काही शंका, कुशंका आणि आशंका...
◇◇◇काही शंका, कुशंका व आशंका◇◇♡
***********************************
पृथ्वीच्या पाठीवर मनुष्याच्या अभ्यासासाठी व कल्याणासाठी असलेल्या एकूण एक सर्व अभ्यास-विषयांची तीन मुख्य प्रकारात विभागणी करता येते. ते तीन प्रकार म्हणजे (1)सोपे विषय, (2)मध्यम सोपे/कठीण विषय आणि (3)व्यामिश्र विषय. आणि ज्या प्रकारचा विषय असेल त्याच प्रकारची उपाययोजना, उत्तर-प्रार्थना केली तरच मनुष्याला (पर्यायाने शासन व्यवस्थेला) त्या त्या विषयातील विविध समस्यांचे यथायोग्य समाधान आणि प्रगती-दिशा गवसते.
तसेच इतिहासाकडून यथावश्यक मार्गदर्शन प्राप्त करून त्याचा व सांप्रतकालीन वास्तवाचा सुयोग्य समन्वय साधून भविष्य-वर्धक कार्य केल्यास/करण्यात आल्यास मनुष्य-जातीची उन्नतावस्था व सकारात्मक प्रगती साधता येते.
मला सध्याच्या शासनाच्या धोरणांची या निकषांवर तपासणी करावयाची झाल्यास मी सोप्या आणि मध्यम सोप्या/कठीण विषयांना तूर्त बाजूला ठेवून काही मोजक्या परंतु भविष्यसूचक अशा व्यामिश्र विषयांवरील सध्याच्या शासनाच्या धोरणांची, निर्णयांची, अंमलबजावणीची प्रक्रिया अभ्यासू शकेल. माझ्या अल्पबुद्धीची मला कल्पना असली तरी मी, "We, the people... " मधील एक जबाबदार(?) मतदार व नागरिक असल्याने मला माझे मत मांडण्याचा संवैधानिक मुलभूत अधिकार आहे/असावा असे गृहीत धरून मी माझे (अल्पबुद्धीचे) मत मांडत आहे.
व्यामिश्र विषयांपैकी फक्त तीनच प्रमुख विषयांवरील माझे आकलन मी येथे मांडू इच्छित आहे. ते तीन विषय म्हणजे (1)अर्थशास्त्र, (2)धर्म/धम्म आणि (3)कृषी. हे तिन्ही विषय व्यामिश्र विषयांच्या व्याख्येत आणि प्रकारात मोडतात, याबद्दल "वाद" नसावा असे माझे मत आहे. या तिन्ही व्यामिश्र विषयांवरील सध्याच्या शासनाची; अनुक्रमे 08.11.2016ची नोटबंदी, घाईघाईची G.S.T. अंमलबजावणी, धार्मिक व्यवस्थेतील शासनाची अवास्तव आणि "अ-गुप्त" दखलबाजी, शेतीतील दुष्काळ ठरविण्याबद्दलची अव्यवहार्य निकष-निश्चिती, शेतक-यांना दुय्यम नागरिक समजण्याइतपत अव्यवहार्य व पक्षपाती कृषी-निती, या धोरण-बाबी आणि त्यांच्या अंमलबजावणीचे दुष्परिणाम निरपेक्ष व निष्पक्ष पद्धतीने तपासले असता या व्यामिश्र विषयांवरील, या शासनव्यवस्थेची "सोपी उपाययोजना" कां व कशी फसली याचे यथार्थ समुत्तर मिळून याचे (अत्यंत) दूरगामी दुष्परिणामही लक्षात येतील.
या सरकारच्या एकूण 100% चांगल्या व भविष्यवर्धक भासणा-या कामांत 90-95% कामे सोप्या व/वा मध्यम सोप्या/कठीण विषयांवरील सफलसादृश्य असतील व उर्वरित 5-10% कामे व्यामिश्र विषयांसाठी सोपी पद्धत वापरल्याने फसलेल्यांपैकी असतील तर भारतीय नागरिकाने/मतदाराने यावर किती टक्के गुण या सरकारला द्यावेत, हे प्रत्येकाने आपापल्या आकलन शक्ती, बुद्धी व ज्ञानानुसार ठरवावे लागेल.
यापूर्वीच्या "शासनव्यवस्थे"च्या दुर्व्यवस्थेने व भ्रष्टाचाराने पोळलेली जनता या 'शासनव्यवस्थे"कडे ताकही फूंकून प्यावा या पद्धतीने पाहते आहे, ही वस्तुस्थिती सुद्धा विचारात घेणे आवश्यक तथा अनिवार्यही आहे, हे सांगणे न लगे!!!
माझे हे अल्पबुद्धीचे आकलन "सहानुभूतीपूर्वक(!)" समजून घेऊन सुज्ञ व जाणकार व्यक्तींनी मला मार्गदर्शन करावे ही विनंती. तथा चूक-भूल बद्दल क्षमस्व.
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार, जि.गोंदिया (25.04.2019)
□□□ ●●● □□□
Comments
Post a Comment