मराठवाडा आणि मराठी
□मराठवाडा आणि मराठी□
~~~~~~~~~~~~~~~
MPSC द्वारे माझी महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात (तत्कालीन कृषी व सहकार विभागात) तालुका सहायक निबंधक म्हणून निवड झाल्यानुसार मी दि.05 मे 1984 ला त्या विभागात रुजू झालो. सुरूवातीचा दोन वर्षाचा परिविक्षा (PROBATION) कालावधी संपल्यानंतर मला प्रथम नियुक्ती मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील पाटोदा या तालुकास्थळी, तालुका प्रमुख म्हणून, मिळाली.
मला सांगण्यात आले होते की, महाराष्ट्रात सर्वात मागास विभाग म्हणजे मराठवाडा विभाग -- या विभागात सर्वात मागास जिल्हा म्हणजे बीड जिल्हा -- आणि बीड जिल्ह्यातील सर्वात मागास तालुका म्हणजे पाटोदा तालुका ! तरी "न घाबरता(?)" मी दि.07 मे 1986 ला पाटोदा येथे रूजू झालो. (त्यावेळी फक्त सहा महिन्याचा असलेल्या माझ्या मुलाची, अनिकेतसिंह ची, HEMENJOYMA ची, कानाखाली गालावर, एक मोठी शस्त्रक्रिया (25 टाके) नागपूर च्या GMC मध्ये नुकतीच झाली होती व त्याला दर पंधरवड्याला FOLLO-UP साठी तेथे (नागपूर ला) न्यावे लागे. म्हणून मी हिंमत करून एकटाच पाटोद्याला पोचलो होतो.)
पादोद्याला त्यावेळी पाण्याची भयंकर टंचाई (!) असल्याने मला रोज आंघोळ करणेही शक्य होत नव्हते. पांजरा नदीचे अस्तित्व शोधल्यावरच जाणवायचे. पण तेथील कर्मचारी वर्ग (रेवलकर, झांजे, मेंगडे अण्णा, बनी मियाँ, दगडू मियाँ, राजू), घरमालक गोरे गुरूजी, गोरे गरुजींची आई (मला भाकर करून द्यायच्या!), शेजारी किसनराव राख व त्यांचा दीडेक वर्षाचा बालक यांनी मला कोणतीही कसर जाणवू दिली नाही. आणि लवकरच मी मराठवाडी हेलसह तेथील प्यारी-प्यारी मराठी पूर्णत्वाने बोलायला शिकलो. उर्दूचा सुवासही अनुभवला. मी अजूनही त्या "मराठवाडी मराठी"च्या प्रेमातच आहे.
मुलाच्या तब्येतीमुळे मला लवकरच तेथून बदलून जावे लागले. दि.31 डिसेंबर 1986 ला मी पाटोद्याहून पदमुक्त झालो. या सहा-सात महिन्याच्या कालावधीत मी जवळपास संपूर्ण पादोदा तालुका फिरलोय, आश्रूबा राख या एका अतिशय उमद्या मनाच्या, प्राथमिक सहकारी संस्थेच्या वयोवृद्ध अध्यक्षाशी, दोस्ती केली. गटसचिव सेवेतील कर्मचारी मेहबूबच्या वडिलांकडून (जे निवृत्त शिक्षक होते) उर्दू लिहायला/वाचायला शिकलो.(आता ते सगळे विस्मरणात गेले!)
आज हे सगळे स्वप्नवत वाटते, पण "मराठवाडी मराठी" ची गोडी अजूनही टिकून आहे.
जय पाटोदा! जय बीड जिल्हा! जय मराठवाडा!
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार-441902, जि. गोंदिया
~~~~~~~~||०६|०६|२०१९||~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment