तसं पाहिलं तर या टिपणाला काहीच महत्त्व नाही...!
◇तसं पाहिलं तर या टिपणाला काहीच महत्त्व नाही...!◇
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤▪▪▪¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
1 )कोणताही ग्रंथ न वाचताच ऐकीव माहितीवरून त्या ग्रंथातील तथाकथित लिखाणावर बुद्धीभेद करणारी टीका-टिप्पणी करणे, हे instant विद्वत्तेचे प्रमुख लक्षण आहे.
2)आपली रेषा मोठी करण्यात बुद्धी व ज्ञानाचा उपयोग व वापर करण्याऐवजी दुस-याची मोठी रेषा पुसण्यासाठी आपल्या बुद्धी व ज्ञानाचा उपयोग व वापर केल्यास "विद्वत्ता आणि प्रसिद्धी" ह्या दोन्ही "पदव्या" तात्काळ हासिल करता येतात.
3)रावण व राम (किंवा कोणीही पौराणिक व/वा ऐतिहासिक व्यक्ती) यांच्या बद्दल बोलण्या/लिहिण्यासाठी कोणत्याही अभ्यासाची आवश्यकता नसते. कारण अभ्यास करून बोलले/लिहिले तर त्याच्याकडे कोणी ढुंकूनही पाहत नाही, त्याला वाचक मिळत नाहीत. म्हणून आपल्या आवाक्यातील ऐकीव माहितीचा (ज्ञानाचा नव्हे!) उलट-सुलट "वापर" करून केलेल्या लिखाणाला भरपूर प्रसिद्धी व वाचक मिळणे अगदी सुलभ असते.
4)थोड्याशा सत्याने खूप सा-या असत्याला फोडणी देऊन तयार होणारी सत्त्योत्तर (post truth) रेसेपी ग्राहकांना वाढता आल्यास दुकानात ग्राहकांची रेलचेल असते. माल फटाफट विकला जातो. हा व्यवसाय आजच्या काळात सर्वात सोपा आणि किफायतशीर तथा लाभदायकही ठरत आहे. बेरोजगारांचे लक्ष अजून या व्यवसायाकडे पाहिजे त्या प्रमाणात न गेल्याने या व्यवसायात प्रगतीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत.
5)बीज मी पेरले, झाड मी लावले, म्हणून त्याच्या सा-या फुला-फळांर फक्त मी आणि मीच मालकी (हक्क) गाजवू शकतो, ही प्रवृत्ती यशोशिखरावर धृवाप्रमाणे अढळपदी स्थानापन्न होण्यासाठी अनिवार्य असते. बीज कोणी, कोठून पुरवले, जमीन कोणी उपलब्ध करून दिली, जमीनीची सुपीकता वाढविण्यासाठी कोणी-कोणी रक्त गोठवले, झाड वाढताना त्याची रखवाली व देखभाल कोणी-कोणी केली, झाडाच्या फुला-फळांना जगरहाटीत स्थान मिळवून देण्यासाठी कोणाकोणाचे श्रम व कर्म कामी आले, इ. बाबी विसरून व त्यांचे विसर्जन करून जो आसनस्थ होतो, तोच यशस्वी व लाभधारी(?) मानला जातो. यावर एखाद्याने प्रश्न उपस्थित केल्यास- "साॅरी, साॅरी, चूक झाली..." असे अर्थशत्रू विधान केले की क्षणार्धात (पापी व्यक्तीने गंगेत बुडी मारल्याबरोबर जशी क्षणार्धात पापमुक्ती मिळते तशी) पापमुक्ती मिळून ती व्यक्ती स्वर्गपदाला पात्र ठरते.
6)कोणतेही खोदकाम(!) न करता ठाम(!) असे पुरातत्वीय निष्कर्ष(?) प्रसृत करणे तथा त्याचवेळी प्रत्यक्ष खोदकाम(!) करून अभ्यासपूर्वक व परिश्रमपूर्वक मांडलेल्या निष्कर्षां(!)ना कुत्सित वृत्तीने सपशेल नाकारणे/त्यांची खिल्ली उडवणे, ही सोशल मिडिया युनिवर्सिटीची नवीन ज्ञानशाखा आहे. या युनिवर्सिटीच्या या ज्ञानशाखेत कोणत्याही पूर्वपरिक्षा/पूर्वनोंदणीशिवाय, कोणत्याही गाईड शिवाय तथा कोणत्याही प्रंबंधलेखनाशिवाय Ph.D. चे साभार व सज्ञान(?) वितरण केले जाते, आणि... अशा डाॅक्टर लोकांनाच आजच्या विद्वतजगात सन्माननीय स्थान प्रदान केले जावे, असा अलिखित नियम पारित करण्यात आला आहे.
7).......
□□□
@लखनसिंह कटरे (19.04.2018)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤▪▪▪¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
Comments
Post a Comment