊनही मी ती पदे नाकारली होती व सोबतच वयही वाढत होते.) अखेर सर्व संबंधितांशी चर्चा करून मी सहायक निबंधक, सहकारी संस्था हे पद स्वीकृत करण्याचा माझा मानस MPSC ला कळवला.
त्याबरहुकुम विविध प्रक्रियेतून पार होऊन मी दि.05 मे 1984 ला तत्कालीन कृषी व सहकार विभागातील परिविक्षाधीन सहायक निबंधक, सहकारी संस्था, असे लांबलचक नाव असलेल्या वर्ग-2, राजपत्रित पदावर, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, भंडारा यांच्या कार्यालयात रुजू झालो.
अखेर एकदाचा, सुमारे 19 वर्षाच्या सफल व निष्कलंक अशा प्रदीर्घ कालावधीनंतर पदोन्नती होऊन, दि.08 मार्च 2003 ला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर म्हणून रुजू झालो. आणि त्याच पदावर दि.28 फेब्रुवारी 2013 ला जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, यवतमाळ या पदावरून निवृत्त झालो. या सुमारे तीस वर्षांच्या सेवाकाळात फक्त एकच पदोन्नती मिळाली असली तरी कोंकण व खान्देश वगळता उर्वरित, जवळपास सर्वच, महाराष्ट्रात नोकरीचा अनुभव घेता आला. माझ्या साहित्य विषयक जाणीवांना खाद्य पुरविणारे कित्येक स्थानीय अनुभव सुद्धा घेता/जपता आले.
गोड-कटू अनुभव खूप आले, या तीस वर्षांच्या सेवाकाळात. (यात खूप सारे between the lines अनुभव आणि काही ups & downs सुद्धा आहेतच!) पण असे असले तरी आजची सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाची एकूणच (तालुका ते राज्यस्तरीय) "अवस्था" बघता मी 2/2013 मध्येच निवृत्त झालो, याचे साधार समाधान वाटते. आज सहकार आयुक्त सारख्या, सम्यक व शाश्वत विकासाचा पायाभूत घटक असलेल्या, महत्त्वपूर्ण पदाचेही जे अवमूल्यन झाले/होत आहे, ते पाहण्याच्या दुर्भाग्यापासूनही मी सुटलो/वाचलो, याचेही समाधानच आहे.😅😅😅 (#363)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
निवृत्त डीडीआर, (बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया)
02 एप्रिल 2024.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment