*उजाखो*त्तर वास्तव (?)*
*उजाखो*त्तर वास्तव (?)*
~~~~~~~~~~~~~~
एमपीएससीच्या प्रतियोगिता परीक्षेची प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडून मी मे-1984 मध्ये महाराष्ट्र शासनाच्या तत्कालीन कृषी व सहकार विभागात तालुका सहायक निबंधक, सहकारी संस्था या राजपत्रित तालुका प्रमुख पदावर रुजू झालो. नियमित पदोन्नतीसाठी (आमच्या संपूर्ण बॅचला) मा.सुप्रीम कोर्टापर्यंत लढा दिल्यावर 19-20 वर्षांनंतर माझ्यासहित आमच्या बॅचच्या अधिकाऱ्यांना प्रथम पदोन्नती मिळू शकली.
पदोन्नतीनंतर मी, महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात (विभागाच्या शिर्षात तोवर बदल झाला होता) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था या राजपत्रित जिल्हा प्रमुख पदावर मार्च 2003 मध्ये रुजू झालो. आणि अखेर 10 वर्षानंतर फेब्रुवारी-2013 ला नियत वयोमानानुसार त्याच प्रथम पदोन्नत पदावर निवृत्त झालो.
माझ्या एकूण सुमारे तीस/30 वर्षांच्या शासकीय राजपत्रित सेवेत मला सुमारे चोवीस/24 वर्ष आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित अशा तालुक्यात/जिल्ह्यात तालुका/जिल्हा प्रमुख म्हणून प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळाली. या 24 वर्षांपैकी 14 वर्ष तालुका प्रमुख तर उर्वरित 10 वर्षे जिल्हा प्रमुख म्हणून आदिवासीबहुल व नक्षलप्रभावित तालुक्यात/जिल्ह्यात काम करताना नक्षलप्रभावाचा अगदी प्राथमिक स्वरूपाचा असा जवळून प्रत्यक्ष अनुभव घेता आला, नक्षलप्रभावाचा फर्स्ट हँड अभ्यासही करता आला.
माझ्या या एकूण 24 वर्षांच्या नक्षलप्रभावाच्या विविध अंगाचा व वैशिष्ट्या(?)चा फर्स्ट हँड अनुभव घेऊन अभ्यास करताना मला जे प्रत्यक्षात दिसले/जाणवले/समजले त्यावर माझ्या स्वानुभवाधारित विश्लेषणाची माझ्या काही तत्सम लेखांतून व/वा मुलाखतीतून मी मांडणी करतो तेव्हा फक्त पुस्तकी/ऐकीव/मिथकीय माहितीच्या आधारे नक्षलप्रभावाचे भाष्यकार झालेले तथाकथित प्रतिक्रियक, त्यावर जे विचार/प्रतिक्रिया/अभिप्राय व्यक्त करतात, ते जाणून/वाचून मला रामदास स्वामीकृत ''दासबोध" मधील 'अभ्यासोनी प्रकटावे...' या सूत्राची आठवण जागी होऊन आजच्या उजाखो*त्तर व सत्योत्तरकालीन संगणकीय युगातील कृत्रिम बुद्धिमत्तामय भाष्यकारांच्या उथळपणाचे प्रत्यक्ष(!) दर्शन होऊ लागते. असो.
याच प्रचलनाला कदाचित आजकाल अभ्यासक/विचारक/संशोधकांची परिभाषा लागू होत असून सच्च्या अभ्यासक/विचारक/संशोधकांना अडगळीत ढकलले जात असावे असे मला वाटून जाते. खरे-खोटे कोण जाणे !!!!!!!
¤
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर), बोरकन्हार-441902,
जि.गोंदिया (25.06.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment