मी एक अनबुझ "हिंदू"...... !(?)
*मी एक अनबुझ "हिंदू".......!(?)*
~~~~~~~~~~~~~~~~~~
1)1979 मध्ये मी देवरी (तत्कालीन जि.भंडारा) येथील जिल्हा परिषद हायस्कूल व ज्युनिअर काॅलेज येथे गणित शिक्षक म्हणून बदलून गेलो. तेथे देव गुरूजींच्या परिवाराशी असा काही जुळलो की, त्यांची कन्या माझी मानसकन्या झाली.(आम्ही आजही हे नाते निभावून आहोत.) देव वहिनी माझ्या मानसआई व देव गुरूजी माझे मानसभाऊ झालेत. त्यांच्या दोघांच्या शेवटपर्यंत हे नाते त्यांनी निभावले. त्यांच्या घरी कोणतेही सोवळे-ओवळे, जात-पात असा प्रकार कधीच पाळल्याचे मी किंवा कोणीही पाहिले नाही, अनुभवले नाही. देववहिनी म्हणजे मानवी-देवीच होत्या. त्यांच्या मित्रमंडळींपैकी कोणीही, केव्हाही त्यांच्या स्वैंपाक घरात "घूसून" जेवण करू शकत होता.
2)2003 मध्ये माझ्या पत्नीची गर्भाशय काढून घेण्याची शस्त्रक्रिया झाली, तेव्हा माझी दुसरी मानसकन्या, जी पूर्वाश्रमी(?)ची अ.जा.समाजातील व सध्या बौद्ध धम्मीय, नोकरीतून महिनाभराची सुट्टी घेऊन माझ्या कडे राहिली व तिने संपूर्ण घर (माझ्या मुला-मुलींच्यादेखभालीसह) सांभाळले. माझ्या पत्नीच्या वतीने ती "देवपूजा"ही करायची. तिच्या बौद्धधम्मीय विवाहात मी तिचे "कन्यादान"ही केले. आजही आमचे हे नाते कायम आहे. (माझ्या एका बौद्ध धम्मीय मानसपूत्राबद्दलही पुन्हा केव्हातरी लिहीनच. ते नातेही अजूनही कायम आहे, दृढ आहे.)
3) शिकत असताना व नंतरही मी सुमारे दहा-बारा वर्षे एका मुस्लिम कुटूंबाच्या घरी भाड्याने राहिलोय. त्या घरची मालकीन अम्माजी मला "बडेभाऊ" म्हणायची, (आता त्या हयात नाहीत.) व त्यांच्या घरी काही "विशेष" पक्वान्न बनवण्यात आले तर मला आवर्जून निमंत्रण असायचे. (मी अल्प मांसाहारी होतो, पण अभक्ष्य भक्ष्य करीत नव्हतो, आजही करीत नाही; तेही अभक्ष्य भक्ष्य करीत नव्हते.) माझ्या घरच्या कित्येक कार्यक्रमांना अम्माजी व त्यांची दोन्ही माझ्याच वयाची मुले (जे मला मामू म्हणतात, मानतात; आजही!) आवर्जून हजर राहिलेले आहेत. (तोवर मी "पवित्र कुराण" चे वाचन केलेले नव्हते.)
4)असेच चंद्रपूरला एका जैन परिवाराशी घरोब्याचे संबंध जुळले. त्या घरच्या "आई"ला ओशो रजनीश आपली पूर्वजन्मीची आई मानायचे व स्वहस्ताक्षरात त्यांना पत्रही लिहायचे. (ते सारे मूळ पत्र त्यांनी आजही सांभाळून ठेवलेत. परंतु सुमारे 100 वर्षाच्या त्या "आई" शंभरी पार करून नुकत्याच निवर्तल्या.) त्यांच्या पुत्रासोबत आजही निस्वार्थ मधुर संबंध कायमच आहेत. तेथे जेव्हा जेव्हा मी गेलो/जातो, मला अगदी कोणत्याही भेदभावाशिवाय VIP ट्रीटमेंटच मिळाली/मिळते.
5)मंदिर, मस्जिद, गुरुद्वारा, चर्च, बुद्ध विहार, ... यापैकी कुठेही सारख्याच भावाने नतमस्तक होण्यासाठी मला कोणाच्याही संमतीची, परवानगीची वा मान्यतेची गरज नसते, किंवा मला कोणी त्यासाठी/त्यापासून रोखणारा सुद्धा नसतो, रोखण्याचा प्रयत्न केल्यास/झाल्यास त्याला मी जुमानतच नसतो आणि तसे केल्याने माझा कोणताही धर्म, पंथ वा माझी कोणतीही धर्मभावना भ्रष्ट वा भ्रमित होईल अशी मला किंचितही भीतीही नसते. मला वाटल्यास मी वरीलपैकी कोणत्याही ठिकाणी जाण्याचे/नतमस्तक होण्याचे नाकारू सुद्धा शकतो. त्यामुळे मला कोणी नास्तिक म्हणून संबोधल्यास सुद्धा मी विचलित होत नसतो.
6)मी रास्वसं चा स्वयंसेवक आहे की नाही, याला काहीच अर्थ नाही, कारण माझ्या माहितीप्रमाणे रास्वसं नोंदणीकृत नसल्याने त्याचे सदस्यत्व असणे/नसणे हे माझ्या दृष्टीने अर्थशून्यच. पण शिकत असताना व नंतर नोकरीतही इतरेजनांसह काही तथाकथित उच्च/सवर्ण समाजातील स्वयंसेवकांशी व संबंधित पदाधिकाऱ्यांशी सुद्धा संबंध आला. माझ्या परीने मी त्यांच्या संपर्कातही राहिलो. पण मला अजूनतरी "खोले बाईचे" ब्राह्मणत्व(?) अनुभवण्याचा प्रसंग आल्याचे स्मरत नाही.
7)आंबेडकरांचे "बुद्ध आणि त्यांचा धम्म" व "शूद्र पूर्वी कोण होते" हे दोन ग्रंथ वाचल्यानंतर आंबेडकरांनी हिंदू धर्माचा त्याग का केला व बौद्ध धम्मच का अनुसरला या विषयीची व एकूणच धर्मचिकित्सेची त्यांची अनवरत/शाश्वत विचारप्रवाहाची अनंत प्रासंगिकता समजायला/अनुभवायला सुरूवात झाली. (ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे.)
असे असले तरी मराठी साहित्य/प्रकाशन जगतात मात्र माझ्या दूर्दैवाने मला "स्पृश्य-अस्पृश्य(?)/उच्च-नीच/श्रेष्ठ-कनिष्ठ/अभिजन-लोकजन/ब्राह्मण-अब्राह्मण" अशा काहीशा भेदभावाचा जबरदस्त फटका बसला आहे. "असे प्रसंग" येऊ/घडू नयेत असे जरी वाटत असले तरी "तसे प्रसंग आहेत" ही #कटू-वस्तुस्थिती आहे आणि त्याला काही तथाकथित कम्युनिस्ट वगैरे विचारसरणी/विचारवादाचे सु(!)प्रसिद्ध पाईकही बिलकुल अपवाद नाहीत, असा माझा अनुभव आहे. असो.
या विषयाचा "आवाका" मोठा/विस्तृत असला तरी माझे अल्पबुद्धि-आकलन व सततची शिक्षण-प्रक्रिया लक्षात घेता इथेच थांबणे आवश्यक आहे. हे माझ्या विचारप्रवाहातील काही (संक्षिप्त) टप्पे आहेत, क्रमवार नसून काही मागे-पुढे झालेहेत. माझा प्रवास सुरू आहे, मी अजूनतरी कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत पोचलेलो नाही. कारण मी अजूनही कोणत्याच "विचारवादा"च्या चक्रव्यूहाला शरण जाऊ शकलेलो नाही. पण माझ्या हिंदू असण्याच्या अनवरत/शाश्वत शोधप्रक्रियेत मला भेटत जाणाऱ्या प्रश्नांच्या उत्तरासाठी मी अजूनही कार्यप्रवणच आहे. म्हणूनच म्हणावयाचे की, मी एक अनबुझ हिंदू.........!!!
(आजकाल कोणाच्याही, कशानेही भावना वगैरे दुखावतात असे ऐकिवात आहे, त्यामुळे माझ्या या टिपणाने तसे काही घडल्यास क्षमस्व, त्रिवार क्षमस्व. तसेच आजकाल अपवाचनाचे प्रमाणही वाढले असल्याचे पदोपदी आढळून येते, तसे झाल्यास त्या अपवाचनार्थाला मी जबाबदार असणार नाही, हे सुद्धा स्पष्ट करू इच्छितो. शिवाय DISSENT : THE VOICE OF PROGRESS हे माझे ब्रीदवाक्य मी अजूनही जपून आहेच.)
🙏🙏🙏
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(दि.16.09.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment