माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका.
माझ्या कवितेमागची माझी एक (एकमेव नव्हे!) भूमिका.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मी माझ्या कवितेतून वैश्विक सत्य सांगत नाही/नसावा. माझ्या पूर्वीच्या कवींनी म्हणे ते सांगितलेच आहे, म्हणून मी पुनरावृत्ती करीत नाही. माझ्या कवितेतून मला जे मांडायचे असते ते वाचकाला इतिहास, वर्तमान व भविष्याचे कालभान देते/द्यावे अशी माझी धारणा/ भूमिका आहे. "तुमचे आमचे सेम असते"- हे निसर्गाधारित नाही, तुमचे आमचे सेम "करावे" लागते. तुमचे आमचे सेम झाल्यावरच जीवनाची खरी गंमत उपभोगता येते, जीवनाची गोडी कळते. त्यासाठी प्रयत्न मात्र करावे लागतात. हे "प्रयत्न" व्यक्तीला त्याचे स्वतंत्र व्यक्तिमत्वही देतात आणि आपल्या व्यक्तिमत्वाचे समष्टीत विलीनीकरण कसे करावे हे सुद्धा शिकवतात. घटकत्वाच्या विज्ञानाधारित सिद्धांतानुसार हे पूर्णतः निसर्ग-स्नेही आणि निसर्गसंमत असते.
एखादे गणित सोडविण्याची एकच एक रीत मला माहित असेल तर मी "वैविध्य" या निसर्गाच्या चमत्काराची मजा चाखू शकत नाही/शकणार नाही. गणित सोडविण्याच्या एकाहून अधिक रिती असतात/असू शकतात आणि सगळ्या रितींनी उत्तर "एकच" येत असले तरी भिन्न-भिन्न रिती भिन्न-भिन्न अनुभवांनी व्यक्तीला अनुभवसमृद्ध करतात, जीवनातील निराशेवर मात्र करायला साह्यभूत ठरतात. एखादी कविता वाचून आत्महत्येला प्रवृत्त झालेली व्यक्तीही सकारात्मकरित्या कृतीप्रवण व साहसी बनून जीवनात अद्भूत आणि अभूतपूर्व कार्य करून जाते. मानवेतिहासात अशी कितीतरी उदाहरणे सापडतील.
गणित, विज्ञान, अध्यात्म आणि प्रतिभा यांचा "संयुग" कवितेला निरनिराळ्या स्तरावर निरनिराळे आयाम प्रदान करतो. हे आयाम शोधण्याची प्रक्रिया सुलभ असेल किंवा कठीण ते कठीणतम असेल- पण ही प्रक्रिया जीवनाच्या अर्थाचा शोध घेण्यासाठी आवश्यकच असते...आणि या शोधप्रक्रियेची प्रत्यक्ष प्रयोगशाळा म्हणजे कविता असते/असावी, असे मी मानतो. (अर्थाचा अनर्थ होऊ नये अशी अपेक्षा बाळगतो.)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे.
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
---------------------||१९.०५.२०२०||----------------------
Comments
Post a Comment