झापड, घोडा आणि घोडागाडी : एक आठवण
◇◇"झापड", घोडागाडी आणि एक आठवण!◇◇
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
◇◇माझे वडील दि.25 जानेवारी 2018 ला वयाच्या 88व्या वर्षी वयोमानाने थकून निसर्गसामील झाले. ते हाडाचे शेतकरी होते. गायी, म्हशी, बैलजोड्या, हेल्यांच्या जोड्या, बक-या, मेंढ्या, बदका(तिन्ही प्रकारच्या), कोंबड्या, पांढरे ससे, पांढरे उंदीर, कुत्रे, इत्यादींचा आमच्या बालपणी आमच्या घरी अक्षरशः खंडीने जमघटच असायचा. माझ्या वडिलांनी जीवनात कधीही सायकल, बाईक, चारचाकी चालवली नाही, त्यांना ही वाहने हाकताही येत नव्हती तथा क्षमता असूनही त्यांनी ते घेण्याचा वा शिकण्याचा कधी प्रयत्नही केला नाही. त्यांचे आवागमनाचे एकमेव खात्रीचे साधन म्हणजे घोडागाडी!!! 40-50 किमी पर्यंत घोडागाडीनेच जाऊन त्याच दिवशी रात्रीपर्यंत घरी परतणे, हा माझ्या वडीलांच्या हातचा मळच जणू! ते जीवनात कधीही रात्रीला घराबाहेर थांबल्याचे मला आठवत नाही. कितीही उशीर झाला तरी रात्री-बेरात्री सुद्धा ते घरी परतायचेच.
त्यांनी वयाच्या 80-82व्या वर्षापर्यंत घोडे पाळणे थांबवले नव्हते, जरी घोडागाडी कालबाह्य ठरली होती तरी. त्यांनी दोन जोड्या घोडे पाळण्याची पद्धतच रूजवली होती, आमच्या इलाख्यात. आमच्या कडे एक अगदी सोन्यासारखा चकाकणारा पिवळ्या रंगाचा घोडा होता, तो झुलायचा. त्यामुळे त्याला घोडागाडीला जुंपण्यातून सुटकाही मिळाली होती. 1963 ते 1997 पर्यंत म्हणजे मरेपर्यंत तो घोडा आमच्या अंगणाची शोभा वाढवीत होता. त्याच्या मृत्यूची सत्यकथा अविश्वसनीय वाटावी अशीच आहे.
घोडागाडीला घोडे जुंपताना माझे वडील स्वतः खोगीर, लगाम, पोटबंद आणि "झापड" व्यवस्थित "बांधल्या"ची खात्री करीत व ते स्वतःच घोडागाडीचे सारथ्य करीत असत. मी एकदा विचारले की, घोडागाडीला घोडे जुंपताना ते "झापड" कडे "विशेष लक्ष" कां देतात! तेव्हा त्यांनी सांगितलेले "सत्य" हे सार्वकालिक सत्य असल्याचे आजही मला पदोपदी जाणवते. त्यांनी सांगितले होते की, "झापड" व्यवस्थित बांधले(!) म्हणजे घोडे इकडे-तिकडे बिलकुल न पाहता, न लक्ष देता मालकाच्या/सारथ्याच्या इशा-याप्रमाणेच धावतात व मार्गक्रमण सुलभ, सुकर होते! आहेना हे त्रिकालाबाधित/सार्वकालिक सत्य!!!
◇◇जय हो, मोहनभाऊ; जय हो!!!◇◇
(माझ्या वडीलांचे नाव मोहनलाल असले तरी ते सा-या इलाख्यात मोहनभाऊ या नावानेच ओळखले जात.)
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902
(14.05.2018)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment