मी : एक उत्तरार्थी
*मी : एक उत्तरार्थी*
~~~~~~~~~~~~~
>> मी 1966-67 या शैक्षणिक वर्षात सहाव्या वर्गात शिकत असताना आमच्याकडे रेडिओ आला. आमच्या गावातील लोक अक्षरशः रेडिओ बघायला(!) आमच्या वाड्यात गर्दी करत असत, असा तो काळ होता. मला लवकरच तत्कालीन रेडिओ सिलोन आणि विविधभारती ऐकण्याची जणू लतच लागली होती. रेडिओ सिलोन वरील अमीन सयानी सादर करीत असलेला बुधवार रात्रीचा बिनाका गीतमाला हा कार्यक्रम ऐकणे जणू काही मला अनिवार्यच झाले होते. मी माझ्या स्मरणवहीत प्रत्येक आठवड्यातील बिनाका गीतमाला मध्ये वाजलेल्या गीतांची नोंद करू लागलो. माझी ही सवय इतकी वाढली की मी रेडिओ सिलोन, विविधभारती व ऑल इंडिया रेडिओ वर वाजलेल्या प्रत्येकच सिनेगीताची, फिल्म/गीतकार/संगीतकार/गायक/गायिका अशी नोंद करू लागलो. यासाठी माझ्या सुमारे 10-12 वह्या कामी आल्या व अनायासेच माझ्याकडे हजारो सिनेगीतांची नोंद झाली. (आजही मी त्या वह्या सांभाळून ठेवल्या आहेत.)
>> त्याकाळी आमच्या गावातच नव्हे तर जवळचे शहर(?) आमगांव येथे सुद्धा एमबीबीएस डाॅक्टर उपलब्ध नसल्याने तत्कालीन आरएमपी, आयुर्वेदिक वैद्य अशांचीच वैद्यकीय मदत घेणे क्रमप्राप्त ठरत होते. त्यावेळी आमचे कौटुंबिक वैद्य सुद्धा जवळच्याच आसोली गावातील एक राजकीय व्यक्तिमत्व असलेले आयुर्वेदिक तज्ज्ञ जैपालसिंह गहरवार हेच होते. त्यांनी माझी रेडिओ-गिरी पाहिली आणि मला एक सल्ला दिला की, मी रेडिओ सिलोन व विविधभारती सोबतच बीबीसी लंडन ची हिंदी सेवा सुद्धा ऐकावी. त्यांनी तो रेडिओ स्टेशन मला लावून दिला व माझ्यासोबतच त्यांनी त्याचा आस्वादही घेतला. प्रारंभी प्रारंभी बीबीसी लंडन च्या त्या हिंदी सेवेतील शुद्ध स्वच्छ हिंदी भाषा व तेथील बातम्या, कार्यक्रम आदि माझ्या डोक्यावरून निघून जायचे व मला ते कंटाळवाणे वाटायचे. पण हळूहळू मी बीबीसी लंडन च्या हिंदी सेवेचा फॅनच झालो. 1969 मध्ये अमेरिकेचे अपोलो यान चंद्रावर पोचले, नील आर्मस्ट्राँग ने चंद्रावर पहिले पाऊल ठेवले, त्याचा साद्यंत असा संपूर्ण धावता आढावा मी बीबीसीवर ऐकू शकलो, ही माझी अनमोल ठेवच ठरली, माझ्या पुढच्या आयुष्यात. आणि सुमारे 1990 पर्यंत मी बीबीसी हिंदी सेवेचा नियमित श्रोता राहिलो. दरम्यान माझा मित्र गिरीन दवे याचे आणि माझे कितीतरी पत्र बीबीसीवर वाचले गेले. याच दरम्यान व्हाॅईस ऑफ अमेरिका आणि रेडिओ दाॅयचेवेली (उच्चाराबद्दल साशंक आहे!) यांचाही फॅन श्रोता राहिलो, तेथेही माझे काही पत्र वाचले गेले. असा माझा संक्षिप्त रेडिओ-प्रवास माझ्या एकूणच जडणघडणीत महत्वाची भूमिका निभावणाराच ठरला आहे.
>> मी माझ्या तत्कालीन अकरावी/हायर मॅट्रीकपर्यंत माझ्या छोट्याशा खेडेगावातच वास्तव्याने असलो व त्यावेळी गोंदिया सुद्धा माझ्या दृष्टीने जणू विदेशच वाटत असला तरी वरीलप्रमाणे रेडिओ मैत्रीमुळे माझे सामान्यज्ञान व तत्संबंधित माझी आकलन शक्ती मात्र मी अद्ययावत ठेवू शकलो होतो. ज्याचा मला पुढे एमपीएससी, युपीएससी, स्टाॅफ सिलेक्शन कमिशन, ... वगैरेंच्या प्रतियोगिता परीक्षांत भरपूर फायदाच झाला व मी कोणत्याच प्रतियोगिता परीक्षेत नापास होण्यापासून वाचू शकलो, हे ही नसे थोडके!
>> माझ्या अशाच आडव्यातिडव्या जीवनप्रवासात मी पदवीपर्यंत मूलतः गणित, भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा विद्यार्थी असलो तरी मानसशास्त्र, अध्यात्म, हिंदू पौराणिक/धार्मिक ग्रंथ, शिव स्वरोदय शास्त्र, बायबल, पवित्र कुराण, योगशास्त्र, विधीशास्त्र, शिक्षणशास्त्र, मराठी व हिंदी भाषा साहित्य, इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राजनितीशास्त्र, ज्योतिषशास्त्र, मंत्रशास्त्र, आयुर्वेद, होम्योपॅथी, फ्लाॅवरपॅथी, पुरातत्व, सहकारशास्त्र, सभाशास्त्र, संगणकशास्त्र, वाणिज्यशास्त्र, अंकेक्षणशास्त्र, बँकिंग, व्यवस्थापनशास्त्र, संवादशास्त्र, स्वभावशास्त्र, जैन व बौद्ध तत्त्वज्ञान, ... इत्यादी इतर विषयांचाही मी अल्पस्वल्प अभ्यासक/विद्यार्थी राहिलो आहे. त्यामुळे पुष्कळदा माझी "भाराभर चिंध्या एक ना धड" किंवा "Jack of all but master of none" सारखी अवस्थाही होत असते.
>> माझ्या अशा या आडव्यातिडव्या, उभ्या-समांतर जीवनप्रवासातील स्वानुभव आपल्या शाळेतील/महाविद्यालयातील काही उत्सुक विद्यार्थ्यांसोबत शेअर करून त्यांच्या/विद्यार्थ्यांच्या विविधांगी सुजाण व सभ्य प्रश्नांचा *मी उत्तरार्थी* व्हावा अशी माझी इच्छा आहे. यास्तव हा प्रस्ताव आपल्यापुढे ठेवत आहे. निर्णय घेऊन तसे मला कळविल्यास मी पुढची पायरी कशी आक्रमायची त्याची दिशा ठरवू शकेन.
¤आपला,
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया. (18.08.2022)
चलभाष : 7066968350//8208557164,
व्हाॅट्सॲप : 9665041483,
ईमेल : lskatre55@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment