सत्याग्रही विचारधारा, डाॅ.कुमार सप्तर्षी आणि मी : एक पत्रव्यवहार

प्रेषक :- 
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, ता.आमगांव 
जि.गोंदिया (विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष : 8208557164,
व्हाॅट्सॲप : 9665041483,
ईमेल : lskatre55@gmail.com 
दि.02.06.2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रति, 
डाॅ.कुमार सप्तर्षी 
संपादक, सत्याग्रही विचारधारा, 
पुणे-411038.
सप्रेम सादर नमस्कार. 

>> कृपया, सोबत संलग्न असलेल्या माझ्या दि.07.04.2022 च्या पत्राचे अवलोकन व वाचन करावे ही सविनय विनंती आहे.
>> यासोबत पुनश्च सविनय कळवितो की, ज्या नियतकालिकाचे संपादक, प्रकाशक, व्यवस्थापक हे त्या नियतकालिकाच्या वर्गणीदार-वाचकांच्या पत्रांची साधी दखल सुद्धा घेत नाहीत, ते स्वतःला गुरुस्थानी व वर्गणीदार-वाचकांना त्यांच्या पायाशी बसणाऱ्या शिष्यस्थानी समजतात, असे माझे अल्पबुद्धि-आकलन आहे. अशा नियतकालिकाशी मी पुढील संबंध ठेवू शकत नाही, ही माझी कमजोरी आहे, कारण मला कोणाचेही शिष्यत्व मान्य नसून मी फक्त मित्रत्वाचा भोक्ता आहे.
>> त्यानुसार मी दि.07.04.2022 च्या माझ्या पत्रात हे स्पष्टपणे कळवूनही आपण मला सविधा चा मे 2022 व जून 2022 चा सुद्धा अंक जबरदस्तीने पाठवून मला बळजबरीनेच आपला शिष्य बनवू पाहता असे प्रथमदर्शनीच आढळून येत आहे. 
>> कृपया, आतातरी माझ्या पत्रांची दखल घेऊन यापुढे मला सविधा चे अंक पाठवून मला आपला शिष्य बनवण्याचा कोणताही प्रयत्न करू नये ही पुनश्च सविनय विनंती आहे.
>> तसदीबद्दल क्षमस्व. 
¤आपला, एक माजी वर्गणीदार-वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे. 
(02.06.2022)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत : वरीलप्रमाणे 
👇👇👇👇👇

बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र)//दि.07.04.2022
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

प्रति,
मा.डाॅ.श्री.कुमार सप्तर्षी 
संपादक, 'सत्याग्रही विचारधारा' (सविधा)
पुणे-411038 
सप्रेम सादर नमस्कार. 

>> बारामती येथील 'संवाद-सहवास' दरम्यान मी 'सविधा' चा वर्गणीदार-वाचक झालो होतो. त्यानुसार मला फेब्रुवारी-2020, मार्च-2020, दिवाळी अंक-2021, फेब्रुवारी-2022, मार्च-2022, एप्रिल-2022 असे सहा अंक मिळाले असून माझा वर्गणीदार-वाचक कालावधी संपुष्टात आलेला आहे. पुढील वर्गणी पाठविण्याबद्दलचे आपले सूचना-पत्र सुद्धा मिळाले. 

>> 'सविधा'चे एकंदरीत स्वरूप (लिखाणादि) माझ्या आवडीचे असल्याने मी दि.18 फेब्रुवारी-2020 ला माझी एक कविता आणि दि.24 मार्च 2020 ला माझ्याच चार अभंग-कविता 'सवि'तून प्रकाशनार्थ अनाहूतपणे (ईमेल ने) पाठविण्याचे महाधाडस(?) केले होते. परंतु आजवर माझ्या त्या कविता/रचनांचे काय झाले, याबद्दल आपल्याकडून काहीच कळविण्यात आलेले नाही, प्रकाशितही करण्यात आलेल्या नाहीत, नकारही कळविण्यात आलेला नाही. 

>> यावरून माझा प्रथमदर्शनी अनुमान-वजा-निष्कर्ष असा की, आपल्याला 'सविधा'मधून कविता प्रकाशनार्थ फक्त ओळखीतील व्यक्तींची व भक्तांचीच गरज आहे, माझ्यासारख्या अनाहूत मित्रांची नाही. आणि माझे दुर्दैव(?) असे की मला कोणाचाही भक्त होणे कोणत्याही परिस्थितीत मान्य नाही, मला मित्रत्वच मान्य आहे. अशा माझ्या दुर्दैवा(?)पायी मला यापुढे 'सविधा'चे माझे वर्गणीदार-वाचकत्व सुरू ठेवता येत नाही. त्याबद्दल मी आपला क्षमाप्रार्थी आहे. कृपया उदार अंतःकरणाने मला क्षमा करावी, ही सविनय प्रार्थना आहे. क्षमस्व. 🙏🙏🙏
>> कळावे, कळवावे ही विनंती.
¤आपला, पूर्व वर्गणीदार-वाचक 
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया.
(विदर्भ-महाराष्ट्र)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया, पूर्व विदर्भ. 
दि.24 मार्च 2020
~~~~~~~~~~~~~~~~~~
प्रति,
मा.डाॅ.कुमार सप्तर्षी 
संपादक, 'सत्याग्रही विचारधारा'
1468, सदाशिव पेठ, पुणे-411 030 
सप्रेम सादर नमस्कार. 

 >>> मी 'सत्याग्रही विचारधारा' चा नवा-नवा वर्गणीदार वाचक आहे. (संदर्भ:- अक्षर मानव संवाद, बारामती)

>>> यासोबत माझ्या चार अनर्थ(?) अभंग रचना आपल्या अवलोकन, अभिप्राय व प्रकाशनयोग्य वाटल्यास यथाशक्य प्रकाशनार्थ पाठवीत आहे. 
>>> खालीलप्रमाणे चार रचना...
👇👇👇
□(1)*पोखरली वाट/(अनर्थाचे अभंग)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~
पोखरली वाट      गावली लक्ष्याला
गौण पहाडीला     गोटा काळा ||१||

खाऊन गाड्याला      हागती आस्कूड
पोकळ लाकूड     वंगणाला ||२||

येवो दिन शुभ     शुभ्र आकारात
वाढून औकात     भेटो वाट ||३||

पोखरली वाट    जाये मंदिराला
सुन्या गाभा-याला     भय-मुक्ती ||४||

विसंगती भंग    संगत अभंग
फाटलेले अंग      शिववेना ||५||

पाय-हात-डोके     फसवे हृदय
पाऊस निर्दय      बरसेना ||६||

पोखरली वाट    नसे एक-पंथी
मिलनाचे अंती     पळवाट ||७||

गुंतागुंत सोपी     कठीण चढण
सुटलेला बाण      घाव करी ||८||

कळेना मलाही     अर्थाचा शब्दार्थ
पंक्तीचा पदार्थ     सपकचि ||९||

पोखरली वाट     हरवत नाही
भले सर्व काही     शोधा मग ||१०||

नसे धरबंध     नसे शब्दकोश
अर्थाचा विनाश    होऊ लागे ||११||

अंथरल्या गाद्या    झोपू नका कोणी
सापडेना लोणी     झोपी जाता ||१२||

काहीच्या बाहीच   रचले हे शब्द
शब्दकोश बंद     झाल्यावर ||१३||

पोखरली वाट    फसवले जग
फालतू व्यासंग     नासलेले ||१४||

शोधा सापडेल    काहीतरी अर्थ
सुना-सुना पार्थ     कृष्णाविन ||१५||
□□
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
    (जि.गोंदिया)//११.०१.२०१९//
¤¤¤¤¤¤¤||****||¤¤¤¤¤¤¤¤¤¤

□(2)*अनंत अफवा...!*
~~~~~~~~~~~~~
संभोग प्रक्रिया    नव्हे ती घटना
विश्वाची रचना     तीच आहे! ||१||

विश्व हे पांगळे     लुळे नि लंगडे
सृजन साकडे       सत्य फक्त ||२||

नव्हे फक्त योनि   नव्हे फक्त लिंग
फसवे बाशिंग     आभासचि ||३||

प्रक्रिया अनंत    अभंग घटना
निसर्ग-याचना      निसर्गाची ||४||

मनु* तो एकटा   मीन-तनु कृपा
जाहली ती नौका   सावधान ||५||

विचलित हव्वा    आदम नवा नवा
फळ तो कडवा     गोड होई ||६||

नौका ती नोहाची    एका परि एक
बहुत "अनेक"     सर्जन ते ||७||

संभोग प्रक्रिया    नव्हे ती घटना
करते गर्जना    अस्तित्वाची ||८||

यौवनाची लंका    प्रवाहाला सांगे
जशी मुंगी रांगे    हळूहळू ||९||

वारूळाचे माथा    स्थित आदि-अंत
कायम अनंत   दळण ते ||१०||

आव्हानाचे काय   निसर्ग साथीला
चालेना वशिला    कोणाचाही ||११||

संभोग प्रक्रिया   नोहे क्रिडा-खेळ!
निसर्ग समूळ    प्रवाह तो ||१२||
□□□
(*मनुस्मृती मधील नोहे...!!!)
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902//
17.01.2019//
¤¤¤¤¤¤¤||****||¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

□(३)*स्मरण स्मरण* 
---------------------------------------
हेतूशून्य क्षण     होती हेतूपूर्ण
तुझे ते स्मरण     क्षणोक्षणी ||१||

लाघवी हसणे    ओठ विचकणे
किती ते बहाणे    माझ्यासाठी ||२||

निळी ती पाकळी    पोटाला आकळी
शुभ्र ती भूपाळी   पायघोळ ||३||

खळी विना गाल    विश्वाचा भूगोल
हास्य ते निर्मळ     ओठाओठी ||४||

ओठ ते सर्वस्व    माझे आर्त विश्व
चाखण्या ती चव   पुनर्जन्म ||५||

शिकवणी पर्व   चित्रावला गर्व
बीज-भूमी सर्व   नाट्यमय ||६||

नयन बोलती   ओठ मुके होती
तथ्य(?) विसंगती   नियती ही ||७||

स्पर्श समाधिस्थ   दूरस्थ दूरस्थ
आणि मी तटस्थ    प्रतीक्षेत ||८||

पुनर्जन्म व्हावा   वर्ग एक नवा
शिष्य-गुरु ठेवा   नको पुन्हा ||९||
□□
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
  (जि.गोंदिया)/२१.०१.२०१९
¤¤¤¤¤¤||****||¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤   

□(४)*कृष्ण-राधा-कुब्जा : एक मिथक असेही!*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
माघारी कृष्णाच्या      राधा होते भ्रांत
कुब्जेची संगत   शोधू लागे ||१||

कृष्णाची ती राधा    कुब्जा ही कुणाची
स्तब्ध उद्धवाची       शब्द गाथा ||२||

कृष्णाने वधले       कंस, चारणादि
राधा कुब्जे आधी       बावरली ||३||

नंद होता वृद्ध      राधा बाधलेली
कुब्जा प्रकटली     नंदा घरी ||४||

यशोदेच्या दारी      राधेची शिदोरी
कृष्णाची मुजोरी     कुब्जेसाठी ||५||

राधा आणि कुब्जा    झाल्या कृष्ण-सख्या
दारी द्रौपदीच्या      सूर्य उभा ||६||

द्रौपदीची थाळी     राधेने धुतली
कुब्जेची सावली     प्रभावली ||७||

कृष्ण एक सखा   राधा एक सखी
मनाची सारखी    घालमेल ||८||

कृष्ण एक सखा     कुब्जा सुद्धा सखी
हृदय-पालखी     सुनसान ||९||

कृष्ण एक सखा    द्रौपदी चा संगी
विश्वासाची फांदी      तोडलेली ||१०||

कृष्ण-राधा-कुब्जा     द्रौपदी-सुभद्रा
अभिमन्यु खरा     लाभार्थी तो ||११||

कृष्ण-राधा कथा    कुब्जेला आंदण
द्रौपदीची आण    नासलेली ||१२||

वारस सुभद्रा    कृष्णाची किमया
राधा-कुब्जा माया     द्रौपदीला ||१३||

एक होती राधा    कुब्जा झाली एक
द्रौपदी अनेक    कृष्ण-सखी ||१४||

अनर्थाचा कृष्ण   अनर्थाची राधा
नको विषबाधा    अर्थांतरी ||१५||

सार्थ एकमेव   कुबडी ती कुब्जा
कृष्ण होतो सच्चा    पायव्यात ||१६||
□□□
@लखनसिंह कमलाबाई कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
      (१२.०१ २०१९)
¤¤¤¤¤¤¤¤|||****|||¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤

प्रेषक:-
आपला एक वर्गणीदार वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
ता.आमगांव, जि.गोंदिया 
(पूर्व विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष-- 7066968350
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~


बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया, (विदर्भ-महाराष्ट्र), दि.15.02.2020
~~~~~~~~~~
प्रति,
मा.डाॅ.श्री.कुमार सप्तर्षी 
संपादक, "सत्याग्रही विचारधारा"
क्रांतिनिकेतन, 1468, सदाशिव पेठ,
एस.पी.काॅलेजसमोर, पुणे-411030

सप्रेम सादर नमस्कार 

>  मी आपल्या बारामती येथील संवाद-सहवास दरम्यान "सत्याग्रही विचारधारा" चा वर्गणीदार-वाचक झालोय. त्यानंतर पहिलाच अंक, फेब्रुवारी-20चा, परवा प्राप्त झाला. अंकातील मजकूर (content) पाहून समाधान वाटले.
>  बारामती मुक्कामी मी आपल्याला माझ्या "इतिहास आढळत नाही" या दीर्घ कवितेचे पुस्तक आपल्या अभिप्रायासाठी दिले असून त्यावर आपल्या अभिप्रायाची आतुरतेने प्रतीक्षा करीत आहे.
>  यासोबत माझी एक ताज्या परिस्थितीवरील ताजी कविता "सत्याग्रही विचारधारा"च्या येत्या अंकातून प्रकाशनार्थ पाठविण्याचे धाडस करीत आहे. कृपया अवश्य प्रकाशित करून उपकृत करावे ही विनंती.
>  ही कविता संपादित/संस्कारित करायला माझी कोणतीही हरकत असणार नाही. तथापि ही कविता आपल्याला पसंत न पडल्यास किंवा प्रकाशनयोग्य न वाटल्यास मला तसे ईमेल वर अवश्य कळविण्याची कृपा करावी तथा ती आपल्याकडून delete करावी ही विनंती. 
>  प्रतिक्षेत,
>  आपला, एक वर्गणीदार-वाचक,
@लखनसिंह कटरे 
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, ता.आमगांव, जि.गोंदिया 
(विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष  :- +91 7066968350
ईमेल : lskatre55@gmail.com 
~~~~~~~~~~~~~~~~~
सोबत :- वरीलप्रमाणे एक कविता "मी एक शत्रूहंता"
👇
¤मी : एक शत्रूहंता¤ 
~~~~~~~~~~~~
...आणि अखेर कंटाळून गेलो मी
दुसरा, दूरचा शत्रू शोधता शोधता...!
दुसरा, दूरचा शत्रू कुठवर शोधायचा,
कुठून कुठून आणायचा?
कठीणच ते !
मग मी पुढे ठरवले की,
आपल्यातीलच काही आळीपाळीने 
शोधावेत, ठरवावेत शत्रू म्हणून 
आणि 
भागवून घ्यावी आपली हौस
शत्रू-शत्रू खेळण्याची !
¤
त्यासाठी केली मी तयार 
एक मुजोर सुनियोजित यंत्रणा 
करू लागली मग ती यंत्रणा  
आपले नियोजित काम 
अगदी प्राणपणाने, जीव ओतून 
डोळ्यात तेल घालून वगैरे 
आणि 
आणू लागली शोधून, धरून 
आपल्यातीलच ठरवलेल्या शत्रूंना 
माझ्या समोर !
¤
माझा आत्मा 
अर्थातच झाला, होऊ लागला शांत 
माझ्या समोर आणलेला शत्रू पाहून 
आणि मी 
मग मिरवू लागलो 
शत्रूहंता शूर सेनापती म्हणून 
अर्थातच मग लवकरच 
मी ठरलो यशस्वी सुद्धा 
आता मला नसते भ्रांत 
शत्रू शोधण्याची, शत्रू आणण्याची !
¤
अखेर सापडलाच मला 
यशस्वी होण्याचा यशस्वी मार्ग 
दुसरा, दूरचा शत्रू शोधण्याऐवजी 
आपल्यातीलच काहींना 
ठरवावे आपले शत्रू 
आणि 
भागवून घ्यावी आपली हौस 
शत्रूहंता होण्याची !
¤
@लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया 
(15.02.2020)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन