अंधश्रद्धा म्हणावी की आणखी काही?

*अंधश्रद्धा म्हणावी की आणखी काही?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
       07 जानेवारी 2022 ला आमच्या गावातील माझ्या घराशेजारील एका पुरुष व्यक्तीचे निधन झाले. ही व्यक्ती माझ्याहून चार-पाच वर्षांनी लहान असली तरी दीर्घ आजाराचे निमित्त होऊन ह्या व्यक्तीची देहातून सुटका झाली. जमलेल्या मंडळींनी, आमच्या भागात प्रचलित असलेल्या पं.बाबूलाल चतुर्वेदी यांच्या भुवन विजय पंचांग या हिंदी कॅलेंडरचे अवलोकन केले असता 05 जानेवारीच्या रात्री 11:55 वाजतापासून 10 जानेवारीच्या दुपारी 12:32 वाजेपर्यंत "पंचक" असल्याचे दिसून आले. म्हणजेच सदरील व्यक्तीचे निधन पंचकात झाले, असा निष्कर्ष निघाला. 
       या "पंचक" बद्दलची जनमान्यता अशी की, पंचकात एखाद्या व्यक्तीचे निधन झाल्यास पाठोपाठ गावातीलच आणखी किमान पाच व्यक्तींचे सुद्धा निधन होते. म्हणून अशा "पंचकात" निधन पावलेल्या व्यक्तीसोबत कणकेचे पाच पुतळे तयार करून त्यांचाही अंतिम संस्कार करण्यात येतो. त्यामुळेच तेथेही तशी व्यवस्था करण्यात आली.
       त्याचदिवशी संध्याकाळीच आणखी एक सुमारे पन्नासेक वर्षे वयाची व्यक्ती निधन पावल्याचे कळले. या दोन्हींचे अंतिम संस्कार दुसर्‍याच दिवशी करण्यात आले.
      परंतु आमच्या गावातील ही निधन-प्रक्रिया इथेच न थांबता आज 28 जानेवारी अखेर आमच्या या छोट्याशा गावातील एकूण सहा व्यक्तींचे निधन झाले आहे. यात किमान शंभर वर्षांचा रेकॉर्ड कायम करेल अशी गावभरच्या लोकांना खात्री असलेल्या आमच्या गावातील एका सर्वात वयोवृद्ध (वय वर्षे 94) अशा धडधाकट असलेल्या व्यक्तीचाही समावेश आहे. 
        मी फेब्रुवारी 2013 ला निवृत्त होऊन माझ्या गावी कायम निवासासाठी परतलो त्याला आता नऊ वर्षे होत आहेत. या नऊ वर्षांत मला माझ्या गावात तीनेक वेळा असा "पंचकानुभव" आलेला आहे. मी माझ्या तरुणपणापासूनच अंधश्रद्धेचा घोर विरोधी असून माझ्या शिक्षकीय कालावधीत (1978-1984) मी माझ्या विद्यार्थ्यांसमोर सुद्धा तत्संबंधित काही प्रयोग (ज्यांना आज कदाचित दुस्साहसच म्हणावे लागेल) केले होते. 
       असे असले तरी मला हे प्रत्यक्षातील (गुढ?) "पंचकानुभव" परिभाषित करता आले नाहीत/येत नाहीत. एखाद्या जाणकाराने यावर साधार, वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रकाश टाकल्यास मला आनंदच होईल. 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(28/01/2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)