धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?)
*धर्मनिरपेक्षता : एक वदतोव्याघात संज्ञा(?)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भारतीय संस्कृतीद्वारे परिभाषित 'धर्मा'च्या संकल्पनेनुसार कोणीही, कधीही, कुठेही 'धर्मनिरपेक्ष' राहूच शकत नाही.
पाश्चात्य व/वा इतर अ-भारतीय रिलीजन्सच्या दृष्टिकोनातून कदाचित कोणी रिलीजननिरपेक्ष असूही शकेल, पण धर्मनिरपेक्ष हा शब्द, भारतीय संस्कृतीतील धर्म या संज्ञा-संकल्पनेच्या परिघात, संपूर्णतः वदतोव्याघातच ठरत असून, धर्म या भारतीय संस्कृतीतील संज्ञा-संकल्पनेबद्दलच्या अज्ञानाची री ओढण्याचे द्योतकच आहे.
भारतीय संस्कृतीतील धर्माच्या संज्ञा-संकल्पनेच्या प्रकाशात कट्टर नास्तिक व्यक्ती सुद्धा धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही/नसतोच. कारण भारतीय संस्कृतीद्वारे परिभाषित धर्माच्या आचरणाशिवाय कोणतीही व्यक्ती जिवंतच राहू शकत नाही. मृत्यूनंतरच मेलेल्याचे शव धर्मनिरपेक्ष राहू शकेल/शकते. जिवंत असेपर्यंत कोणालाच धर्माचरण/धर्मपालन चुकत नाही.
भारतीयच नव्हे तर पाश्चिमात्य तत्त्वज्ञ, विचारवंत, काही शास्त्रज्ञ यांनी सुद्धा डोक्यावर धारण करण्यायोग्य मानलेल्या/जाणलेल्या भगवद्गीता या महानतम ग्रंथात नमूद धर्म या संज्ञा-संकल्पनेची सोदाहरण परिभाषा सुस्पष्ट करण्यात आली आहे. त्याबरहुकुम सुद्धा भारतीय विचारविश्व आणि तद्विषयक संज्ञा-संकल्पनाविश्वाच्या परिघात धर्मनिरपेक्ष ही संज्ञा(?) पूर्णतः वदतोव्याघात (Self contradictory) ठरते.
असे असले तरी प्रेम, आदर, सद्भावना, द्वेषनिरपेक्ष अभ्यासू वृत्ती आदि सद्गुणांपेक्षा घृणा/द्वेष, अनादर आणि वैरभाव पसरवणे अधिक सहजसोपे ठरत असल्याची वृत्ती जोपासणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या तद्विषयक अनभ्यासामुळे व तद्जनित वृत्तीमुळे माझे वरील विश्लेषण समजून/उमजून घेताच येणार नाही याची मला नम्र जाणीव आहे. असो. असोच.
¤ (#205)
@खगेन्द्र मोहन ऊकाराव,
(05.11.2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment