Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम

*Language, भाषा आणि बोली : एक पॅरेडाईम*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     मुंबई, पुणे सारख्या नागरी/महानगरीय भागातील (सर्वच नसले तरी) बहुतेक मराठी साहित्याच्या व साहित्यिकांच्या "लघुवर्तुळ-Language"च्या परीघाबाहेरील आम्हा पूर्व विदर्भ-महाराष्ट्रीयन झाडीपट्टीवासीयांची "भाषा" मुंबई, पुण्यासारख्या भागातील बहुतेक साहित्यिकांना "विटाळ"णारी वाटत असल्याची #कटू जाणीव होऊ लागल्याने, सर्वप्रथम 1990 दरम्यान आम्ही पूर्व विदर्भातील झाडीपट्टीवासीयांनी झाडीबोली साहित्य मंडळाची स्थापना केली. 
     .....आणि आजवर तिचे बत्तीस/32 साहित्य संमेलन, शासनाच्या कोणत्याही कुबड्यांशिवाय, अर्थसाह्याशिवाय यशस्वी रित्या पार पाडले आहेत. बत्तीसावे झाडीबोली साहित्य संमेलन 28, 29 डिसेंबर 2024 ला वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथे यशस्वीरित्या पार पडले आहे. या बत्तीसाव्या संमेलनाच्या संमेलनाध्यक्ष पदी झाडीपट्टीतील सुप्रसिद्ध शाहीर, गझलकार, लोककलावंत श्री.लोकराम शेंडे यांची एकमताने निवड करण्यात आली आहे/होती. 
     (मी स्वतः वरोरा(आनंदवन), जि.चंद्रपूर येथेच यापूर्वी जानेवारी-2004 मध्ये झालेल्या अकराव्या झाडीबोली साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो. या अकराव्या (2004 च्या) संमेलनाचे वैशिष्ट्य असे की, आनंदवन येथील जगप्रसिद्ध वाद्यवृंदाची मेजवानी स्वतः डाॅ.विकस आमटे यांनी आम्हाला या साहित्य संमेलनादरम्यान दिली होती. हा एक जागतिक विक्रमच म्हणता येईल!)
     याच झाडीबोलीपासूनच (सम्भवतः) प्रेरणा घेऊन  दि.04.11.2018 ला पूर्व विदर्भातील वैनगंगा-वाघ नदीच्या खोऱ्यात सुमारे तीनशे वर्षापूर्वी, मालवा-धार येथून येऊन, स्थायी झालेल्या शस्त्र-शास्त्र पारंगत अशा प्राचीनतम क्षत्रिय पोवार/समाजाच्या पोवारी बोलीतील साहित्य, या समाजाने जपलेली कला व संस्कृतीच्या पुनरुत्थान, संवर्धन व प्रचार-प्रसारासाठी "पोवारी/पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळ" या राष्ट्रीय स्तरावरील साहित्य व सांस्कृतिक मंडळाची स्थापना करण्यात आली असून पोवारी बोली साहित्य, कला, संस्कृतीचे पहिले यशस्वी संमेलन 2019 च्या वसंत पंचमीला म्हणजे दि.03 फेब्रुवारी 2019 ला घुमाधावडा/तिरोडा, जि.गोंदिया येथे यशस्वीरित्या पार पडले. या पोवारी बोलीचेही आजवर पाच साहित्य संमेलन यशस्वीरीत्या पार पाडण्यात आले असून सहावे अखिल भारतीय पोवारी बोली साहित्य संमेलन नोव्हेबर-डिसेंबर 2025 मध्ये घेण्याचे नियोजित आहे. 
     (मी स्वतः, डिसेंबर 2019 मध्ये नागपूर येथे झालेल्या दुसर्‍या अखिल भारतीय पोवारी/पवारी बोली साहित्य संमेलनाचा संमेलनाध्यक्ष होतो.)
     आम्हा झाडीपट्टीवासीयांची ही "भाषा-बोली-चळवळ" मराठीच्या उपरोल्लेखित "लघुवर्तुळ-Language"च्या परीघाबाहेरील अनंत, विस्तीर्ण व निसर्गाधारित असे प्रत्यक्ष/अप्रत्यक्ष जीवनानुभव येथील ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक,... संदर्भांसह व येथीलच काळपूर्व/काळसापेक्ष/काळोत्तर परिसर-वैशिष्ट्यांसह जागतिक साहित्यावकाश व्यापून नवोन्मेष-सृजनशील, गैरपारंपरिक नवसृजनाला गवसणी घालण्याचा प्रयत्न करण्यासाठी सज्ज झाली/होत आहे. आमच्या पदमपूरचा महाकवी व नाट्यजनक, करूण-रससम्राट भवभूती आमचा साहित्य-पूर्वज असून त्याच्या "भविष्य-वाणी"वर आमचा विश्वास आहे. 
    (आमची ही "भाषा-बोली-चळवळ" प्रमाण मराठी "भाषे"ला सवता-सुभा उभा करण्यासाठी नसून मराठी "भाषे"ला पूरकच ठरत/ठरणार आहे, मराठी भाषा कधीच मृतप्राय होऊ नये यासाठी तिला अमृतप्राशन करणारीच ठरेल याची खात्री असू द्यावी. फक्त उपरोल्लेखित नागरी/महानगरीय "लघुवर्तुळ-Language" संबंधात आमच्या काही "अडचणी(???)" आहेत, काही साधार आक्षेपही आहेत, ही मात्र #BitterReality आहे.) 
     समस्त "भाषा-बोली-प्रेमीं"चा आम्हाला, आमच्या या प्रयासात आशीर्वाद व प्रेमाचा हात मिळाला तर आमच्या या "भाषा-बोली-चळवळी"च्या कार्यासाठी ते "सोनेपे सुहागा"च ठरेल, असे नम्रपणे सुचवावेसे वाटते.

(*झाडीबोली साहित्य मंडळ आणि पोवारी/पवारी साहित्य, कला, संस्कृती मंडळ यांचा एक आजीव सभासद, अनुबन्धक, पदाधिकारी व कार्यकर्ता या नात्याने मी हे लिहिले आहे.*)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, जि.गोंदिया.
(विदर्भ-महाराष्ट्र) // (05.11.2018//14.05.2025)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन