उथळ व्यक्तिमत्त्व : एक संक्षिप्त आकलन

*उथळ व्यक्तिमत्त्व : एक संक्षिप्त आकलन*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> मानवी प्रतिभा आणि तत्संबंधित मानवी व्यक्तिमत्त्व याचे ढोबळमानाने/सर्वसाधारणपणे दोन प्रमुख प्रकार तद्विषयक अभ्यासकांकडून मांडले/अभ्यासले जातात. ते दोन प्रकार म्हणजे, गंभीर व्यक्तिमत्त्व आणि उथळ व्यक्तिमत्त्व. 
>> यापैकी उथळ व्यक्तिमत्त्वाचा उदोउदो लवकरच जिथेतिथे प्रसारित होत असतो. कारण असे उथळ व्यक्तिमत्त्व सतत/वारंवार स्वतःच स्वतःच्या असलेल्या/नसलेल्या प्रातिभ गुणां(?)चे गुणगान(?) करण्यात पटाईतच नव्हे तर सराईतही असते. शिवाय अशा उथळ व्यक्तिमत्त्वाला तसाच उथळ शिष्य(?)परिवार सुद्धा सहजच लाभत असतो, कारण बहुतांश/सर्वसाधारण व्यक्ति हे Thinkophobia ने (विचार करण्याच्या भयगंडाने) भयग्रस्त असतात, हे योगी अरविंद यांनी सुद्धा मांडले आहेच. अशा स्वनामधन्य स्वयंप्रशंषित उथळ व्यक्तिमत्त्वासाठी रामदास स्वामी यांनी त्यांच्या 'दासबोध' या ग्रंथात "...तो एक मुर्ख" अशी संभावना सुद्धा केली आहे. 
>> अशा उथळ व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्ति त्यांच्या तथाकथित प्रातिभ(?) शक्तीच्या मोहजालात भल्याभल्यांनाही सहज प्रभावित/Hypnotize करून जातात. आणि अशाप्रकारे प्रभावित/Hypnotize झालेल्या व्यक्तींना त्यांच्या स्वतःच्या अशा या 'पराजया'ची/सपशेल शरणागतीची प्रारंभी कल्पनाही नसते. अखेर उशीरा का होईना, ही बाब त्यांच्या लक्षात येते, पण तोवर खूप उशीर झालेला असतो आणि त्यांचे स्वतःचे व्यक्तिमत्त्व सुद्धा गंभीरते कडून उथळतेकडे झुकू लागलेले असते. ही खूपच मोठी शोकांतिका असली तरी Thinkophobia चा पद्धतशीर व जाणीवपूर्वक त्याग केल्याशिवाय यातून कुणाचीही सुटका संभव नसते. 
>> म्हणूनच अशा उथळ व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींची ओळख पटवून घेऊन/अशा व्यक्तींना स्वतःच्या प्रातिभ/बुद्धिबळाद्वारे ओळखून त्यांच्या मोहजालाच्या सापळ्यात न सापडणे, त्यांच्या तथाकथित प्रतिभे(?)द्वारे प्रभावित/Hypnotize होण्यापासून स्वतःला जाणीवपूर्वक जपणे हा एकमेव मार्ग उपलब्ध असतो, स्वतःचे व्यक्तिमत्त्व उथळ होण्यापासून वाचवण्यासाठी! 
>> असे उथळ व्यक्तिमत्त्व असलेले व्यक्ती द्वेषपोषित सुद्धा असतात, असे याविषयातील अभ्यासकांचे निदान आहे. त्यामुळेच अशी उथळ व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती मानवी-संज्ञानाच्या संजीवन प्रक्रियेतून घसरण्याची अधिकाधिक शक्यता असते. म्हणूनच अशी व्यक्ती 'घसरली' तर त्यावर तात्काळ सक्षम तथा जालिम उपाययोजना करून ते 'घसरणे' समाजापुढे साधार मांडणे किंवा त्याच्या त्या 'घसरण्या'कडे सर्वत्र सामूहिक दुर्लक्ष करणे परमावश्यक ठरत असते. कारण अशा उथळ व्यक्तिमत्त्वाच्या व्यक्तींचे 'घसरणे' रोखता न आल्यास त्या व्यक्तीप्रमाणे व्यवस्थाही 'घसरण्या'ची शक्यता उद्भवते. आणि व्यक्तीप्रमाणे व्यवस्थाही "घसरली'' तर होणारे नुकसान मोठे आणि दीर्घकालीन असते. अशा 'घसरले'ल्या व्यक्तींची हकालपट्टी करता येते, करणे शक्य असते. पण अशा प्रकारे 'घसरले'ली/सडू लागलेली व्यवस्था पुन्हा निरोगी/पुनर्जागृत करणे महाकठीण असते. म्हणूनच उथळ व्यक्तिमत्त्व असलेल्या व्यक्तींच्या तथा त्यांच्या तथाकथित प्रतिभे(?)च्या सापळ्यात न सापडणे हे प्रत्येक सुजाण, सभ्य व जागरूक व्यक्तीचे प्राथमिक असे नैतिक कर्तव्यच ठरते, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे.(#350)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(08.07.2022)

 

 

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन