एका अनुत्तरीत पत्राची शोकांतिका(च).....!

प्रति,
आदरणीय श्री.गिरीश कुबेर 
संपादक, 'लोकसत्ता'
फक्त मुंबई. 

विषय :- लोकसत्ता : कविता मनोमनी : एक मोठ्ठा फार्स ... (???)

सप्रेम सादर नमस्कार,

>> माझा पूर्वानुभव लक्षात घेता आपला inbuilt विदर्भ-द्वेष आपल्याला माझ्या या पत्राची सुद्धा दखल घेऊ देणार नाही याची खात्री असल्याने मी हे जाहीर-पत्र लिहिण्याचे धाडस करीत आहे. 

>> आज रविवार, दि.28 मार्च 2021 च्या विदर्भ-द्वेष्ट्या लोकसत्ता च्या पृष्ठ क्र.6 व 7 वर प्रकाशित 'लोकसत्ता : कविता मनोमनी' मध्ये पूर्वग्रहदूषित पद्धतीने सामील करण्यात आलेल्या कवितांचे अवलोकन करावे ही विनंती. 

>> उपरोक्त पृष्ठांवर एकूण 13 (चूक-भूल बद्दल क्षमस्व! 😃) कविता सामील करण्यात आल्या असून त्यातील सर्वाधिक 8 कविता मुंबई-पुणे येथील कवींच्या, एक कविता गोवा येथील कवीची व प्रत्येकी एकेक कविता अनुक्रमे अहमदनगर, आंबेजोगाई, धुळे व एक तिकडल्याच आणखी एका कवीची कविता सामील करण्यात आल्या आहेत. त्यात विदर्भातील एकाही कवी(?)ची कविता मात्र सामील करण्यात आलेली नाही. 

>> या उपक्रमासाठी कवितांची निवड करणा-या दोन्ही विदुषी कवयित्री ह्या पुणे आणि मुंबई येथीलच असल्याने असे घडले असावे काय? अशी एक आलतूफालतू शंका सुद्धा उद्भवते. 

>> या विदुषी कवयित्रींच्या 'वास्तवाचे भान कवितेत आणताना...' या भाष्याच्या पहिल्याच परिच्छेदात असे नमूद आहे की, ''...जवळपास अडीच हजार कविता महाराष्ट्राच्या कोन्याकोप-यांतून आल्या. ..." परंतु असे असूनही या उपरोक्त पृष्ठांवर सामील कविता मात्र फक्त मुंबई, पुणे व परिसर याच भागातील आहेत. म्हणजेच मुंबई, पुणे व परिसर म्हणजेच "महाराष्ट्राचा कानाकोपरा" असावा, असा एक नाविन्यपूर्ण निष्कर्ष काढायला आपली हरकत नसावी, असे मला वाटते. 

>> आदरणीय श्री.गिरीश कुबेर हेच विदर्भ-द्वेष्टे असावेत असेच आजवर वाटत आले होते. परंतु पुणे व मुंबई येथील संदर्भीय विदुषी कवयित्री सुद्धा विदर्भ-द्वेष्ट्या असाव्यात हे नव्यानेच कळले. 

>> तसा आम्हा वैदर्भियांना अशा द्वेषभारित भावनेचा हा काही नवा अनुभव नव्हे. आमच्या विदर्भातील पदमपूर येथे होऊन गेलेला, उत्तर-रामचरित चा रचयिता, महाकवी-नाटककार भवभूति याने खूप पूर्वीच म्हटले आहे की, 
उत्पत्स्यते कोऽपि समानधर्मा 
कालोह्ययं निरवधिर्विपुला च पृथ्वी|| 

>> असो.

>> उपरोक्त प्रमाणे सामील करण्यात आलेल्या 13 ही कविता उत्कृष्ट आहेत, त्यांच्या उत्कृष्टतेबद्दल आम्ही शंका उपस्थित करीत नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे आणि अर्थाचा अनर्थ करू नये ही विनंती आहे.

>> पण, या उत्कृष्ट कवितांमध्ये सामील करता येतील/येईल अशी एकही कविता विदर्भासारख्या "महाराष्ट्राच्या कानाकोप-यांतून" आलेल्या कवितांमध्ये या विदुषी कवयित्रींना आढळून आल्या नाहीत, हे जरा सरळमार्गी वाटत नाही, एवढेच!

>> सबब शेवटी, ----
'हे प्रभो, यांना माफ करा, यांना माहीतच नाही की हे काय करीत आहेत' -- या ईसा मसीह च्या सुप्रसिद्ध कथनाने हे थोडेसे लांबलेले पत्र थांबवतो. 

>> कळावे, लोभ असावा ही सविनय प्रार्थना आहे. 

¤आपला, एक जुना वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(विदर्भ-महाराष्ट्र)
दि.28 मार्च 2021
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन