काही अर्ज : साचलेले.
*काही अर्ज : साचलेले.*
~~~~~~~~~~~~~~~
साचलेले सारे अर्ज
ठेवले कच्च्या घागरीत मातीच्या
आणि
पेटवून दिली मग भट्टी
कुंभाराच्या आव्याची.
□
सारे अर्ज झाले तबदील
सोन्याच्या सुफल शिक्क्यात
आणि
कुंभार गेला बाजारात
पकवलेली ती घागर विकण्यासाठी.
□
पाणी पिताना आढळून आला
शेतक-याला एक शिक्का सोन्याचा
आणि
तेव्हापासून वाढले मग भाव
मातीच्या "तशा" घागरीचे.
□
सरकार-दरबारी पोचली खबर
झोपलेला साहेब जागा झाला
आणि
आदेशावर निघाले आदेश
"तो" शिक्का जप्त करण्याचे.
□
अखेर केला एकदाचा जप्त
तो पिवळसर सोन्याचा शिक्का
आणि
सुरू झाली मग एक प्रथा(?)
आत्महत्यांच्या नोंदी घेण्याची.
□
अचानक ते शहीद झालेले अर्ज
उगवले एका अनाम "फाईली"त
आणि
पीएच्डी चे प्रबंध स्वस्त होऊन
नवीन व्यवसाय उदयास आला.
□
जप्त केलेला तो पिवळसर शिक्का
फिरतीवर जाता-येता झाला
आणि
वेषांतर करून परतला तेव्हा
त्याला कोणीच ओळखले नाही.
□
आत्महत्यांच्या नोंदीची "फाईल"
सरकली मग साहेबाच्या टेबलावर
आणि
अखेर "त्या" कुंभाराविरूद्ध
पोलीस-फिर्याद गुदरण्यात आली.
□□□
@लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902
(04.02.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment