गांधी जयंती निमित्ताने : महात्मा गांधी आणि असेच काहीतरी...
*गांधी जयंती निमित्ताने.....*
====================
*सडेतोड विचारविमर्शासाठी सविनय सादर... (एक मत असेही)*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
*महात्मा गांधी आणि असेच काहीतरी...*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला वाटते आम्ही भारतीय फक्त 'प्रतिक्रिया-वादी' बनून(!) गेलो आहोत. आजची भयावह व अस्वस्थ इंडियन(!) आणि भारतीय(!) वस्तुस्थिती पाहून आम्ही त्याविरुद्ध बोलभांडपणे तुटून पडतो. इंडिया आणि भारतातील सुमारे एकशे चाळीस कोटी जनतेची दोनशे ऐंशी कोटी पेक्षाही अधिक मते रोजच इथे-तिथे प्रकट होत असतात.
"हे चुकीचे घडते आहे, हे अनैतिक आहे, अनैसर्गिक आहे, बेकायदेशीर आहे, संविधानच धोक्यात आले आहे, द्वेष/जात पात संवर्धन/आपसी तेढ/असहिष्णूता वाढत आहे, देशाची एकजिनसी समाजव्यवस्था दुभंगू लागली आहे, राजकारणाची पत ऋणावून गेली आहे, आदर्श मानावा अशी माणसे व स्थिती दुर्मिळात दुर्मिळ झाली आहेत, वगैरे-वगैरे'' यावर आपापल्या परीने व आपापल्या आकलनाप्रमाणे सांगण्या/बोलण्या/लिहिण्याची अहमहमिकाच जणू सुरू झाली आहे.
परंतु हे सर्व "परिणाम"(लक्षणे) मात्र आहेत, ही समस्या नसून समस्येचे हे "परिणाम"(लक्षणे) आहेत, हे आम्ही जाणीवपूर्वक(!) विसरून गेलो आहोत. एक पाश्चिमात्य विचारक म्हणतो की, तुम्ही डोळेझाक करून सत्य नाकारू शकता, पण "त्याचे परिणाम" मात्र तुम्हाला भोगावे/झेलावेच लागतात. "परिणाम" तुम्ही कदापिही नाकारूच शकत नाही.
आजची इंडियन/भारतीय भयावह व अस्वस्थ वस्तुस्थिती "अशी" का झाली, हे का आणि कसे घडले? याचा साकल्याने, निरपेक्ष व निष्पक्ष दृष्टीने विचार केला तर आजची ही वस्तुस्थिती, "कोणत्यातरी भयंकर चुकीचे परिणाम" मात्र आहे, हे नाकारता येणार नाही. आता प्रश्न उपस्थित होतो की, "ती चूक/त्या चूका" कोणत्या आणि "ती/त्या चुकीचा" कर्ता/जबाबदार कोण? हे का आणि कसे घडले? या महत्त्वाच्या प्रश्नावर मात्र आम्ही सारे इंडियन आणि भारतीय मौनच आहोत/असतो.
15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री एक ऐतिहासिक घटना घडली आणि इंडिया/भारतात फक्त TRANSFER OF POWER/सत्तांतर घडून आले. या सत्तांतराने फक्त सत्ताधारी बदलले, सत्तेचे स्वरूप आणि तद्जनित प्रशासनव्यवस्था मात्र बदलल्याचे ठामपणे म्हणता/सांगता येत/येणार नाही. या बदललेल्या सत्तेत मूलभूत भारतीयता, भारताचा आत्मा(!) आणि मूलभूत भारतीय संकल्पना, भारताची अनादिअनंत अशी संस्कृती मात्र आली(!)च नाही. मी जर चूकत नसेन तर सुमारे आठ-नऊ दशकांपूर्वीच (डिसेंबर 1928 च्या "यंग इंडिया" या नियतकालिकात) महात्मा गांधी यांनी निदर्शनास आणून दिले होते की, पाश्चिमात्यांच्या औद्योगिकरणाचे अंधानुकरण करण्याची दुर्बुद्धी भारताला न होवो! ...... काही वंश आणि प्रदेश यांना पिळवणूकीसाठी वापरल्याशिवाय आणि पर्यावरणाच्या तथा अनाघ्रात निसर्गाच्या सतत एकतर्फी लूटीशिवाय व विनाशाशिवाय पाश्चिमात्यांच्या औद्योगिकीकरणाचे आणि तद्जनित विकासाचे धोरण राबविताच येत नाही. आज महात्मा गांधी यांच्या सुमारे नव्वद वर्षापूर्वीच्या निदानाचे परिणाम आम्ही पाहत व भोगत आहोत, असेच म्हणावे लागेल.
यावर "गड़े मुर्दे उखाडनेसे क्या फायदा?" असा नेहमीचा ठेवणीतला प्रश्न अवश्य फेकता येईल. पण कोंबडा झाकून आम्ही सत्य-सूर्याला लपवू शकत नाही ना, त्याचे काय?
हा विषयच गंभीर आणि दीर्घ विवेचनाचा आहे. त्यामुळे सध्याच्या या सोशल मिडीयाच्या अल्पजीवी/आभासी फोरमवर मला "संक्षिप्त" रुपातच व्यक्त होणे अनिवार्य असण्याची मर्यादा आहे.
तथापि थोडक्यात स्पष्ट करणे आवश्यक आहे की, 30 जानेवारी 1948च्या, सत्ता-हस्तांतरीत भारतीय इतिहासातील आजवरच्या, सर्वात भयावह घटनेमुळे भारतीय सत्ता राबवताना तथाकथित पाश्चिमात्य प्रतिमान भारतीय परिवेशात बिलकुल उपयोगाचे नाहीत हे सत्यच झाकोळले गेले. कारण पाश्चिमात्य विकास प्रतिमान भारतातच नव्हे तर वैश्विक पातळीवर सुद्धा चिरस्थायी ठरू शकत नाही, हे पुन्हा पुन्हा ठासून सांगणारा गांधीच निमाला होता/निमवण्यात आला होता! (जे आज आपण सत्यात उतरलेले पाहत व अनुभवत आहोत!)
भारतीय सत्ता (भारत या सनातन व शाश्वत संकल्पनेला पूरक) आणि भारतीय सम्यक/शाश्वत विकासाचे परिमाण हे शेती, शेतकरी, ग्रामीणता, आदिवासी व त्यांचा "जल-जमीन-जंगल हा परिसर" या मूलभूत घटकांच्या पर्यावरणनिष्ठ, निसर्ग-सुसंगत, मितव्ययी व सर्वसमावेशक अशा स्वाभाविक कार्यकौशल्यातच दडलेले असल्याचे आणि भारतीय अर्थव्यवस्थेचा तथा संकल्पित सर्वच विकासात्मक प्रतिमानांचा आत्मा आणि पाया शेती-ग्राम-शेतकरी-वन-आदिवासी-विकासातूनच विकसित होऊन शिखराकडे परिचालित होऊ शकतो, हे शुद्ध भारतीय विचारधारेत अंतर्भूत असलेले परमसत्य पाश्चिमात्य विचारसरणीने ग्रस्त तत्कालीन सत्ता-राबवणूकदारांना कळूच शकले नाही. (कळूही शकत नव्हते.) "उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी आणि निदान भीक" ह्या पाश्चिमात्य विचारसरणीच्या हेटाळणीने विकृत करून सोडलेल्या/भरकटवलेल्या परंतु भारतीय-परमसत्य असलेल्या तसेच मूलभूत भारतीय सत्ता राबवणूक व भारतीय सम्यक/शाश्वत विकासाचे गमक असलेल्या "धोरणा"ला, आम्ही(?) "पुराणातील वांगी(वाणगी)" समजून वाळीत टाकले व "भीकेलाच" श्रेष्ठत्व प्रदानाचे धोरण अट्टाहासाने राबवले. आणि पर्यायाने आजचे #BitterReality चे वास्तव आम्ही भोगत/पाहत/अनुभवत आहोत!
कोणत्याही मजबूत व चिरस्थायी शिखर-बांधणीसाठी पाया मजबूत असावा लागतो ह्या परमसत्याकडे जाणीवपूर्वक डोळेझाक करून फक्त शिखर-बांधणीलाच अतिरेकी प्राधान्य व प्राथम्य देण्याचे व पाया-बांधणीला ऋणावस्थेत ढकलण्याचे प्रारंभीच्या इंडिया-वादी स्वप्नाळू सत्ता-राबवणूकदारांनी केलेल्या प्रमादाचे परिणाम(लक्षणे) आजच्या भारतीय-अस्वस्थ-प्रमादी-अवस्थेचे "प्रारूप"(?)च म्हणावे लागेल! शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या आणि पर्यावरणाचा अनैतिहासिक ऱ्हास व पर्यायाने निसर्गाचे रौद्रतम रूप आदि गंभीरतम संकटमालिकांचे मूळ अशाप्रकारे या इंडिया-वाद्यांच्या अशा प्रमादातच असल्याचेही प्रथमदर्शनी स्पष्ट होते.
याच संदर्भात अगदी पूरक ठरावे असे एक मत/विचार राही मासूम रज़ा यांच्या "अरबी-फ़ारसी की क़िस्सागोई : भारतीयता की पहचान : दास्तान-ए-तिलिस्म होशरुबा"* या उर्दू शोधग्रंथाचा सीमा सग़ीर यांनी केलेल्या हिंदी अनुवादात सापडते. त्याचा मराठीत स्वैर अनुवाद असा -
"मनुष्याच्या जीवनाकडे त्याच्या नैसर्गिक वातावरणापासून वेगळे करून पाहणे म्हणजे जीवनाच्या खऱ्या रूपाकडे पाठ फिरवणे होय. कारण मनुष्य हा निसर्गापासून वेगळा नाही — तो निसर्गाचाच एक अविभाज्य अंश आहे. जरी तो निसर्गाशी झगडतो, तरी त्याचे अस्तित्व निसर्गाशी नितांत गुंफलेले आहे. सभ्यता, कला आणि मूल्यव्यवस्था या साऱ्यांची पाळेमुळे याच संघर्षात खोलवर रोवलेली आहेत. समाजाच्या विकासाचा एकही टप्पा असा नाही की जो निसर्गाशी संबंध नाकारू शकतो. कारण सामाजिक जीवन हे निसर्गापासून विलग राहूच शकत नाही.
मनुष्यही नद्या, डोंगर, फुले आणि वाऱ्याच्या झुळकीप्रमाणे आपल्या नैसर्गिक वातावरणात जगतो. परंतु त्याच्यात आणि निसर्गातील इतर रूपांमध्ये एक सूक्ष्म पण गहन फरक आहे. निसर्गातील इतर रूपे — वृक्ष, नदी, पर्वत वा प्राणी — एकमेकांकडे दुर्लक्ष करून जगतात, कधीकधी मरतातही; पण मनुष्य तसे करू शकत नाही. त्याला निसर्गाकडे डोळेझाक करून जगणे शक्य नसते. उलट, तो निसर्गाला आपल्या जीवनात सामावून घेण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यातील सौंदर्य आणि रहस्य आपल्या अनुभवात उतरवू पाहतो.
फुलांसारखा स्वतः सुवासिक होणे त्याला शक्य नसते, म्हणून तो फुलांमधून सुगंध काढतो, त्याचे इत्र तयार करतो आणि ते टिकवण्यासाठी इत्रदान बनवतो — हेच म्हणजे संस्कृतीचे पहिले चक्र. जेव्हा पर्वत आपल्या उंचीची गाथा सांगतात, तेव्हा मनुष्य त्या दगडांनाच घडवून अजिंठ्यासारख्या कलाकृती निर्माण करतो. झरे, नद्या आणि वाऱ्यांच्या सुरेल गाण्यांतून तो राग रंगवतो, वाद्य निर्माण करतो आणि कविता रचतो.
अशा रीतीने सामाजिक जीवन — जे राजकीय व सांस्कृतिक जीवनाचे सुद्धा अधिष्ठान आहे — ही प्रत्यक्षात मानव आणि निसर्ग यांच्या अखंड संघर्षाची कहाणी आहे. कधी मनुष्य या संघर्षात हरतो, तेव्हा तो निसर्गाला ईश्वर मानतो; आणि जेव्हा तो जिंकतो, तेव्हा तो चंद्र-ताऱ्यांपर्यंत पोहोचण्याची स्वप्ने पाहू लागतो."
यात नमूद "भारतीयता की पहचान" बद्दलचे सर्वसाधारण विचार लक्षात घेता आपण अशा निष्कर्षाप्रत पोचतो की, सत्तांतर झाले तेव्हाच्या सत्ता-राबवणूकदारांना हे सत्तांतर खऱ्याखुऱ्या भारतीय संकल्पनेच्या शासन-प्रशासनसंस्थेत बदलून घेण्याची व हे सत्तांतर वास्तविक प्रजासत्ताक म्हणून राबवण्याची सुसंधी होती. परंतु गांधी, पटेल, सुभाष, आंबेडकर सारखे सच्चे भारतीय मातीचे पुत्र भारत-मातेच्या पोटात, एकामागोमाग, लवकरच विसावून गेले होते. परिणामस्वरूप पाश्चिमात्य संस्कृती आणि विचारसरणीच्या आहारी गेलेल्या सत्ता-राबवणूकदारांनी मूलभूत भारतीयतेला गाडून टाकायला प्रारंभ केला व त्या प्रमादाचे "परिणाम" आता/आज सुद्धा आम्ही भोगतो/पाहतो/अनुभवतो आहोत. आज इंडिया/भारतात प्रजासत्ताक शासन व्यवस्था नसून प्रत्यक्षात पक्षसत्ताक व पर्यायाने व्यक्तिविशेषसत्ताक शासन व्यवस्था सुरू असल्याचेही आम्ही आपले डोळे, कान, बुद्धी वगैरे झाकून पाहतो आहोत.
ह्या भयकारी परिणामाला तत्कालीन कोणी एखादी "व्यक्ती" कारणीभूत नसून एक लाॅबी-संपृक्त सामूहिक विचारसरणी (शक्तिशाली अल्पगट?) आणि स्वहित-शरण/स्वार्थपरायण परजीवी राजकारणी(?) याला कारणीभूत आहे/आहेत. कारण व्यक्तीला "आवरता" येते, पण लाॅबी-संपृक्त सामूहिक विचारसरणीच्या वृत्तीला (शक्तिशाली अल्पगटाला) "आवरणे" परजीवी, स्वार्थी व कणाहीन व्यक्तींसाठी कठीण/असंभव असते. त्यासाठी गांधी, पटेल, सुभाष, आंबेडकर सारख्या लोकोत्तर व्यक्तींचा पृथ्वीवरील प्रत्यक्ष संचार अनिवार्य ठरतो. परंतु आम्ही नेमके हेच गमावल्या(!)ने INDIAN TRANSFER OF POWER च्या तथाकथित Power Brokers नी भारतीय स्वातंत्र्याचे सहज अपहरण केले व आजतागायत त्या अपहरणातून "भारतीय स्वातंत्र्या"ची सुटका झालेली नाही, असेच दिसून येत आहे.
(कधीकधी (?) काही स्वाभाविक "भास" होतात की, आता "सुटका" होऊ शकेल. पण हा "भास" मृगजळ ठरून त्याचा गर्भपातच होत असल्याचे आढळून येते. उलट यापेक्षा पूर्वीचा भ्रष्टाचार, अनितीचार, परिवारशाही, अभारतीय विचारपद्धती, विकासाची विनाश वृत्ती परवडला/ली असे अतिशय हताश(?) उद्गार बहुतांश लोक व्यक्त करू लागल्याचे दिसून येते.)
....आणि आम्ही(?) मात्र सूर्यप्रकाशाइतक्या सुस्पष्ट अशा "पारिस्थितीक सत्या"च्या "कारण"स्वरूपाला/समस्येला नाकारून त्याच्या "परिणामा"वरच (लक्षणांवरच) चिंता व्यक्त करण्याचे "प्रतिक्रियात्मक" शहामृगी ढोंग साभिनय साकारण्यातच मग्न आहोत....! जणू आम्हा "भारतीयां"चा शक्तीपातच झाला आहे....!
¤
(*प्रकाशक : वाणी प्रकाशन, 4695, 21-ए, दरियागंज, नयी दिल्ली-110002)
□
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि. गोंदिया.
(02 ऑक्टोबर 2025)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment