कोकिला की कुहूक में.....
*कोकिला की कुहूक में....!*
~~~~~~~~~~~~~~~
>> 1965-66 दरम्यानची ही घटना असावी. मी पाचवी.किंवा सहावीत असेन, वय वर्षे 10-11वगैरे. माझा एक मावसभाऊ हायस्कूल शिक्षणासाठी आमच्या गावी, आमच्या घरीच रहायचा. त्याच्या गावापासून आमगांव पर्यंत फक्त गाडदान होती, कच्चा-पक्का कसाही रोड नव्हता आणि पावसाळ्यात ती गाडदानही उपयोगाची राहत नसे. आमचे गाव मात्र आमगांव-देवरी या तत्कालीन कच्च्या (का असेना) रोड(?)वर असल्याने बोरकन्हार ते आमगांव सायकलने जाणे-येणे सहज-सुलभ होते. म्हणून माझा तो मावसभाऊ आमच्या घरूनच त्याची शाळा करायचा.
>> एकदा त्याने कुठून तरी हिन्द पाॅकेट बुक्स चे एक हिंदी गीतांचे पुस्तक आणले. त्यात हिंदीतील मान्यवर गीतकार/कवी यांचे गीत संकलित केले होते. रामायण, महाभारतादि ग्रंथांचे माझे वाचन (त्या वयातही आईच्या कृपेने) हिंदीतूनच झाल्याने मी हिंदीशी परिचित होतोच. मी सुद्धा ते पुस्तक वाचले. त्यातील एक गीत मला खूप खूप आवडले. ते पूर्ण गीत आज आठवत नसले तरी सुरुवातीच्या दोन ओळी अजूनही आठवतात. कदाचित शब्द, लयादि अनुकूलतेमुळे मला ते आवडत असावे. मी पुष्कळदा ते गीत आपल्या भसाड्या आवाजात गातही असते.
>> माझ्यापेक्षा दीड-दोन वर्षे वडील असलेल्या माझ्या एका मैत्रिणीला हे गीत आवडू लागले व मला ती हे गीत म्हणायला लावायची व स्वतः सद्धा म्हणायची. गीताच्या प्रारंभीच्या त्या दोन ओळी अशा...
*कोकिला की कुहूक में तुमने पुकारा है,*
*जानता/जानती हूँ, यह बुलाने का इशारा है।*
>> या गीताचा मथितार्थ मला खूप उशीरा कळला व माझ्या त्या मैत्रिणीला मी माझ्या भसाड्या आवाजात म्हटलेले ते गीत का आवडायचे, हे सुद्धा हळूहळू(!) कळू लागले. आणि एक आणखी कळले की, (त्याकाळी सुद्धा) मुलींना जे लहान वयातच कळायचे ते कळण्यासाठी मुलांना मात्र आणखी काही वर्षे प्रतीक्षा(?) करावी लागायची.
>> 1965-66 मधील हे वास्तव(!) आज मात्र निव्वळ काल्पनिक वाटेल/वाटते. कारण आजच्या मुलां-मुलींबाबत मात्र असे सरसकट विधान(?) करता येणार नाही. अर्थात हे फक्त कालक्रमाचे एक आकलनच आहे, वैज्ञानिक संशोधन(?)😃😃😃 वगैरे नव्हे, हे सुज्ञ वाचकांस सांगणे न लगे!
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(26.01.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment