सीता स्वयंवर (एक लघुकथा)
□सीता स्वयंवर (एक लघुकथा)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~
त्याचे असे झाले की, त्या गावात उत्तर प्रदेशातील एक रामायण मंडली आली होती. रोज रात्री ग्रामपंचायत समोरील पटांगणात ते रामायणातील एकेक प्रसंग अभिनित करायचे. अजूनही गावात रामायणचे भारूड आहेच, रोज चांगली गर्दी जमायची. आरतीमध्ये चांगली रक्कम जमा व्हायची, त्यामुळे मंडली खुश होती.
त्या रामायण मंडलीत एकूण दहा व्यक्ती होते, सहा पुरुष आणि चार महिला. मंडली-प्रमुख पुरुषाचे नाव होते बिभूतीप्रसाद पाण्डेय. त्याचे वय साधारणतः 60-65 वर्षाचे असावे, पण होता चांगलाच धष्टपुष्ट. तो मुख्यतः दशरथाची, जनकाची व रावणाची भूमिका करायचा. त्याची तीन मुले, अनुक्रमे रामजी, लछमन आणि भरतबाबू. रामजी आणि लछमन हे दोघेही विवाहित होते. त्यांच्या पत्नींची नावे अनुक्रमे सीता आणि उर्मी. भरतबाबू अविवाहित होता. रामजी हा मुख्यतः रामाची, तर लछमन मुख्यतः लक्ष्मण, हनुमान, सुग्रीव, बिभिषण, इंद्रजित अशा भूमिका करायचे. भरत हा ऑलराऊंडर होता, ऋषींच्या भूमिकाही तोच करायचा. बिभूतीप्रसाद ची पत्नी कौशल्या, कैकेयी, मंदोदरी आदि प्रौढ महिलांची भूमिका करायची. स्वैंपाकासाठी असलेली राधा ही मंथरादि गौण भूमिका करायची. सेवेसाठी असलेले दोन सेवक आवश्यकतेनुसार विविध भूमिका करायचे. सीता ही सीतेचीच तर उर्मी मुख्यतः उर्मिला, इंद्रजित ची पत्नी, ऋषीपत्नी अशा भूमिका करायच्या. रामायण पाठ व गायनासाठी एक लोकल गायक-वादक रोजंदारीवर ठेवला होता. दररोज रात्री 8 ते 12 अशी रामलीला चालायची. दर दिवशी एकेक प्रसंग करीत रामलीला सीता-स्वयंवर/रामलग्नापर्यंत आली.
एके रात्री राम-सीता लग्नाचा, सीता-स्वयंवराचा प्रसंग अभिनित करण्यात आला, त्या रात्री जणू सारा गावच रामलीला पहायला उलटला होता. लग्नानंतर सीतेला गावक-यांनी दिलेले आंदण पाहून/मोजून बिभूतीप्रसाद गदगद होऊन गेला. त्या रात्री त्या गावातील एक बेरोजगार तरुण रामलीला संपल्यानंतरही रात्रभर ग्रामपंचायतीच्या प्रांगणातच थांबला होता. मित्रांनी, घरच्या लोकांनी वारंवार सांगून/विणवूनही तो घरी गेला नव्हता. गेल्या काही महिन्यापासून तो जरा विचित्रच वागू लागला होता, मी पूर्वजन्मीचा शापित ऋषी आहे, असे तो सांगत असे. त्याने भगवा लेंगा व भगवाच कुर्ता असा वेष धारण करायला सुरूवात केली होती. एम.ए., बी.एड., एम.फिल., नेट करून व खूप सारे प्रयत्न करूनही त्याला नोकरी न लागल्याने त्याच्या डोक्यात फरक पडला असावा असा त्याच्या घरच्यांचा व गावक-यांचा कयास होता. म्हणून त्याला कोणी जास्तीचे हटकतही नसे.
सकाळ झाल्यावर रामायण मंडलीतील सारे झोपेतून उठले. त्यांची थांबण्याची सोय ग्रामपंचायतीच्या व्हरांड्यातच करून देण्यात आली होती. सीतेची भूमिका करणारी सीता गाऊनमध्येच ब्रश करीत बाहेर प्रांगणात टहलू लागली. तिला गाऊनमध्ये पाहून हा बेरोजगार तरुण धावतच तिच्या जवळ गेला व तिच्या पायावर लोटांगण घालून म्हणाला, "माते, तुम्हाला असे वस्त्र शोभा देत नाहीत, ताबडतोब राजवाड्यात जाऊन राजवस्त्र घालून घ्या." सीतेची भूमिका करणारी सीता तर घाबरूनच गेली, व "बचाव, बचाव" म्हणून ओरडू लागली. बिभूतीप्रसाद, रामजी, आदि धावतच बाहेर आले व त्या बेरोजगार तरुणाला समजावण्याचा प्रयत्न करू लागले. पण तो काही ऐकेना, त्याचा एकच सूर सुरू होता, "माते, .........."
इतक्यातच ग्रामपंचायतचा चपराशी तेथे आला व त्याने परिस्थिती नियंत्रणात आणून त्या बेरोजगार तरुणाला, नारायण त्याचे नाव, घरी पाठविले. नारायण घरी गेला व आपल्या आईला म्हणाला, "मायवो, ती सीतामाय तर गाऊन घालते, आणि मी सांगितले गाऊन बदलायला तरी न ऐकता मलाच तेथून हाकलून दिले." त्याच्या आईने त्याला कसेतरी समजावून शांत केले.
दुस-या रात्री सुद्धा सीता-स्वयंवर चा प्रसंगच लांबवण्यात आला, कारण काल रात्रीची आंदण-कमाई! या रात्री सुद्धा नारायण तिथेच थांबू इच्छित होता, मात्र नारायणला बळजबरीने त्याच्या घरी नेण्यात आले होते.
पुढच्या दिवशी दुपारचे जेवण झाल्यावर नारायण बाहेर पडला व तालुक्याच्या गावी काही पूजेचे सामान वगैरे आणायसाठी गेला. तेथे त्याने, रामायण मंडलीतील रामजी आणि त्याची पत्नी सीता यांना आधुनिक वेषात (रामजी जीन्स, टी-शर्ट मध्ये तर त्याची पत्नी सुद्धा टाईट जीन्स व टाॅप मध्ये) बाजारात बाईकने फिरताना पाहिले. व तो जणू बिथरलाच.
थोडावेळ तो शांतपणे बसून राहिला. मग हळूच उठून लोखंडाच्या दुकानात जाऊन एक दांड टाकलेला लोखंडी हातोडा व एक छन्नी विकत घेतली. व घरी परतला.
त्या रात्री तो रामलीला पहायला गेलाच नाही. घरीच राहिला. अर्ध्या रात्री घरचे लोक रामलीला पाहून परतले तेव्हा तो आपल्या खाटेवर झोपून होता. सर्व झोपी गेले.
सकाळी सकाळी गावभर गलबला सुरू झाला की, नारायण ने रामलीला मंडलीतील सीता आणि तिचा पती रामजी या दोघांना छन्नी-हातोड्याने ठोकून ठोकून मारून टाकले.
(शब्द संख्या सुमारे 540)
□
@लखनपाल सिंह कटरे "अपराधी"
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(चलभाष- 7066968350)/24.07.2019
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment