जुने मिथक : नवा अन्वयार्थ (NEW)

*जुने मिथक : नवा अन्वयार्थ*  (NEW)
~~~~~~~~~~~~~~~~
      महाभारतातील एका(?) मिथक(!)कथेनुसार असे सांगितले जाते की, ---
     एका कोणत्यातरी यज्ञसमारंभात श्रीकृष्ण, युधिष्ठीर व दुर्योधन(सुयोधन!) एकत्र आले असता दुर्योधनाने श्रीकृष्णाला विचारले की, तो(दुर्योधन) आणि युधिष्ठीर हे दोघेही श्रीकृष्णाशी सारखेच संबंधित असतानाही श्रीकृष्णाचा कल युधिष्ठीराकडे नेहमीच झुकलेला का असतो. श्रीकृष्णाला मी(दुर्योधन) वाईट/दूरचा आणि युधिष्ठीर चांगला/जवळचा वाटतो, असा पक्षपात कां? 
     त्यावर दुर्योधन ला एका बाजूला नेऊन श्रीकृष्णाने त्याला सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी चांगले, सुष्ट व्यक्ती कोणते, हे शोधून काढ! दुर्योधन निघाला शोधमोहीमेवर! सर्वत्र शोध घेऊन तो श्रीकृष्णाजवळ पोचला व सांगितले की, या यज्ञसमारंभात एकही चांगला, सुष्ट व्यक्ती त्याला आढळून आला नाही.
       नंतर श्रीकृष्णाने युधिष्ठीर ला सुद्धा बाजूला नेऊन सांगितले की, या यज्ञसमारंभात उपस्थितांपैकी वाईट, दुष्ट व्यक्ती कोणते, ते शोधून काढ! युधिष्ठीरही निघाला शोधमोहीमेवर! सर्वत्र शोध घेऊन तो पोचला श्रीकृष्णाजवळ आणि सांगितले की, या समारंभात उपस्थित सारेच व्यक्ती चांगले, सुष्ट आहेत, मला एकही वाईट, दुष्ट व्यक्ती आढळून आला नाही.
     वरील दोन्ही (मिथकीय) प्रकरणी sample सारखा/एकच असूनही observer बदलताच result/परिणाम/निष्कर्ष फक्त बदललाच नाही तर परस्पर-विपरीत आढळून आला. यावरून निष्कर्ष काय निघतो? मला वाटते, दोष/गुण एखाद्या व्यक्तीत/वस्तूत नसून पाहणाऱ्यांच्या दृष्टीकोनात/नजरेत असतो/असावा, असा निष्कर्ष निघतो! 
       आता याच निष्कर्षाचा निष्कर्ष वापरला तर सुमारे तीनशे पेक्षा अधिक भिन्न भिन्न "रामायणे", तितकीच भिन्न भिन्न "महाभारते" पैकी एकही रामायण वा महाभारत पूर्णतः/अंशतः न वाचता, न अभ्यासता (कधी-कधी तर न पाहताही)  फक्त काहीतरी अल्प स्वल्प द्वेषमूलक वाचन व ऐकीव/समाज माध्यमीय माहितीच्या आधारे रामायण आणि महाभारत यातील लिखाण, व्यक्तीरेखा, घटना आदींवर अधिकारवाणीने द्वेषमूलकच टिका-टिप्पणी करणाऱ्या  व कथा-कविता-लेख लिहिणाऱ्या महाविद्वानांच्या साहसाला/हिमतीला काय म्हणावे, हे मला अजूनही कळू शकलेले नाही.
      कोणत्याही पौराणिक, प्राचीन, मध्ययुगीन, ऐतिहासिक, सद्यकालीन/आधुनिक भारतीय विचारवंत, विद्वान, मनिषी, तत्त्वज्ञ यांनी कोणालाही, कधीही द्वेषाची शिकवण दिल्याचे आढळून येत नाही. (दुर्योधन, शकुनी, अश्वत्थामा, कंस, जयद्रथ, ... वगैरे सारख्या अपवादात्मक काही तथाकथित महनीयांनी तसा प्रयत्न केला व संपले, नष्ट झाले, असेच चित्र दिसून येते.) असे असतानाही आजच्या या उजाखो*त्तर व सत्योत्तर(POST-TRUTH)कालीन, संगणकीय तथा कृत्रिम-बुद्धिमत्तामय युगात द्वेषाच्या बीजारोपणाची अशी वस्तुस्थिती पाहून मला खूप खूप आश्चर्यच वाटते! 
       वस्तूतः विद्रोहाचा खरा/वास्तविक अर्थ द्वेष नसून त्वेष आहे. कारण द्वेष करणारी व्यक्ती स्वतःला कमजोर समजते, न्यूनगंड जोपासते व पर्यायाने आपल्या जैविक, नैतिक, विवेकाधारित ऊर्जेचा नाश करून संपून जाते. याउलट त्वेषाने उसळून उठणारी व्यक्ती स्वतःची महत्ता पटवून देते, स्वतःचे अस्तित्व सिद्ध करून दाखवते, स्वतःच्या जैविक, नैतिक व विवेकाधारित ऊर्जेने आपला परिसर उज्ज्वल करून जाते. द्वेषाने फक्त आणि फक्त विनाशच होतो तर त्वेषाने सदैव नवनिर्मिती होते. हे इतिहासाने वारंवार सिद्ध केलेले आहे, आपल्या प्रत्येक भारतीय मनिषींनी सुद्धा याला वारंवार अधोरेखितही केलेले आहे. तरी आम्ही द्वेषबीजच पेरणे योग्य आणि श्रेयस्कर(?) का समजतो, हे कोडे मला अजूनही सोडवता आलेले नाही. 
      तसेच दसरा, दिवाळी सारख्या भारतीय संस्कृती व परंपरेचा पाईक असलेल्या महत्त्वपूर्ण सणांच्या आयोजनाचे वेळी काहीतरी खुसपट काढून, त्यावर काहीतरी असंबद्ध व ऐकीव असे उलटसुलट लिहून द्वेषाची पेरणी करण्याचे प्रयत्न होत असतातच. म्हणजेच आम्ही अजूनही, या उजाखा*प्रणित सत्योत्तर व कृत्रिम-बुद्धिमत्तामय डिजिटल युगातही, दुर्योधनादिंचेच अनुसरण का करू लागतो, हे सुद्धा माझ्यासाठी एक अनबूझ कोडेच ठरत आहे.
      आम्हाला अजूनही द्वेषरहित/द्वेषशून्य परंतू त्वेषसंपृक्त, तात्विक व तर्कशुद्ध मतभेद (मनभेद नव्हे!) व्यक्त करण्याची, नवनिर्मितीला संपूरक अशी कला कां अवगत होऊ शकली नाही, कां अजूनही जमू शकलेली नाही, ह्या माझ्यापुढील अनुत्तरीत यक्षप्रश्नाने मला भंडावून सोडले आहे. यातून सुटकेचा मार्ग कोणी सांगू शकल्यास आभारी  राहीन. 
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
   बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)