गडचिरोली जिल्ह्याचा अवाढव्य विस्तार : एक स्वानुभव

गडचिरोली जिल्ह्याचा अवाढव्य विस्तार : एक स्वानुभव 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
      1987 च्या जानेवारी ते डिसेंबर पर्यंत मी गडचिरोली जिल्ह्यातील वडसा(देसाईगंज) येथील सीबीएफ (Cattle Breeding Farm) येथे दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व सहकार विषयक एका दोनवर्षीय पदविका अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना सहकार : संकल्पना व इतिहास, सहकारी कायदा, अंकेक्षण, बँकिंग, लेखापद्धती हे विषय शिकविण्यासाठी डेप्युटेशन वर कार्यरत होतो. 
       त्यावेळेस माझ्या एक वर्ष वयाच्या मुलाच्या हेमेनजोयमाच्या कठीणतम शस्त्रक्रियेनंतरच्या फाॅलोअप साठी मला दर महिन्यात त्याला नागपूर येथील शासकीय मेडिकल रुग्णालयात न्यावे लागे. त्यामुळे मी विनंती करून सदरील डेप्युटेशन वरील पोस्ट मागून घेतली होती. 
       तत्कालीन मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर हे अकस्मात बदलले गेल्याने त्यांचा Brain-Child असलेला हा दुग्ध व्यवसाय व्यवस्थापन व सहकार विषयक पदविका अभ्यासक्रम शासनाने बंद केला. पर्यायाने डिसेंबर 1987 मध्ये माझे स्थानांतर अपरिहार्य ठरले. 
        मला अजूनही माझ्या मुलाच्या तब्येती संबंधाने वैद्यकीय सल्ल्यासाठी दर महिन्यात नागपूरला जावे लागतच होते. म्हणून मी नागपूरच्या जवळपास मला पोस्टिंग देण्याबाबत विनंती केली. माझ्या या विनंतीस मान(?) देऊन पुणे येथील आमच्या मुख्यालयाने, सहकार आयुक्त कार्यालयाने माझे स्थानांतर "गडचिरोली जिल्ह्यातच/जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच" म्हणून सिरोंचा येथे केले. 
        पुणे येथील मुख्यालयात ठाण मांडून बसलेल्या आमच्या दृढमूल अधिकाऱ्यांना गडचिरोली जिल्ह्याच्या अवाढव्य विस्ताराची (वडसा ते सिरोंचा चे अंतर सुमारे 300-350 किमी तथा सिरोंचा ते नागपूर चे अंतर सुमारे 300 किमी असल्याची) व सिरोंचा ते नागपूर येथील तत्कालीन अशक्यप्राय दळणवळण/प्रवासाच्या वस्तुस्थितीची जाणीवच नव्हती. असा आमचा गडचिरोली जिल्हा नेहमीच पुणे, मुंबईतील संस्थानिकांद्वारे दुर्लक्षितच राहिला असून आजही हीच वस्तुस्थिती कायम आहे. किमान नकाशावरून तरी आमच्या गडचिरोली जिल्ह्याच्या अवाढव्य विस्ताराचा पुणे-मुंबई येथील संस्थानिकांना थोडासा बोध घेता यावा असे वाटून गेल्यानेच हे अरण्यरुदन!
@ॲड.लखनसिंह कटरे
निवृत्त डीडीआर, बोरकन्हार.
(06.01.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन