आमचा आपला विदर्भ ।
आमचा आपला विदर्भ...
~~~~~~~~~~~~~~~
मी यवतमाळ येथे DDR असतानाची एक सत्य घटना. जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सहकार विभागाचे राज्यमंत्री यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात एक आढावा सभा आयोजित केली होती. सभेला जिल्ह्यातील सर्व आमदार महोदय, जि.प.चे पदाधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षकांसह जिल्हा स्तरावरील सर्वच अधिकारी उपस्थित होते. काही पत्रकार मंडळी सुद्धा हजर होती.
या सभेत सहकार, पणन विभागाचा आढावा सादर करताना मी त्यावेळी नव्यानेच सुरू झालेल्या खाजगी बाजार समीत्यांची माहिती सांगताना त्यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या व माझ्या कार्यालयात दररोज खरेदी अहवाल सादर करीत असलेल्या खाजगी बाजार समित्यांची माहिती दिली. त्यावर माजी पालकमंत्र्यांनी जरा रागातच मी त्या तालुकास्थळी सुरूच नसलेल्या खाजगी बाजार समितीची खोटीच माहिती दिल्याचे सांगून मला दटावले. मी त्यांना ती खाजगी बाजार समिती त्यांच्याच गावात सुरू झाली असून माझ्या कार्यालयात त्या समितीच्या दैनंदिन खरेदीची माहिती दररोज येत असल्याची व तालुका सहकार निबंधकांनी त्या बाजार समितीला भेटही दिल्याचे आकड्यांसह माहिती वारंवार देत राहिलो, पण माजी पालकमंत्री मात्र मानायलाच तयार नव्हते. सहकार राज्यमंत्री सुद्धा माझ्यावर रागावले व त्या माजी पालकमंत्र्यासमोर त्यांच्याच गावातील चूकीची माहिती देताय म्हणून माझी कानउघाडणी केली. मी वारंवार सांगूनही माझा अपमान करून मला बसण्यास फर्मावण्यात आले. मी निमूटपणे बसलो.
दुसऱ्या दिवशीच्या एकाही वर्तमानपत्रात माझ्या या अपमानास्पद "फोतरी''ची बातमी नव्हती. वास्तविक अशा प्रसंगांना रंगवून बातमी देण्याची प्रथा यवतमाळच्या पत्रकारांनी मात्र यावेळी मोडली होती. कारण यवतमाळच्या सर्व पत्रकारांना त्यांच्या स्वानुभवानुसार माझ्या कार्यपद्धती, प्रामाणिकपणाबद्दल व माझ्या खरेपणाबद्दल खात्री होती. (त्याबद्दल मी यवतमाळच्या पत्रकारांचा सदैव ऋणी राहीन.)
दुसऱ्या दिवशी दुपारी काही पत्रकार मला भेटायला माझ्या कार्यालयात आले असता मी त्यांना "त्या" खाजगी बाजार समितीच्या आवाराचे फोटो व त्या समितीचे दैनंदिन खरेदी अहवालही दाखवले.
आमच्या विदर्भाचे हेच वैशिष्ट्य असावे की, स्वतःच्या गावातील महत्वाची "बातमी"/"घडामोड" सुद्धा आमच्या स्थानिक/पालक मंत्र्यांना, माजी मंत्री राहिलेल्या वरिष्ठ आमदारांना, नेत्यांना माहितच नसते आणि आम्ही "विदर्भावर अन्याय होतो" असे ओरडण्यासाठी मात्र "तैय्यार" होतो.
#कटू आहे पण सत्य आहे ही घटना!
□□
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार (जि.गोंदिया)
(गुढीपाडवा/06.04.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment