मुस्लिम तुष्टीकरण : एक पॅरेडाइम

           *मुस्लिम तुष्टीकरण : एक पॅरेडाइम*
          ~~~~~~~~~~~~~~~~~~~
        अहिंसा, प्रेम, शांती आणि क्षमा ह्या संकल्पनांचा मार्ग हा One Way Traffic चा कदापि असू शकत नाही. ह्या संकल्पना साद आणि समसमान प्रतिसाद या नैसर्गिक धारणेवर/नियमावर आधारित असणे क्रमप्राप्त/अनिवार्य ठरते. वैज्ञानिक तथा वैधानिक दृष्टिकोनातून सुद्धा विचार केला असता प्रत्येक क्रियेच्या क्रियमाणातच प्रतिक्रिया दडलेली/अनुस्यूत असते. परंतू, 15 ऑगस्ट 1947 च्या सत्तांतरोत्तरच्या राज्यकर्त्यांनी आपल्या तत्कालीन व नंतरच्याही शासकीय कार्यपद्धतीत याचे फक्त विलोपन करण्याचेच धोरण अवलंबिले असे दिसून येते.
      वस्तूतः सत्तांतरपूर्व व सत्तांतरोत्तर कालावधीतील अभूतपूर्व धार्मिक दंगे व भयंकर मारकाटीच्या माहोलातही भारतभूला आपले मानून या भारतभूमीतच राहण्याचा निर्धार व्यक्त केलेल्या मुस्लिम बहुसंख्य विचारसरणीला; आदिकालापासून स्वयंसिद्ध असलेल्या; भारतीय संस्कृतीत सामावून घेणे सहज सुलभ व शक्य होते, असे माझे तद्विषयक अल्पस्वल्प अभ्यासाचे निष्कर्ष आहेत. तथापि सत्तांतरोत्तर राज्यकर्त्यांनी मात्र या पुरातन भारतीय संस्कृतीप्रणित अहिंसा, प्रेम, शांती व क्षमा या धोरणाचा यथायोग्य, न्यायसंगत व निसर्ग-संमत असा अवलंब न करता काही मोजक्या धर्मांध मुस्लिम व्यक्तींना जोपासण्यात, जोजवण्यात व प्रोत्साहन देण्यातच धन्यता(?) मानली अशी तत्कालीन ऐतिहासिक वस्तुस्थिती होती/आहे. अशा या भेदभावजनक प्रवृत्ती व तद्जनित धोरणाद्वारे सत्तांतरोत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी तद्विषयक अगदी धरबंध सोडल्यासारख्या वस्तुस्थिती-निदर्शक बाबीचे अस्तित्व, सच्च्या भारतीय संस्कृतीतील व्यक्तीला नाकारता येत/येणार नाही. मा.हमीद दलवाई सारख्या कितीतरी सच्च्या मुस्लिम विचारवंतांना अक्षरशः डावलून, त्यांच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष करून, काही मोजक्याच धर्मांध मुस्लिम व्यक्तींना, सत्तांतरोत्तर राज्यकर्त्यांद्वारे शासकीय बळ पुरविण्यात आले, ही सुद्धा #कटूतम व उद्रेकजनक अशी वस्तुस्थिती होती/आहे.
        वस्तूतः मूळ भारतीय संविधानात मुस्लिम तुष्टीकरणाचा लवलेशही नसताना सत्तांतरोत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी फक्त एकगठ्ठा मतांच्या स्वार्थासाठी मुस्लिम तुष्टीकरणाची प्रवृत्ती जोपासली, वाढवली.
        तत्कालीन वास्तविकतेकडे पाहिले असता धर्माच्या नावावर व आधारावर निर्माण झालेल्या पाकिस्तानात जाण्याचे नाकारून भारतभूतच राहण्याचा समंजस निर्धार अवलंबिलेल्या तत्कालीन मुस्लिम व्यक्ती व त्यांचे मन, हिंदू-मुस्लिम एकात्मभावासाठीच्या व भारतभूच्या प्रेमासाठीच्या मनोभूमीने संपृक्त होते. अशावेळेस हमीद दलवाई सारख्या मुस्लिम विचारवंत व scholars यांना शासकीय प्रोत्साहन व आधार देणे परमावश्यक व क्रमप्राप्त होते. पण सत्तांतरोत्तर भारतीय राज्यकर्त्यांनी ती अमूल्य संधी गमावून भारतीय संविधानातही नसलेल्या बाबी, कायदे, प्रथा नव्याने उकरून काढून, ही #कटूतम व उद्रेकजनक वस्तुस्थिती अक्षरशः निर्माण केली, ही बाब कोणाही सच्च्या सर्वधर्मसमभाव जगणाऱ्या/जपणाऱ्या भारतीय व्यक्तीला नाकारता येणार नाही. अशा या उपरोल्लेखित कटूतम व उद्रेकजनक बाबीची, कठोर प्रतिक्रिया आज-ना-उद्या प्रकटणे वैज्ञानिक, वैधानिक व नैसर्गिकरीत्या क्रमप्राप्तच होती/आहे. मानवीय दृष्टिकोनातून अशी कठोर प्रतिक्रिया उमटणे व तिला प्रोत्साहन देणे अर्थातच गैर व अ-मानवी ठरते, भारतीय संस्कृतीच्या प्रकाशात अयोग्य/अस्वीकार्यही ठरते. पण निसर्ग-नियम मात्र अशा कोणत्याच मानवी/अ-मानवी प्रवृत्तींपासून अलिप्तच असतात, ही बाब नाकारून तिचे एकांगी, एकतर्फी व पक्षपाती विश्लेषण करणे माझ्यातील वैज्ञानिक, वैधानिक व नैसर्गिक विचारधारेला मान्य करता येत नाही. 
         याचा अर्थ मी मुस्लिमद्वेष्टा आहे/होतो, असे कदापि नाही. उलट माझा याबाबतीतला स्वानुभव असा की, माझे जितके मुस्लिम मित्र आहेत, त्यांच्या विचारात मला असा सत्तांतरोत्तर धर्मांध मुस्लिम तुष्टीकरणाचा भाव बिलकुल जाणवला/जाणवत नाही. विद्यार्थी दशेत सुमारे सहा-सात वर्षे मी एका मुस्लिम कुटुंबाच्या घरी भाड्याने राहत होतो. तेथील कुटुंबप्रमुख महिला, ज्यांना मी अम्माजी म्हणून संबोधित असे, त्यांनी मला आपल्या सख्ख्या मुलासारखा स्नेह, प्रेम व आदर दिला. माझे घरातील नाव-संबोधन 'बडाभाऊ' असे होते, अम्माजी मला फक्त 'बडाभाऊ' याच संबोधनाने संबोधित असत. त्यांच्या घरी विशेष प्रसंगी शिजवण्यात येणाऱ्या veg पक्वान्नावर माझाही हक्क अम्माजीने अबाधित ठेवला होता. त्या कुटुंबाचे कुटुंबप्रमुख अब्बाजींचा सुद्धा माझ्यावर अतिशय लोभ होता. त्यांच्याघरी भाड्याने राहत असताना स्वयंपाकपाण्यासाठी माझ्या वडिलांनी माझ्यासोबत एक नोकर/सेवक दिला होता. कधीकधी तो सेवक सोबत नसताना मला एकटे वाटू नये, रात्री झोपताना भिती वाटू नये म्हणून अब्बाजी माझ्या रूमसमोरील व्हरांड्यात खाट टाकून झोपायचे. आता अम्माजी व अब्बाजी दोघेही हयात नाहीत, पण त्यांची दोन्ही मुले व त्यांचे कुटुंबीय आजही माझ्यावर अगदी तसाच लोभ व स्नेह बाळगून आहेत. अजूनही आमच्या दोन्ही कुटुंबातील घरोबा कायम आहे.
         अशा सच्च्या मुस्लिम व्यक्तींना प्रोत्साहन देण्यात सत्तांतरोत्तर भारतीय राज्यकर्ते सपशेल अपयशी ठरल्याने मला, "मी हिंदू आहे व मी मंदिरात जाऊन पूजा-अर्चना करतो" हे जाहीररीत्या सांगताना संकोच वाटायचा, इतका या सत्तांतरोत्तर भारतीय राज्यकर्त्यांच्या मुस्लिम तुष्टीकरणाचा प्रभाव व परिणाम भारतीय समाजमनावर झाला असल्याची वस्तुस्थिती कोणालाही, किमान माझ्यासारख्यांना तरी,  नाकारता येणार नाही. अशा या वस्तुस्थितीची नैसर्गिक प्रतिक्रिया उमटली तर ती प्रतिक्रिया कशी हाताळावी, हा अभ्यासाचा विषय अवश्य होऊ शकेल/आहेच. त्या प्रतिक्रियेची भलावण सुद्धा करता येत नसली तरी तिचे निराकरण अहिंसा, प्रेम, शांती आणि क्षमा या संकल्पनांचा यथायोग्य वापर/अवलंब करूनच करणे क्रमप्राप्त तथा अनिवार्य तथा ठरेल/ठरते, असेही माझे नम्र आकलन आहे.
      अशी ही सुस्पष्ट, निकट इतिहाससिद्ध, #कटूतम व उद्रेकजनक बाब असताना मा.श्री.हर्षे सरांच्या या लेखातील, मी नमूद केलेल्या परिच्छेदात व्यक्त अस्फुट(?) विचारात मला 'मुस्लिम तुष्टीकरणा'चा वास आला/येतोय. म्हणूनच मी या अतिशय सुंदर व विचारप्रवर्तक लेखातील या परिच्छेदांतून व्यक्त विचारांना संपूर्ण लेखातील "अपवाद" मानतो/समजतो. असो. 
चूक-भूल क्षमस्व.
@ॲड.लखनसिंह कटरे,
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन