माझा तथाकथित हृद्रोग आणि मी : एक स्वानुभव

*माझा तथाकथित हृद्रोग आणि मी : एक स्वानुभव*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> तीन वर्षात मिळवावयाची B.Sc.(PCM) ही पदवी मी पांच वर्षात मिळविली. (त्याला माझी तोळामासा तब्येत, गावठी कलह आदि बाबी कारणीभूत होत्या, असो.) जून-1977 मध्ये ही पदवी उत्तीर्ण झाल्या/केल्यानंतर त्यावेळच्या माझ्या एका भौतिकशास्त्राच्या प्राध्यापकाच्या कोत्या व नीचतम वृत्तीमुळे मला भौतिकशास्त्र विषयात फक्त एक मार्क/गुण कमी पडल्याने मला नागपूरच्या PGTD व हिस्लाॅप काॅलेज या दोन्ही ठिकाणी M.Sc.(PHY) साठी प्रवेश नाकारण्यात आला. निराश होऊन मी विज्ञान शाखेला रामराम ठोकला व गोंदिया येथील एन.एम.डी.काॅलेज मध्ये विधीशाखेत LL.B. मध्ये प्रवेश घेतला. दरम्यान मी MPSC/UPSC चा अभ्यास व तयारी करीत असल्याने मला मराठी वाङ्मय/साहित्येतिहास, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान या विषयांचा सुद्धा अवांतर अभ्यास करता आला/करावा लागला.

>> आमचे लाॅ काॅलेजचे वर्ग संध्याकाळी सहानंतर सुरू होत असत. रात्री नऊ वाजता काॅलेज सुटल्यावर रूमवर येऊन जेवण उरकेपर्यंत रात्रीचे दहा वाजले असत. त्यानंतर मी अभ्यासाला 'बसत' असे तो पहाटे तीन-चार वाजेपर्यंत माझा हा 'अभ्यासयोग' चालायचा. दरम्यान झोपेवर नियंत्रण(?) मिळविण्याच्या नादात मी सिगारेटचा चेन-स्मोकर सारखा वागत(?) असे. माझा मित्र मात्र याकाळात बिडी प्यायचा, मला बिडी सहन(?) होत नसल्याने मी सिगारेटचा आश्रय(?) घेतला होता. रात्रीच्या जागरणामुळे दुस-या दिवसाची आमची सकाळ नऊ वाजतानंतरच सुरू व्हायची.

>> त्यावेळी B.Sc.(PCM) केलेल्यांची विविध शाळांमध्ये गणित शिक्षक म्हणून जबरदस्त मागणी होती. कारण त्याकाळी सायंस काॅलेजेसची तर कमी होतीच पण गणित विषयाच्या काल्पनिक भीतीमुळे बहुतेक विद्यार्थी B.Sc.(PCM) ला टाळत असल्याने अशा गणित शिक्षकांची चणचण(?) निर्माण होऊन त्यांची जबरदस्त मागणी वाढली होती. मला सुद्धा दर आठवड्याला एक तरी अशी ऑफर यायची, पण माझा वरीलप्रमाणे दिनक्रम व शिक्षकीबद्दलची माझी तत्कालीन भयंकर नावड यामुळे मी त्या ऑफर सपशेल नाकारत असे. पण कमावता(?) होण्याची क्षमता धारण केल्यावरही खर्चासाठी घरूनच पैसे आणावे लागत असण्याची हूरहूर(?)/न्यूनता ही वस्तुस्थिती आणि माझा MPSC/UPSC चा सहाध्यायी मित्र सी.आई.पटले याच्या आग्रहाखातर मी ऑक्टोबर-1978 मध्ये शहीद जान्या तिम्या जिल्हा परिषद ज्युनिअर काॅलेज, गोरेगांव (तत्कालीन जि.भंडारा) येथे गणित शिक्षक म्हणून रुजू झालो.

>> त्यावेळी मी गोंदिया येथील टी.बी.टोली येथे रूम करून राहत असे आणि गोंदियाचे बस स्थानक त्यावेळी जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जवळ होते. मी गोंदिया ते गोरेगांव असा दररोज एसटी बसने माझा मित्र पटले सोबत जाणे-येणे करायचो. टी.बी.टोली ते तत्कालीन बस स्थानक हे अंतर सुमारे एक-दीड किमी असावे, ते अंतर आम्ही रोज पायीच पार(?) पाडायचो(?). दोनेक महिन्यानंतर मला हे अंतर कापताना धाप लागू लागली. म्हणून मित्र पटले याच्या सल्ल्यानुसार मी गोंदिया येथील तत्कालीन एकमेव हृदयरोग तज्ज्ञ डॉ.गुप्ता यांच्याकडे तपासणीसाठी गेलो. त्यांनी ECG काढला व निदान केले की मला PMB (PreMature Beats) असा काही (लाखात एखाद्या(?)लाच होणारा) रोग(?) जडला आहे. त्याकाळी मी माझे योगगुरू श्री.विठ्ठलराव जिभकाटे यांचा एकलव्य होऊन शीर्षासन, सूर्य नमस्कार ते सारीच विविध योगासने करायचो. डाॅक्टरनी मला शीर्षासन करण्यास मनाई केली. सिगारेट ओढण्यासाठी सुद्धा मनाई केली व सतत हसत/आनंदी राहण्याचा सल्ला दिला. त्याच क्षणापासून मी तथाकथित चेन-स्मोकर असलेल्याने सिगारेट सोडली ती आजतागायत. आणि हसत/आनंदी राहण्याबद्दल सांगायचे तर भयंकर असे अपघात पाहूनही मला हसू आवरता येत नसे. (सध्या मात्र छोट्या छोट्या प्रसंगी सुद्धा लवकरच भावूक होऊ लागतो.)

>> तेव्हापासून म्हणजे सुमारे डिसेंबर 1978 पासून दरवर्षी मी हृदयरोग तज्ज्ञांकडून ECG काढून माझ्या हृदयाची ताकत(?) तपासून घेत आलो आहे. (कारण डाॅक्टरचे म्हणणे असे की PMB मुळे हृदयरोग होईलच असे खात्रीने म्हणता येत नसले तरी अशी व्यक्ती हृद्रोग-प्रवण असण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नाही.) असे असले तरी मी निवृत्त होईपर्यंत मला, जरी हृद्रोग-प्रतिबंधक(?) औषधी नियमित घ्यावी लागली तरी, हृद्रोगाचा प्रकोप जाणवला नव्हता/नाही. मात्र निवृत्तीनंतर काही पारिवारिक बाबी उघड होऊन त्या प्रत्यक्षात आल्यावर मात्र मला सुमारे दीड वर्षे माधवबागच्या हृद्रोग चिकित्सेचा आधार घ्यावा लागला. अजूनही तसा छिटपुट औषधोपचार सुरू असला तरी याविषयी मला वाटते, की मी हृदयसम्राटच आहे.

>> तर अशी ही माझी तथाकथित(?) हृदयगाथा!
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(24.05.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

सहकारी अर्थरचना : एक संक्षिप्त आकलन वगैरे (सुधारित)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)