"आय लव्ह यू...."

□आय लव्ह यू...□
~~~~~~~~~~~~
      1966च्या दिवाळीच्या सुटीनंतर आमच्या बोरकन्हार या गावातील वर्ग 06 ची मान्यता शिक्षण विभागाने काढून घेतली. त्यामुळे दिवाळीनंतर आम्ही 03 किमी वरील जवळच्याच अंजोरा या गावातील माध्यमिक शाळेत सहाव्या वर्गात प्रवेश घेतला. दररोज तीन किमी पायी (Bare footed) जाणे-येणे करीत आमची शाळा सुरू झाली. तिथे मला हरिदयाल धरमदास डोंगरे, गेंदलाल रूधाजी वालदे, रामेश्वर परसरामजी बहेकार, महादेव अंताराम  चौधरी, असे काही अभिन्न मित्र लाभले. त्यापैकी रामेश्वर बहेकार आणि हरिदयाल डोंगरे यांच्यासोबतची मैत्री अजूनही जिवंत आहे. 
       सहाव्या वर्गात आमचे वर्गशिक्षक होते, रघुनाथ मनाजी दोनोडे गुरुजी. इंग्रजी आणि हिंदी शिकवायचे बाजपेयी गुरुजी. मराठी, गणित व इतर सर्व विषय दोनोडे गुरुजीच शिकवत असले तरी गणिताचा वर्ग पुष्कळदा मुख्याध्यापक गोमा दाजिबाजी फुंडे गुरुजी घेत असत. माझ्या आईच्या सुरुवातीपासूनच्या मार्गदर्शनामुळे माझा गणित हा विषय आवडीचा व मजबूत होता. गणिताच्या कोणत्याही परिक्षेत मला 100% गुण असायचे. पण इंग्रजी, इतिहास, भूगोल हे विषय मात्र माझी दांडी उडवायचे. हरिदयाल डोंगरे व गेंदलाल वालदे या दोघांनाही इंग्रजी जणू वश होते. दोघेही इंग्रजीत 100% गुण घ्यायचे.
        गेंदलाल चा मोठा भाऊ गोंदिया येथे कदाचित हायस्कूल किंवा काॅलेज मध्ये शिकत होता. (क्षमस्व, निश्चित आठवत नाही.) गेंदलाल च्या त्या बंधूचेही इंग्रजी चांगलेच होते. तो गेंदलाल ला इंग्रजी विषयात मार्गदर्शनही करीत असे. सातव्या किंवा आठव्या वर्गात असताना एके दिवशी गेंदलाल ने माझ्या वहीत "I love you" लिहिले व त्याचा मराठीत अर्थ काय म्हणून विचारू लागला. मी त्याला माझ्या आकलनाप्रमाणे शब्दशः अर्थ सांगितला, "मी प्रेम तू." यावर तो मोठ्याने हसला व त्याने मला I love you चा "खरा अर्थ" सांगितला. हे त्याला त्याच्या बंधूकडून कळले होते. असा हा माझा "I love you" चा अर्थवृत्तांत!
      पण माझ्या डोक्यात काही केल्या घुसेना की "I love you" चे "मी तुझ्यावर प्रेम करतो" असे भाषांतर कसे काय होते? "तुझ्यावर = on you" आणि "करतो = do" हे "I love you" मध्ये कसे शक्य आहे, याचे कोडे काही मला सुटले नव्हते. माझ्या त्यावेळच्या आकलनानुसार ते "I do love on you" असे काहीतरी असायला पाहिजे होते. पण याबाबत गुरुजी किंवा कोणालाही विचारता सुद्धा येत नव्हते. माझी ही "शंका" खूप दिवस कायमच होती.
      अंजोरा येथे आठवी पर्यंतच शिक्षणाची सोय होती. त्यामुळे आठवी नंतरच्या शिक्षणासाठी मी 06 किमी वरील आमगांवच्या आदर्श विद्यालयात प्रवेश घेतला. आता मला सायकल मिळाली होती, पण पाय मात्र bare footed च! त्यावेळी 09व्या वर्गापासूनच आपला "विषय-संच" निवडावा लागे. मी गणित-सायंस हा विषय-संच निवडला होता. नेमका त्याच वर्षी आमच्या आदर्श विद्यालयात इंग्रजी माध्यमातील New Maths हा विषय सुरू झाला. मला इंग्रजीची भिती वाटत असल्याने सुरुवातीला मला New Maths कसे असेल, मला जमेल किंवा नाही, अशी भितीच वाटली. पण New Maths ची इंग्रजी इतकी सोपी की मला New Maths खूप आवडू लागला व माझी गणितात 100% गुणांची इच्छा पूरी होत गेली.
      मी तत्कालीन हायर मॅट्रीक (अकरावी मॅट्रीक) चा विद्यार्थी होतो. दहाव्या वर्गात आमच्या वर्गशिक्षिका आणि इंग्रजी शिक्षिका होत्या सौ.मंदाकिनी प्रभाकरराव सगदेव मॅडम. त्यांनी एकदा "Stitch in time, saves nine" ही म्हण शिकविताना तिचा अर्थ, इंग्रजी व्याकरण व शब्दरचने बद्दल जे काही ज्ञानामृत आम्हाला पाजले की, त्याने मला "I love you" चे व्याकरणही स्पष्ट झाले व इंग्रजीची भितीही गायब झाली ती आजतागायत गायबच आहे.
         तर अशी ही माझी "I love you"ची साठा उत्तराची संक्षिप्त केलेली कथा-कहानी आहे!!!
@लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
      (11.02.2019)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन