एक वाढदिवस (अपघाताचा) असाही...!

●एक वाढदिवस (अपघाताचा) असाही...!●
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
           आजपासून बरोबर 13 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी  (18 जाने. 2009ला ) गडचिरोली येथे शासकीय कामानिमित्त दौऱ्यावर असतांना माझा मोठा/जीवघेणा अपघात झाला व त्यात माझा डावा हात पूर्णतः (Brachial Plexus Injury ने) नेहमीसाठी दिव्यांग (!!!!!!) झाला. उपचारासाठी चंद्रपूर, नागपूर, चंद्रपूर असा तथाकथित(?) डाॅक्टरांच्या मोहजालात भटकत भटकत अखेर चंद्रपूर येथील माझे सन्मित्र डा.गाडेगोणे यांच्या उचित सल्ल्यानुसार पुणे येथील संचेती हाॅस्पिटल येथे डाॅ.अरुण भाटिया आणि डाॅ.आशिष बाभुळकर यांना शरण गेलो. दोन्ही डाॅक्टरांनी सुमारे तेरा तास यशस्वी शस्त्रक्रिया करून माझ्या छातीतील श्वास घेण्याला साह्यभूत ठरणाऱ्या एका लिगामेन्ट(!)चा मार्ग बदलून ती लिगामेन्ट माझ्या डाव्या हाताच्या एका अपघातग्रस्त लिगामेन्टशी जोडून दिला आणि सुमारे तीन-चार वर्षापर्यंत हळूहळू माझा पूर्णतः परावलंबी झालेला अपघातग्रस्त डावा हात अल्प प्रमाणात तरी स्वयंचलित होऊ शकेल अशी आशा जागवून दिली. सुमारे सहा महिने मी संचेती हाॅस्पिटल येथील उपचार घेत होतो. तेथील फिजिओथेरपिस्ट डाॅ.जेम्स आणि त्यांची चमू माझ्या त्या हातावर अतिशय तत्परतेने आणि सहृदयपणे विविध उपचार/प्रयोग करीत होते. सहा महिन्यानंतर मी स्वयंप्रेरणेने त्या डाव्या हाताचा फक्त अंगठा थोडाथोडा हलवू शकत होतो. उर्वरित हात पूर्णतः परावलंबी असल्याने त्याला गळ्यात पट्टा बांधून त्यात अडकवून ठेवावा लागे. अखेर निवृत्तीनंतर, 2013 च्या दिवाळीनंतर माझा तो गळपट्टा सुटू शकला असला तरी तो हात अजूनही मुख्यतः परावलंबीच आहे. माझा तो हात जरी परावलंबी असला तरी त्यामुळे मला कोणताही न्यूनगंड आलेला नाही, आणि याचे संपूर्ण श्रेय डाॅ.अरुण भाटिया, डाॅ.आशिष बाभुळकर, डाॅ.जेम्स यांनाच द्यावे लागेल. अजूनही डाॅ.अरुण भाटिया माझ्या संपर्कात आहेत. त्यांनी माझ्या या अपघातोपचार व त्यातील यश यावर एक 'पेपर' (लेख) वैद्यकिय पत्रिकेत प्रकाशित सुद्धा केलाय असे कळते. 
     अशी ही माझी अपघात व अपघातोपचार प्रक्रिया आज तेरा वर्षानंतरही मला माझी उमेद नवीकृत करून सावधान करीत असते.  
        जय हो !!!
@ॲड.लखनसिंह कटरे,
निवृत्त डीडीआर, बोरकन्हार, जि.गोंदिया.
(18 जानेवारी 2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन