तर्क आत्महत्या करताना....!

*तर्क आत्महत्या करताना...!*
~~~~~~~~~~~~~~~
        दि.18.01.2009 च्या, चामोर्शी-गडचिरोली रस्त्यावरील, टाटा सुमोने झालेल्या एका जीवघेण्या अपघाताने (Brachial Plexus Injury ने) मला डाव्या हाताने दिव्यांग केले असले तरी, त्यानंतर वर्षभरातच दि.26.07.2010 ला निदान झाल्यानुसार, Renal Cell Carcinoma नावाच्या Kidny Cancer ने माझ्याशी लढण्याचे (की दोस्ती करण्याचे?) ठरविलेच. 
      दि.26.07.2010 ते 31.07.2010 दरम्यानच्या सर्व वैद्यकीय चाचण्यांनी माझ्या उजव्या किडनीतील Cancer/Renal Cell Carcinoma ची खात्री करून दिली. दि.12.08.2010 ला नागपूर येथे शस्त्रक्रिया करून माझी उजवी किडनी मला त्यागावी लागली. Cancer समूळ उखडून टाकल्याचे संबंधित डाॅ. नी सांगितले. तरी पुन्हा खात्री करून घेण्यासाठी येत्या सहा महिन्यात अवश्य WHOLE BODY PET SCAN करून घेण्याचा सल्ला दिला. 
        दि.29.11.2010 ला RUBY HALL Clinic Pune येथे तसा Scan केल्यावर Cancer ने अजून पूर्णतः दोस्ती सोडली नसल्याचे कळले. आता Chemo की Radiation असा पर्याय डाॅक्टरने समोर ठेवला. कॅन्सरतज्ज्ञ असलेले व स्वतः Cancer patient राहिलेल्या डाॅ.अरविंद बावडेकर यांची ''कँसर : माझा सांगाती" (मौज प्रकाशन) ही गाथा-पुस्तक वाचून झाली होती. अर्थातच Chemo हा पर्याय 100% नामंजूर/अस्वीकार्य होता. मग दीड महिने (डिसेंबर 2010 - जानेवारी 2011) Ruby Hall Clinic येथेच Radiation चे डोज(?) घेतले. 
      पुढे 3 महिन्यानंतर histopathology केली. Cancer घाबरला असावा असा डाॅक्टरनी अंदाज व्यक्त केला. दरम्यान सप्टेंबर 2010 पासून मी आयुर्वेदीक आणि जडीबूटी ची औषधही एका जाणकार नाडीवैद्याकडून नियमित घेत होतोच. सोबतच जपजाप्य व हवन थेरपी सुद्धा सुरू होतीच. शेवटी  फेब्रुवारी 2011 च्या PET SCAN नंतर CANCER घाबरल्याचे डाॅक्टरना जवळजवळ पटले. आणि त्यानंतर अजूनतरी CANCER मला घाबरून(?) आहे.
         परंतु उपरोल्लेखित Histopathology साठी उजव्या किडनीच्या अवशेषातून sample काढताना उजव्या कमरेतून पाठीमागून "सुई" टोचताना ती "अनवधानाने" माझ्या लहान आतडीला छिद्र पाडून गेली. (अशी दुर्घटना(!) म्हणे लाखात एखादीच घडते! म्हणजे मी "लाखात एक" म्हणावे/समजावे काय?) त्या छिद्रातून सलग सहा महिने semiliquid fluid वहायचे. सुरुवातीला आम्ही व माझे कौटुंबिक वैद्यक डाॅ.तायडे त्याला पसच समजायचो. पण तो थांबतच नसल्याने, डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार सविस्तर अशा सघन/दीर्घ निदानानंतर, माझ्या लहान आतडीला छिद्र पडल्याचे व त्यातुन ते पससदृश्य fluid निघत असल्याचे कळले.  
      *दि.08.09.2011 ला ते छिद्र बुजवण्यासाठी जीवघेणी शस्त्रक्रिया करावी लागली. ही अवघड व वेळखाऊ शस्त्रक्रिया यवतमाळ येथे संजीवनी हाॅस्पिटल मध्ये डाॅ.अमोल देशपांडे यांनी हिंमतीने यशस्वीरित्या पार(!) पाडली. त्याबद्दल डाॅ.देशपांडे यांना शतशः धन्यवाद आणि आभार! शस्त्रक्रियोत्तर 15-16 दिवस अन्न आणि पाण्याशिवाय फक्त सलाइन वर, हाॅस्पिटलमध्येच, काढावे लागले. (या स्वानुभवाच्या आधारे, देव असल्यास त्याला विनंती की, कोणालाही अशाप्रकारे "पाण्याशिवाय" राहण्याची पाळी येऊ देवू नकोस रे बाबा!)*
          एकूण आठ-नऊ शस्त्रक्रियांचा "अनुभव" घेतलाय. Cancer शी यशस्वी लढत दिली. पराभव स्वीकारला नाही, अजूनतरी. हा सर्व "स्वानुभव" तर्कशुद्ध व बौद्धिक कारणमीमांसेसहीत कसा अभिव्यक्त करावा, यासंबंधीची माझी अवघड शोधयात्रा अजूनही सूरूच आहे. स्थूल विश्वातील न्यूटनचे नियम त्यासाठी अपूरे पडतात असे वाटते. अद्यावत भौतिक शास्त्राचे, Quantam/Nuclear Physics चे काही नियम येथे लागू पडतील काय याच्या शोधात आहे.
         देकार्त ची विखंडित विचारप्रणाली या संदर्भातील सटीक आकलनासाठी अपुरी पडत असल्याचे जाणवते. अखेर एकात्म विचारप्रणाली ला च शरण जावे लागेल असे मला वाटते. विश्लेषणाऐवजी भारतीय संस्कृतीने जपलेली संश्लेषणाची पद्धतच यासाठी अवलंबावी लागेल असेही वाटून जाते.
         अर्थातच जेथे तर्क आणि बौद्धिकता आत्महत्या करू लागते तेथून पुढचा प्रवास अनाकलनीय का असतो, याचा शोध कधीतरी लागावा अशी अपेक्षा बाळगून आहे.
¤
@ॲड.लखनसिंह कटरे,
(निवृत्त डीडीआर, यवतमाळ)
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया. (24 जाने. 2022)
~~~~~~~~||ॐ||~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन