कारणे > परिणाम > तोडगा की फक्त परिणामच?
*कारणे > परिणाम > तोडगा की फक्त परिणामच?*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> सध्याच्या उजाखा*प्रणित सत्योत्तरकालीन संगणकीय युगातील वास्तविक *#कटूतम वस्तुस्थिती* चे (#BitterRealityचे) यथाविहित/यथोचित वर्णन करताना राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, साहित्यिक, ऐतिहासिक, ... इत्यादी कोणत्याही क्षेत्रातील जाणकार या बिघडलेल्या(?) वर्तमानाचे निकृष्टतम परिदृश्य अतिशय विद्वत्तापूर्ण भाषेत, विचारसमृद्ध तळमळीने व्यक्त करीत असतात. परंतु ह्या *#कटूतम वस्तुस्थिती* चे उगमस्थान व/वा त्यामागील कारणे/कारणमीमांसा, याबाबत मात्र ते पद्धतशीर मौन बाळगून असतात. शिवाय ह्या सध्याच्या *#कटूतम वस्तुस्थिती* चा यशस्वीरित्या, सक्षमतेने व परिणामकारकरित्या सामना करून त्यातून बिना तोडफोड, सुस्थितीत बाहेर कसे पडता येईल याचा कोणताही समाधानकारक तोडगा सुद्धा ते विचारवंत (अतिसूक्ष्म अपवाद वगळता) समोर ठेवत/मांडत नाहीत. अशाप्रकारे *आदि* आणि *अंता* चा कोणताही समाधानकारक उहापोह न करता फक्त *मध्य* चे रडगाणे गाणाऱ्यांचीच आजकाल जबरदस्त चलती असून संपूर्ण डिजिटल, छापील, आभासी, वेबिनारिय, ... वगैरे सर्वच माध्यमांतून त्यांच्या त्या अधांतरीय विचारगंडांना नावाजले सुद्धा जाते. त्यांचा उदोउदोही होत असल्याचे आढळून येते.
>> आणि .........
>> सध्याच्या या वर नमूद वास्तविक #कटूतम वस्तुस्थितीच्या (#BitterRealityच्या) उपचारार्थ सुविहित व कठोर-कम-सक्षम असा एखादा कालसुसंगत समाधानकारक तोडगा सुचवणाऱ्यांना मात्र ''तुमचे मत(?) पटत/पटले नाही. तुमची मते(?) अति आदर्शवादी वाटतात'' अशा सारख्या मानभावी व शेलक्या शेऱ्यांसह डावलून त्यांची मते कोणत्याही कारणमीमांसेशिवाय कचरापेटीत टाकण्यातच धन्यता मानली जाते आणि आपापला अहंगंड जोपासला जातो.
>> अखेर नक्राश्रू ढाळत ढाळत परिणामशून्य चर्वितचर्वण सतत सुरू ठेवून आपापल्या एखाद्या क्षुद्र पुरस्कारप्राप्तीसाठी पूर्वतयारीचा पूर्वाभ्यास मात्र वर नमूद साऱ्याच माध्यमांतून नित्यनेमाने आचरला जातो. पर्यायस्वरूप कोणताच समाधानकारक तोडगा न निघता तोंडपाटीलकी मात्र हवामहली मनोऱ्यात स्थानापन्न होत जाते आणि वर नमूद वास्तविक #कटूतम वस्तुस्थिती (#BitterReality) आपले अस्तित्व टिकवून/कायम ठेवण्यात अधिकाधिक सक्षम होत जाते. असो.
>> वादे वादे जायते.........! ला अनुसरून "DISSENT : THE VOICE OF PROGRESS" या माझ्या ब्रीदवाक्याच्या अधीन राहून येथेच थांबतो.
¤
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(15 ऑगस्ट 2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment