एक स्मरणगाथा : □मी एक शिक्षक : 04.10.1978 ते 05.05.1984

बोरकन्हार-441902,        दि.03.06.2019

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

□मी एक शिक्षक : 04.10.1978 ते 05.05.1984

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

      जीवनातील काही यु-टर्न, काही राईट/लेफ्ट-टर्न का/कसे घडतात, याचे तार्किक विश्लेषण आणि/किंवा कारणमीमांसा देणे शक्य नसते. त्या अनुषंगाने मी माझ्या जीवनाकडे मागे वळून पाहतो तेव्हा मला दिसून येते की, ......

      तत्कालीन अकरावी हायर मॅट्रीक च्या मार्च-एप्रिल 1972 च्या बोर्ड परीक्षेत (New Maths & Science या मुख्य विषयांसह) मी आदर्श विद्यालय आमगांव या माझ्या शाळेतून प्रथम श्रेणीत पहिला आलो होतो. त्यानंतर मी गोंदिया येथील धोटे बंधू सायंस काॅलेज मध्ये B.Sc.(PCM) च्या प्रथम वर्षात प्रवेश घेतला. दरम्यान डिसेंबर 1971 ते दिवाळी 1972 या कालावधीत मी टाॅयफाॅईड चा "मित्र" राहिलो असल्याने दिवाळीनंतरच काॅलेज मध्ये नियमित जाता आले. (हायर मॅट्रीक ची परीक्षा सुद्धा या मित्राच्या सोबतीनेच दिली होती! आणि "त्या" दीर्घ मैत्रीचे दुष्परिणाम मी अजूनही सतत भोगत आहे!)

      मॅट्रीक मध्ये आम्हाला New Maths हे इंग्रजी माध्यमातून शिकविले गेले असले तरी काॅलेज मधील संपूर्ण इंग्रजी माध्यम मला सुरुवातीला जरा कठीणच गेले. आणि B.Sc. Part 1 च्या विद्यापीठीय परीक्षेत मला ATKT चा "लाभ"(?) मिळाला. तरी मी मुजोरी केली आणि Part 2 मध्ये प्रवेश न घेता एक वर्ष गॅप घेण्याचे ठरवले. असा एक वर्ष मी विनाकारणच वाया घालवला. Part 3 मध्ये असताना ऐन परीक्षेच्या दिवसात माझ्या परिवारात एक "भयंकर दुर्घटना" घडविण्यात(!) आल्याने मी पुन्हा अनुत्तीर्ण झालो. शेवटी मार्च-एप्रिल 1977 मध्ये तीन वर्षाची B.Sc.(PCM) ही पदवी मी पाच वर्षात "पटकावली"! 

       त्यानंतर संशोधन करण्याच्या दृष्टीने Physics मध्ये M.Sc. करण्याची माझी इच्छा होती. म्हणून मी नागपूर विद्यापीठात (PGTD) तसा अर्ज केला. पण फक्त एक गुण कमी पडल्याने मला Physics ऐवजी Maths मध्ये प्रवेश मिळू शकण्याचे कळविण्यात आले. मला Maths मध्ये कॅरियर करायचे नसल्याने मी नाईलाजानेच N.M.D.College, Gondia येथे LL.B.ला प्रवेश घेतला. (Physics मध्ये एक गुण कमी पडण्यामागे आमच्या पक्षपाती व चमचे बाळगणा-या Physics च्या Professor ची "अवकृपा" आडवी आली होती. ती एक वेगळीच "कथा" आहे. असो.)

       तर अशाप्रकारे मी विज्ञान क्षेत्राकडून अचानकच(?) विधीशास्त्राकडे वळलो. आमचे LL.B. चे वर्ग सायंकाळी सहा ते साडेनऊ असे होत असल्याने दिवसभर मी मोकळाच असे. मला वाचनाचा "भयंकर" नाद(!) असला व स्पर्धा परीक्षांचा अभ्यास असला तरी सुद्धा "वेळ घालवणे" कठीण जायचे व त्यामुळे मी गोंदिया येथील तत्कालीन तिन्ही सिने टाॅकीज चा नियमित प्रेक्षक झालो होतो. पर्यायाने खर्चात वाढ होऊ लागली, वडिलांना पैसे मागायला संकोच वाटू लागला. (तसा मी माझ्या चुलत भावासोबत माझ्या गावी आटाचक्की, किराणा दुकान, धानखरेदी सारखे व्यवसाय सुरू करून चांगलाच(!) "कमावता" झालो असलो तरी पैशाचे व्यवहार शेवटी वडिलांच्या मार्फत व त्यांच्या मर्जीनेच व्हायचे.)

      

      मे-जून 1978 मध्ये LL.B. Part 1 चा रिझल्ट आला. मी 61.5% गुण मिळवून प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. आता विधीशास्त्राची गोडी/आवड वाढू लागली. दरम्यान शासकीय कर्मचा-यांच्या दीर्घकालीन संप-कालावधीत फेब्रुवारी 1978 मध्ये महिनाभर मी SPP (Strike Period Personnel) म्हणून निवडणूकीचे कार्य केले. त्याचे फेब्रुवारी 78 च्या 28 दिवसांचे रु.700/- मिळाले. आणि त्यामुळे अराजपत्रित अशी कोणतीही नोकरी न करण्याची माझी भूमिका डळमळीत होऊन आपण सुरूवातीला मिळेल ती "नोकरी करावी'' अशी माझी मानसिकता तयार होऊ लागली. (1977 मध्ये B.Sc.झाल्यापासून मी MPSC ची परीक्षा देत आलोय. यश-अपयश येत गेले. 1978 मध्येच MPSC द्वारे निवड होऊ घातलेल्या B.D.O. च्या पदाला मी नकार दिला होता, कारण ते पद मला आवडतच नव्हते.) 

     त्याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या आणि खाजगी (सुद्धा) शाळेत गणित शिक्षकांची "चणचण" जाणवू लागली होती. सुमारे दर रविवारी मला कोणाकडून तरी "गणित शिक्षका"ची ऑफर यायची. पण अराजपत्रित पदावरील नोकरी करायचीच नाही आणि शिक्षकाची नोकरी तर बिलकुल करायची नाही, अशी माझी भूमिका असल्याने मी सर्व ऑफर नाकारले होते. पण फेब्रुवारी 1978च्या रु.700/- नी माझी मानसिकता बदलली, कारण त्यामुळे मला स्पर्धा परीक्षांकरिता वडिलांना पैशांसाठी त्रास द्यावा लागणार नव्हता. 

     माझे मित्र तत्कालीन विज्ञान शिक्षक व नंतरचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, (जिल्हा परिषद), स्व.सी.आय.पटले यांच्या सूचनेनुसार व शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज गोरेगांव चे प्राचार्य स्व.जी.डी.ठाकूर यांच्या आग्रहाने मी जि. प.भंडारा कडे गणित शिक्षकासाठी अर्ज केला. लवकरच मुख्य कार्यपालन अधिकारी (CEO) अनिलकुमार लखीना (शासकीय रेकाॅर्ड किपींग च्या लखीना पॅटर्न चे जनक/प्रवर्तक) या सनदी अधिका-यांनी माझा इंटरव्यू घेतला आणि मला गोरेगावच्याच शाळेत गणित शिक्षक (तत्कालीन नियम 3 B 1/ Purely Temporary) म्हणून नियुक्ति दिली. दि.04 ऑक्टोबर 1978 ते 31मार्च 1979 पर्यंत मी गोरेगांवच्या शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज मध्ये वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना ला गणित व विज्ञान आणि वर्ग 11,12 च्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या वेळेवरच्या आदेशानुसार कोणताही विषय शिकविण्याचे (की विद्यार्थ्यांना बिघडविण्याचे?) कार्य केले. शेवटी नियुक्ती आदेशातील अटीनुसार मी 31 मार्च 1979 ला सेवामुक्त झालो. सेवामुक्तीनंतरही प्राचार्यांच्या आग्रहाखातर दोन-तीन आठवडे निशुल्क (बिनपगारी) शिकविण्याचे कार्य केले. या कालावधीत दिवसा शाळेत शिकविण्याचे व सायंकाळी/रात्री काॅलेज मध्ये विधीशास्त्र शिकणे हे माझे दोन्ही उपक्रम एकसाथ सुरूच होते.

      शाळांच्या उन्हाळ्याच्या सुटीत दोन महिने आम्ही 3 B 1 चे शिक्षक सेवामुक्तच राहत असू आणि शाळा सुरू झाल्यावर आम्हाला कोणत्याही नवीन अर्जाशिवाय नव्याने नियुक्ति दिली जात असे. त्यानुसार मला 23 जून 1979 ला जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज देवरी या संपूर्ण आदिवासी बहुल विद्यार्थी असलेल्या, वन्यबहुल गावी नियुक्ती मिळाली व मी त्याच दिवशी देवरी येथे रुजू झालो. (तरी माझे LL.B. चे शिक्षण मात्र सुरूच होते. दिवसा शाळा आणि रात्री लाॅ काॅलेज असे माझे Up-Down सुरू होते.)

     त्यानंतर सुद्धा 3 B 1 ची ही नियुक्ती-सेवामुक्ती-नियुक्ती ची पद्धति सुरूच राहिली. जून 1980 मध्ये माझी नियुक्ति जिल्हा परिषद हायस्कूल कट्टीपार या पूल नसलेल्या नाल्यापलीकडील ठिकाणी झाली. ही नियुक्ती माझ्या लाॅ काॅलेज च्या व स्पर्धा परीक्षांच्या दृष्टीने एकदम विपरीत व गैरसोयीची असल्याने मी ही नियुक्ती आठवडा भरातच बदलून पुन्हा देवरी येथेच रुजू झालो. आणि दि.05 मे 1984 पर्यंत देवरी येथे प्रथम श्री.जी.के.झा सर आणि नंतर स्व.जगदीश मिश्रा सर या दोन कार्यसम्राट व विद्वान प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली वर्ग 5 ते 8 च्या हिंदी व इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान, वर्ग 8 ते 10 च्या विद्यार्थ्यांना मराठी माध्यमातून गणित व विज्ञान आणि वर्ग 11,12 च्या विद्यार्थ्यांना प्राचार्यांच्या वेळेवरील सूचनेनुसार कोणताही विषय शिकविण्याचे (की विद्यार्थ्यांना बिघडवण्याचे?) कार्य केले. या दरम्यान नियम 3 B 1 चा फायदा घेत MPSC आणि इतर यंत्रणे द्वारे निवड झाल्यानुसार विविध नोक-या (आठ ते पंधरा दिवस : वेतन न उचलता) केल्यात. दरम्यान LL.B., B.Ed., M.A. या पदव्याही प्राप्त केल्यात. 

     शेवटी MPSC द्वारे महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग (तत्कालीन कृषी व सहकार) विभागात सहायक निबंधक या तालुका स्तरीय राजपत्रित पदावर झालेल्या नियुक्ती मध्ये स्थिरावण्यासाठी दि.05 मे 1984 ला शिक्षकी पेशाला शेवटचा रामराम केला. (मी शिक्षकी पेशा नाखुशीने स्वीकारला होता पण अखेर मी त्या पेशाच्या प्रेमातच पडलो होतो! म्हणूनच शिक्षकी पेशाच्या पाशातून सुटायला मला जरा उशीरच झाला. त्या "सुटण्या"ला माझ्या बहुतांश सहशिक्षक मित्रांची "अशैक्षणिक" वृत्ती सुद्धा कारणीभूत होती, हे नाकारता येणार नाही.) दरम्यान D.B.M., H.D.C.M., G.D.C.&A., D.I.T. अशा पदव्या/पदविका प्राप्त केल्यात. आणि त्याच सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा जिल्हा प्रमुख अधिकारी म्हणून दि.28 फेब्रुवारी 2013 ला निवृत्त झालो. (शब्दसंख्या सुमारे 825)

इति शम | 

(स्मरण, विस्मरणासह आठवले तसे!)

@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, जि.गोंदिया. 

(03 जून 2019)

~~~~~~~~~~~~~~\~\~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन