माझी आई : सौ.कमलाबाई

*माझी आई : सौ.कमलाबाई*
~~~~~~~~~~~~~~~
>> माझ्या आईचे लग्नापूर्वीचे व लग्नानंतरचेही नाव कमलाबाई. 16 मार्च 1931 ला गोरेगांव तालुक्यातील धुंदाटोला येथे रूपराम पाटील रहांगडाले यांच्या घरी जन्मलेली माझी आई 1942 मध्ये मोहनलाल कटरे यांच्याशी लग्न होऊन बोरकन्हारवासी झाली. गोरेगांव तालुक्यातीलच दवडीपार येथे तिचे चौथीपर्यंत शिक्षण झालेले. मराठी आणि गणितात तिचा विशेष हातखंडा. मलाच नव्हे तर माझ्या सर्वच वर्गमित्रांना आमच्या आठवीपर्यंतचे गणित सोडवण्यात आईने मदत केलेली. कोणतेही गणित चुटकीसरशी सोडवण्यातील तिची गती आम्हाला आश्चर्यचकित करणारीच. नववीपासून आम्हाला इंग्रजी माध्यमातील न्यू मॅथ्स सुरू झाल्यानंतर मात्र आमचा गणितासाठीचा आईच्या मागचा ससेमिरा सुटला. 

>> मराठीतील कितीतरी कविता तिला अखेरपर्यंत मुखोद्गत होत्या. त्या कविता ती गाऊन दाखवी. तिला वाचनाचीही खूप आवड होती. तिने आमच्याघरी पांडवप्रताप कथासार, रामविजय कथासार, प्रेमसागर, स्त्री सुबोधिनी सारखी मराठी व हिंदीतील पुस्तके जमवली होती. ही सर्व पुस्तके तिने माझ्या चौथीपर्यंतच माझ्याकडून वाचून घेतली होती. त्यामुळेच मला वाचनाचा जणू भस्म्यारोगच जडला. आज माझ्या वैयक्तिक ग्रंथसंग्रहात मराठी, हिंदी, इंग्रजी व संस्कृतातील सुमारे दहा हजार ग्रंथ आहेत. मी 56 (मराठी, हिंदी, इंग्रजी) नियतकालिकांचा वैयक्तिक वर्गणीदार-वाचक आहे. अशी माझी सदैव अतृप्त वाचनभूक ही माझ्या आईचीच देण. 

>> मी माझ्या वयाच्या 19व्या वर्षी आईला खोटेच सांगून रायपूरच्या विवेकानंद आश्रमात संन्यास घेण्यासाठी निघून गेलो होतो. परंतू तेथील प्रमुख महंतांनी मला समजावुन परत पाठवले. परत येऊन मी आईसमोर हे सर्व सांगितले. तेव्हा तिने मला देवघरात एक शपथ घ्यायला लावली की, मी यापुढे कधीही खोटे बोलणार नाही. आजही मी त्या शपथेला जपून आहे. आज मी जो काही आहे, त्याचे बहुतांश श्रेय माझ्या आईला आहे, यात शंकाच नाही. 

>> अशी माझी आई, सौ.कमलाबाई, दि.30 जानेवारी 2014 ला वयाच्या 83व्या वर्षी वयोमानानुसार निसर्ग-शरण झाली. तरी आजही ती माझ्या भावविश्वात जीवंतच आहे, मला मार्गदर्शन करीतच आहे. माझी नात अभीज्ञाच्या रुपात ती पुन्हा माझ्या जीवनात आली, असेच मला वाटते.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त जिल्हा सहकार निबंधक)
बोरकन्हार, जि.गोंदिया.
(06/05/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन