जाणिवेतील कर्कदंश, कविता संग्रह, 02.10.2000

*कवी लखनसिंह कटरे यांचा प्रभावी कविता संग्रह, "जाणिवेतील कर्कदंश"*(02.10.2000)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
*डाॅ.प्रभाकर चौधरी,* जळगांव, (02.06.2001)
~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> कवी लखनसिंह कटरे हे सहकार आणि प्रशासन क्षेत्रात असूनही सृजनशील असे गृहस्थ आहेत. कविता हा वाङ्मय पकार लेखनास अत्यंत अवघड असा असतो. अंतःस्फूर्ती आणि भाषेवर प्रभुत्व असेल तर काव्यनिर्मिती होते. लखनसिंह कटरे यांना याची पूर्ण जाणीव आहे. आपल्या अबोध मनात जे संचित साचलेले असते त्याचा आविष्कार त्यांनी आपल्या काव्यात अत्यंत प्रभावी(पणे) केला आहे. आपले विचार, कल्पना आणि भावना त्यांनी काव्यातून समर्थ शब्दांत आविष्कृत केल्या आहेत. 

>> कवी लखनसिंह कटरे यांची कविता बहुआयामी आहे. त्यांच्या कवितेचे विषय नानाविध आहे(त). वारा, पाऊस, घरटे, पक्षी, वडाचे झाड, शेतकरी, गाय, आंधळा अशा नव्या नव्या प्रतिमा ते उपयोजितात. अंधार ओसरी सारखी छान कविता वाचकाला सुखावते. एका गावाचेच, उध्वस्त गावाचेच चित्र कवी त्यातून रेखाटतात.
     दाटला अंधार अल्याड पल्याड 
     पडक्या घराची ओसरी ओसाड ||

>> ढग, वृक्ष, पक्षी, पाणी आणि शेत यांची शृंखला त्यांनी 'एक संदर्भ मालिका' या कवितेत अतीव सुंदरतेने मांडली आहे. हे निसर्गचक्र आहे. या निसर्गचक्रावरच मानवी जीवन अवलंबून असते. त्यांचा मानवी जीवनावर होणारा गडद प्रभाव या शृंखलाचित्रातून व्यक्त होतो, तो अतिशय विलोभनीय आहे.

>> परंपरेने कवितेची भाषा ही वेगळी आहे. लखनसिंह यांची कविता प्रतिमाजड जरी वाटत असली तरी ती आशयसंपन्न आहे. समाजातील दुःखाचे, विषण्णतेचे, कारुण्याचे, अवहेलनेचे, आणि एकूणच अपरिहार्यतेचे चित्र(ण) कवी कटरे यांनी भावविव्हळ शब्दांत केले आहे. एक नवे जग त्यांना अभिप्रेत आहे. जिथे कुणी कुणाला मागे खेचणार नाही, दंश करणार नाही, ईर्ष्या, चढाओढीपासून दूर असेल आणि तिथे असेल प्रेम, शांती आणि मंगलता. अशा नव्या जगाचा शोध घेण्याचा कवी लखनसिंह यांचा हा प्रयत्न आहे. जाणिव आणि नेणीव अशी दोन अंगे अनुभवाला असतात. हे 'जाणिवेतील कर्कदंश' आहेत. हे अधिक प्रहार करतात. मन खिन्न करतात. 
>> कवी लखनसिंह कटरे यांना खूप शुभेच्छा. 
@डाॅ.प्रभाकर चौधरी 
जळगांव, दि.02.06.2001
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन