||भयंकर : एक नवाळा* जुना शब्द||
||"भयंकर" : एक नवाळा* जुना शब्द||
~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> 1977 मध्ये मी B.Sc.(PCM) झालो. Physics च्या एका प्राध्यापकाच्या कुत्सित, अवकृपेने M.Sc(Phy.) ला प्रवेश मिळण्यापासून फक्त 1 मार्क कमी पडल्याने M.Sc.चा नाद सोडून LL.B.ला प्रवेश घेतला व MPSC/UPSC च्या परीक्षांची तयारी सुरू केली. LL.Bचे वर्ग रात्री लागायचे व दिवसभर MPSC/UPSC च्या अभ्यासाला काही राबावे(?) लागत(?) नव्हते.
>> माझा एक मित्र शहीद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल, गोरेगांव (तत्कालीन जिल्हा-भंडारा) येथे Biology चा (विज्ञान) शिक्षक होता. त्यावेळी Maths Teachers ची सगळीकडे अक्षरशः चणचण(?) होती. त्या शाळेच्या मुख्याध्यापकांना माझ्या मित्राने माझ्याबद्दल सांगितले. मला त्या मुख्याध्यापकांचे बोलावणे आले. मी त्यांना भेटायला गेलो व माझ्या दिनक्रमाची माहिती दिली तथा शिक्षक होण्याची(?) माझी बिलकुल इच्छा नसल्याचे सांगितले. त्यावर त्यांनी सुचवलेला 'तोडगा' (10 ते 5 शाळा, सायं 6 ते 9 लाॅ काॅलेज व उर्वरित वेळ MPSC/UPSC च्या अभ्यासाकरिता!) मला पटला. मी तिथेच जि.प.,मु.का.अ. यांचे नावे अर्ज लिहिला व तो अर्ज मुख्याध्यापकांना सोपवला, बी.एससी. ची गुणपत्रिका वगळता अन्य कोणतेही डाक्युमेंट न जोडता !
>> आठच दिवसात मुलाखतीसाठी बोलावणे आले. डाक्युमेंट्स घेऊन मुलाखतीला हजर झालो. कार्यालयीन रेकाॅर्ड किपींग या विषयात जागतिक स्तरावर नावाजलेले अनिलकुमार लखीना C.E.O. होते. त्यांनी मुलाखत घेतली. आर्किमिडीजच्या सिंद्धांताबद्दल विचारले. मी गडबडलो, पण कसेतरी थातुरमातुर उत्तर दिलेच. आठच दिवसात आदेश येऊन मी शहीद जान्या तिम्या जि.प.हायस्कूल गोरेगांव येथे Maths Teacher म्हणून रूजू झालो.
>> एकदा मधल्या सुट्टीत चहा पितांना झालेल्या शिळ्या(?) चर्चेनुसार एका माजी मुख्याध्यापकांचा किस्सा रंगवून रंगवून सांगण्यात आला, तो असा...त्या मुख्याध्यापकांना राजीनामा देऊन निवडणूक लढवायची खुमखुमी होती. तेव्हा स्टाॅफ समोर बोलताना ते म्हणाले की, "मला 'फ्रंट इलेक्शन' लढायचे आहे." वास्तविक 'फ्रंट इलेक्शन' हे चूक असून त्यांनी 'नेक्स्ट इलेक्शन' म्हणायला पाहिजे होते. पण मुख्याध्यापक असूनही शुद्ध इंग्रजी बोलता येत नाही, हा त्या चुटकुल्याचा 'प्राण' होता. मला तेव्हाही चुटकुला सांगणाऱ्याची व त्या माजी मुख्याध्यापकाचीही "भयंकर" कीव आली. कारण जिथे आम्हाला आमची राजभाषा असलेली मराठी सुद्धा व्यवस्थित लिहिता/बोलता येत नसताना आम्ही परकीय भाषा असलेल्या इंग्रजीच्या तोडफोडीचीच अत्यधिक चर्चा करत असतो. असो.
>> हे आठवण्याचे कारण म्हणजे मित्रश्रेष्ठ श्री.भास्कर नंदनवार सरांनी नुकतीच 'भयंकर' या शब्दाबद्दलची टाकलेली एक पोस्ट. सरांना मला नम्रपणे सांगायचे आहे की सरजी आता 'भयंकर' हा शब्द खूप सपाट झालाय. आता कोणालाही भयंकर(?) राग येतो, भयंकर(?) वाईट वाटते, भयंकर(?) आनंद होतो, भयंकर(?) आश्चर्यही वाटते, इ.इ.!!! त्यामुळे सरजी आता 'भयंकर' शब्दाचा अर्थ शोधण्यासाठी एखाद्या 'भयंकर'(?) शब्दकोशाची आवश्यकता पडत नसावी, असे वाटते. भूल-चूक क्षमस्व.
¤
(*नवाळा = अगदी नवा/अनोळखी(?)/ (झाडीबोलीतील शब्द)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे.
बोरकन्हार, जि.गोंदिया (झाडीपट्टी)
(02.05.2017/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment