...अना माझा ट्यूबलाईट पेटला!

...अना माझा ट्यूबलाईट पेटला ! (झाडीबोली)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

>  बात तसी बोहूत पुरानी आहे. (काहानी भी पुरानीच आहे.) तही मी सहावी-सातवीत असीन. आमच्या बोरकन्हार मंधी साडेपाच वर्गावरीच इस्कूल होता, त्यासाली. मूनस्यारी मी साडेपाच वर्गावरीच बोरकन्हारच्या इस्कूलात सिकूनस्यारी पुढच्या शिक्षणासाठी मी तीन किलोमीटरवरच्या अंजोराच्या इस्कूलात आठवीवरी सिकलू. त् सांगावाचा मुद्दा असा का, मी अंजोराच्या इस्कूलात सहावी-सातवीत असीन तही मी गुंड्या अना चंपी नावाचे दोन गावठी कुत्रे (एक कुत्रा अना एक कुत्री) पोसलू होतू.

>  मी मॅट्रीक होतवरी चप्पल जुते वापरत नोहोतू. नंगे पाव, पैदल आव-जाव असाच माझा खाक्या होता. मी अंजोराच्या इस्कूलात जात होतू तही माझे दोन्ही कुत्रे, गुंड्या अना चंपी, मालं इस्कूलात पोहोचवून देत, मंज्या माझ्यासंगा अंजोराच्या इस्कूलावरी येत अना मंग घरी वापस होत होते. असा त्याईचा रोजचाच दिनक्रम होता.

>  एक दिवस माझ्यासंगा इस्कूलात हे दोघेही कुत्रे आलेच नाही. खूब ढूंडलू, आवाज देलू पर काही त्याईचा पत्ता नाही लागला. मूनस्यारी मी त्यादिवसी एकटाच अंजोराच्या इस्कूलात गेलू.

>  दिवसबुळता घरी आलू अना पाहता तं ते दोन्ही कुत्रे बटे बाबूजीच्या खाटंखाल्या झोपूनस्यारी लाहाकत होते. मी त्याईलं जवर हाकललू, पर काही ते उठले नाही. 

>  मी हातपाय धुऊनस्यारी, नास्तापानी करूनस्यारी अनखी त्याईच्या जवर गेलू ना हाकलू लागलू. लाळीगोळी केलू तही कोठी, मोठ्या मुस्किलीना गुंड्या माझ्याजवर पुस्टी हालवत आला. पर चंपी काही जागची हालली नाही. 

>  मी गुंड्यालं इचारलू का अज तुम्ही दोघेही माझ्यासंगा काहून नाही आल्या मुहून. तं गुंड्या मानसावानी बोलू लागला अना म्हणाला, 'अज का नाही आम्हालं तणसीचा गाडा आणावाचा होता. मून आम्ही नाही आलून. गाडा झिकूनस्यारी आम्ही बिलकुल थकून गेलून, मूनस्यारी बाबूजीच्या खाटंखाली आराम करून राह्यलून.'

>  मी तं भाऊ हे आयकूनस्यारी चकितच झालू, चकरावूनच गेलू. कुत्र्याईना तणसीचा गाडा झिकला मंज्या कमालच झाली ना भाऊ !!! 

>  मी तडक आमच्या नवकराकठी गेलू अना त्यालं इचारलू का, कुत्र्याईना तणसीचा गाडा कसा कसा झिकला अना तू त्याईलं जूपलासच कसा गाड्यालं? मुहून! 

>  तही नवकराना सांगलन का, 'गाडा तं बैलाईनाच झिकला, गाड्यालं बैलच जुपलू होतू. पर गाड्याच्या खाल्या हे दोन्ही कुत्रे चालत होते. तं त्याईलं लागला असंल का गाडा त्याईनाच झिकला.'

 >  तही कोठी माझा ट्युबलाईट पेटला! 
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार, जि.गोंदिया 
(17.03.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन