...असा एखादा संपादक भेटावा!
दि.02.09.2022/बोरकन्हार-441902.
=======================
प्रति,
श्री.विनोद शिरसाठ,
संपादक, 'साधना' (साप्ताहिक),
पुणे-411030.
>> सप्रेम सादर नमस्कार.
>> सुमारे महिन्यापूर्वी लोकसत्ता मध्ये मित्रश्रेष्ठ श्री.भानू काळे यांनी 'साधना' विषयी एक लेख लिहून त्यात 'साधना'च्या अन्य मान्यवर संपादकांसोबतच आपल्याही संपादकीय कौशल्याची साधार व सार्थ तारीफ केली होती. मी श्री.काळे यांच्या तद्विषयक मताशी शंभर टक्के सहमत आहे. परंतू एका दुखऱ्या नसेची वेदनाही आहे की, श्री.काळे स्वतः मात्र 'अंतर्नाद' बंद करताना आपल्या या (संपादक विषयक) विचारांशी एकनिष्ठ राहू शकले नव्हते. आणि आम्हा मराठी वाचकांच्या दुर्दैवाने आम्हाला 'अंतर्नाद' सारख्या सद्यस्थितीत अपरिहार्य असलेल्या साहित्य, विचार, आचार विषयक अनमोल अशा दीर्घ-प्रभावी वाचनापासून वंचित व्हावे लागले. त्यासंदर्भात माझे श्री.काळे यांचेसोबत लुटूपुटीचे मतभिन्नतेचे पत्र-भांडण ही झाले होते. असो. (मी 2000 पासून शेवटच्या अंकापर्यंत 'अंतर्नाद'चा सक्रिय व नियमित वर्गणीदार-वाचक होतो.)
>> एकंदरीत मराठीतील नियतकालिकांची ही शोकांतिकाच दिसून येते की, बहुतेक मराठी नियतकालिकांचे संपादक, प्रकाशक, अधिदेशक, चालक हे स्वतःला 'गुरु'स्थानी कल्पून वाचकांना आपले शिष्य बनवू इच्छितात. परंतु सध्याच्या या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय व समाजमाध्यमीय युगात कोणताही वाचक(?) कोणाचाही शिष्य(?) होऊ इच्छित नसतो. आजच्या वाचकाला 'गुरु' नव्हे मित्र, मित्रश्रेष्ठ, मित्रवर्य यांचे सान्निध्य मान्य आहे/होऊ शकेल. परंतु बहुतेक संपादकादिंना मात्र ही वस्तुस्थिती मंजूरच नसल्याने चांगली चांगली नियतकालिके वाचकां(?)अभावी अकाली मृत्यूला शरण जातात, असे माझे स्वानुभवीय अल्पबुद्धि-आकलन आहे.
>> तरी समाधान असे की, 'साधना' सारखे एक साप्ताहिक आपल्या सशक्त आणि सक्षम संपादकीय व व्यवस्थापकीय मार्गदर्शनाखाली माझ्यासारख्या (तथाकथित साक्षेपी?) वाचकाची सर्वभक्षी(!) वाचनभूक भागवीत आहे. तसा तर 'साधना'चा प्रत्येकच अंक एक विशेषांक असतो, त्यातही गेले तीन अंक मला आणखी समृद्ध करून गेले. आपण हे कसे काय शक्य करता, याचे खरोखरच संशोधन होणे, मराठी नियतकालिकांच्या भवितव्याच्या दृष्टीने मला अपरिहार्यरित्या क्रमप्राप्त वाटते.
>> तसा तर माझ्या बालपणापासूनच मी माझे वाचनसातत्य टिकवून होतो. पण अखेर फेब्रुवारी 2013 मध्ये निवृत्त झाल्यावर स्वगावी (एका छोट्याशा खेडेगावात) स्थायिक होऊन पूर्णवेळ वाचक झालो. आणि अशातच 'साधना' साप्ताहिकची जुनी वाचन-ओळख जागृत होऊन 'साधना' चा वैयक्तिक वर्गणीदार-वाचक झालो. आणि या माझ्या आठ-नऊ वर्षांच्या 'साधना'च्या वर्गणीदार-वाचकत्वाच्या कालावधीत मला एकाही अंकाने, अपवाद स्वरूपही, निराश केलेले नाही. याचे संपूर्ण श्रेय आपल्या संपादकीय कौशल्यालाच जाते, याची मला नम्र जाणीव आहे. माझ्या या वर्गणीदार-वाचक कालावधीतील सर्व अंक मी जपून ठेवले असून अधूनमधून त्यांच्यावरील धुळ(?) झटकून पुन्हा पुन्हा वाचतही असतो.
>> अशाच एका मनःस्थितीत मी, '...असा एखादा संपादक भेटावा' ही एक काल्पनिका (28.12.2015 ला) लिहिली असून ती यासोबत पुनश्च आपल्या अवलोकनार्थ पाठवीत आहे.
¤आपला, एक वर्गणीदार-वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(lskatre55@gmail.com)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
👇
*...असा एखादा संपादक भेटावा!*
~~~~~~~~~~~~~~~~~~
(मूळ रचना, दि.28.12.2015)
~~~~~~~~~~~~~~~~~
...तो माझा मित्र असावा
गुरू-उपदेशक नसावा,
असा एखादा
मला संपादक भेटावा.
□
विचारांच्या चक्रव्यूहातून
अलगद सुटण्याच्या मार्गाचे
स्वादिधेशन करताना
सुभद्रेची झोप न ओळखणारा नसावा,
असा एखादा
मला संपादक भेटावा.
□
भूंकणाऱ्या कुत्र्यालाही इजा न करता
अचूक "बाण-वर्षावा"ने मूक करणाऱ्या
एकलव्याला "अंगठा" न मागता,
त्याला आपली "बोटे" देणारा
आधुनिक द्रोण असावा,
असा एखादा
मला संपादक भेटावा.
□
मूर्छित झालेल्या "लक्षुमना"साठी
संजीवनी बूटी आणूनही
जराही आत्ममग्न न होणारा
वाऱ्यावरही स्वार होणारा
हनुमंत असावा,
असा एखादा
मला संपादक भेटावा.
□
अर्जुनाला अठरा अध्यायांची
"गीता" सांगून झाल्यावरही
अंती-
"यथेच्छसि तथा कुरु" सांगणारा
कृष्णासारखा "सखा" असावा,
असा एखादा
मला संपादक भेटावा.
□
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया (पूर्व विदर्भ-महाराष्ट्र)
(मूळ रचना : 28.12.2015)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(सर्वश्री.विनोद शिरसाठ, सुरेश द्वादशीवार, घनश्याम पाटील, येशू पाटील, डाॅ.वीणा सानेकर, अशोक कोठावळे, गो.तु.पाटील, प्रभाकर बागले, श्रीपाद अपराजित, सुनील कुहीकर, मनोज मोहिते, दिलीप कुलकर्णी, संजय भास्कर जोशी, रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ, प्र.ब.कुलकर्णी, अभय कांता, श्याम पेंढारी, श्रीश हळदे, सुखदेव ढाणके, अश्विनी मयेकर, शैलेश पांडे, राजन गवस, स्व.पुरुषोत्तम पाटील, स्व.पु.आ.चित्रे, स्व.म.द.हातकणंगलेकर, स्व.अनिल नितनवरे,....यांची क्षमा मागून.)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment