मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान : ॲड.लखनसिंह कटरे
*मराठी साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान.*
•••••••••••••••••••••••••••••••••••••••••••
@ॲड.लखनसिंह कटरे
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
>> जून-जुलै 1977 मध्ये मी बी.एससी.(पीसीएम) उत्तीर्ण झालो. त्यावेळी मला पुण्याच्या तत्कालीन अनिरुद्ध प्रकाशनाचे गजानन क्षीरसागर द्वारे संपादित जिज्ञासा या मासिकातून एमपीएससी, युपीएससी बद्दल तथा त्यांच्याद्वारे घेण्यात येणाऱ्या प्रतियोगिता परीक्षा व त्याद्वारे भरली जाणारी शासकीय(!) पदे याची प्राथमिक स्वरूपाची माहिती मिळाली होतीच. त्यानुसार मी त्या परीक्षांची तयारी करीत असताना मला कळले(?) की एमपीएससी, युपीएससी च्या परीक्षांकरिता आपल्या विज्ञान-स्नातकीय अभ्यासक्रमातील विषयांपेक्षा आर्ट्स विभागातील विषय निवडणे सुलभ-सोपे व अंतिम निवडीसाठी फायद्याचे(!) ठरते. त्या सल्ल्यानुसार मी इतिहास, समाजशास्त्र, मराठी, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, विधी अशा विषयांची निवड केली.
>> समाजशास्त्र या विषयाचा अभ्यास करताना 'मनुष्य हा समाजशील/सामाजिक प्राणी आहे', Man is a social animal, ही अतिशय आवडणारी संकल्पना मला प्रथमच भेटली(!).
>> त्यानंतर एमपीएससी ची पहिली परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर (1978?) त्यावेळी व्हावयाच्या मुलाखतीदरम्यानच्या Group Discussion साठी आमच्या गटाला, Impact of Industrialization on the Society (औद्योगिकीकरणाचा समाज/कुटूंबावर झालेला/पडलेला प्रभाव) हा विषय देण्यात आला. तेथे मला माझ्या या समाजशास्त्राच्या अभ्यासाचा खूपच उपयोग झाला. अशाप्रकारे मला मनुष्य व समाज यातील अंतर्संबंध व तद्विषयक साहित्य यांचा अधिक अभ्यास करण्याची आवड व ओढ निर्माण झाली. पुढे मानसशास्त्राचा व साहित्यशास्त्राचा अल्पस्वल्प अभ्यास करताना त्याच अनुषंगाने मनुष्याचे स्व आणि स्वेतर या संकल्पना सुद्धा समजून घेता आल्या.
>> त्याच अभ्यासातून पुढे हळूहळू लक्षात येऊ लागले की, मनुष्य हा समाजशील प्राणी आहे, (Man is a social animal) या दृष्टीने विचार करता असे दिसून येते की, प्रत्येकच मनुष्याला स्वतःचा स्व प्रकट करण्याची तसेेच स्वेतराचे स्व जाणून घेण्याची स्वाभाविकच उत्कट इच्छा असल्याने त्यासाठी त्याला स्वेतराची नितांंत आणि अनिवार्य अशी प्राथमिक गरज असते.
>> ह्या स्वेतराचा परीघ सतत वाढता असावा अशीही मनुष्याची स्वाभाविक मेंदूरचना असते, हे आज मेंदू-विज्ञानातील अद्ययावत संशोधन सुद्धा सांगू लागले आहे. पर्यायाने हा स्वेतराचा परीघ कुटुंब ते समाज ते गाव ते राज्य ते देश ते विश्व अशा चढत्या क्रमाने वाढावा यासाठी सुद्धा मनुष्याचा मेंदू इच्छारत असतो.
>> मनुष्याच्या याच मूलभूत प्रवृत्तीचा विकास आणि संचार म्हणजेच मनुष्याचे प्रकट होणे होय असे सामान्यपणे म्हणता येते. मनुष्याचे हे प्रकटन आदिमानवाच्या काळात मौखिकच असावे. पण हळूहळू जसजशी "वाणी/वाचा" चे स्वरूप ध्वनीनिष्ठ ते लिपीनिष्ठ करण्याची गरज भासली तसतशा विविध लिपी अवतरल्या व मनुष्याचे ध्वनीनिष्ठ प्रकटन हळूहळू लिपीनिष्ठ होऊ लागले/लिपीबद्ध भाषेचा उदय झाला, असा सर्वसाधारण निष्कर्ष काढला जातो.
>> अशाप्रकारे गुहेतील चित्रे तथा इतर प्रकटने हे कालांतराने हळूहळू शिलालेखादि मध्ये, ताडपत्रांमध्ये काहीशा कायम स्वरूपात प्रकट होऊ लागले असावे आणि कागदाचा शोध लागल्यावर कागदावर हस्तलिखित स्वरूपात मनुष्याची ती प्रकटने लिपीबद्ध होऊ लागली असावीत, असा सर्वसाधारण निष्कर्ष निघतो. त्यानंतर छापणे ह्या कलेचा शोध लागून हस्तलिखित कागद आता मुद्रित कागदामध्ये तबदिल होऊन लेखनकलेच्या/मुद्रांकनाच्या कलेच्या उदयाची पुढची मुहूर्तमेढ उभारली गेली असावी, असा साहित्य या कलेच्या उगमाचा सर्वसाधारण इतिहास आढळून येतो.
>> मुद्रित साहित्याची ही प्रक्रिया दोनेक शतके आपला अंमल गाजवत असल्याचेही आढळून येते. परंतु संगणकाच्या शोध-संशोधनानंतर मात्र कागद आणि मुद्रण/मुद्रांकन यांच्यातील "सातजन्माची साथ" शिथिल होऊ लागली आणि आता स्व च्या प्रकटनाकरिता आणि स्वेतराचे स्व जाणून घेण्याकरिता अनिवार्यपणे आवश्यक असलेल्या स्वेतराच्या परीघाची झालेली असिमित व अप्रतिम (सुद्धा) वाढ लक्षात घेऊन मनुष्याला मुद्रित स्वरुपाची सीमा खूपच छोटी वाटू लागली. याचा स्वाभाविक परिणाम असा झाला की, साहित्य हे कागदावरून आभासी पटलावर उडी मारून, स्वार(!) होऊ लागले व आपल्या अस्तित्वाची जाणीव तथा धार डिजिटल माध्यमाद्वारे विस्तारू लागले.
>> अशी ही साहित्य या विषयाची तथा साहित्य विषयक चळवळीच्या इतिहासाची डिजिटल माध्यमांपर्यंतची चढण सारांशरूपाने सांगता येते.
>> अशातच 1991 नंतरच्या उजाखा (उदारीकरण, जागतिकीकरण, खाजगीकरण)/LGP (Liberalization, Globalization, Privatization) चा तडाखा साहित्य क्षेत्रावर व पर्यायाने साहित्यिक चळवळीवर सुद्धा अनिवार्यपणे पडू लागला. हा तडाखा विसाव्या शतकाच्या अंतापर्यंत धीम्या गतीचा होता. परंतु एकविसाव्या शतकाच्या प्रारंभापासून, 2001 पासूनच, मात्र या तडाख्याची गती अचानक तीव्रतम झाली. आणि फक्त साहित्य क्षेत्र व साहित्यिक चळवळीतच नव्हे तर मानवी जीवनाच्या सर्वच क्षेत्रात अमुलाग्र बदल सुद्धा शीघ्रतम गतीने होऊ लागले.
>> आता छापील पुस्तके, ग्रंथ अशा एकूणच साहित्य क्षेत्र व साहित्यिक चळवळी यांना डिजिटल माध्यमाने विविध अशा आकर्षक व सहज सुलभ पर्यायांची मालिकाच मानवाला उपलब्ध करून दिली. हा सक्षम व सरस ठरणारा डिजिटल माध्यमांचा पर्याय साहित्य क्षेत्र व साहित्यिक चळवळी यांना घातक/मारक न ठरता उलट संपूरकच ठरू लागला. आणि अशाप्रकारे डिजिटल माध्यमांचे योगदान साहित्य क्षेत्र व साहित्यिक चळवळींसाठी अतिशय महत्त्वाचे ठरू लागले आहे, असे आता आढळून येते. साहित्य क्षेत्र आणि साहित्यिक चळवळीतील डिजिटल माध्यमाचे हे योगदान म्हणजे जणू साहित्य क्षेत्रातील व तद्विषयक साहित्यिक चळवळीतील मूलभूत तत्त्वांचा जल्लोषी पुनर्शोधच म्हणावे लाागेल.
>> याच संदर्भात आणखी पुढे विचार केला असता आपल्याला REBT (Rational Emotive Behavioral Therapy) चे संकल्पक/प्रवर्तक डाॅ.अल्बर्ट एलिस चे म्हणणे सुद्धा लक्षात घ्यावे लागेल. अल्बर्ट एलिस म्हणतो की, नियतीशरण होऊ नका. तुमची बुद्धी, तुमचे स्वभावगुण हेच तुमचे भविष्य ठरवत असतात. Character is Destiny हा एलिसचा मंत्रच आहे जणू. असा हा एलिस चा मंत्र सध्याच्या कोरोना काळात खूप उपयोगी ठरतो. माणसाचे एकाकीपण घालविण्यासाठी माणूस विविध पर्याय निवडतो/शोधतो. त्यातील दोन प्रमुख पर्याय म्हणजे साहित्याचे वाचन/लेखन व सांस्कृतिक जीवन/चळवळ हे मानले जातात. परंतु हे दोन्ही पर्याय आपापल्या आजवरच्या पारंपरिक पर्यावरणातच प्रामुख्याने बंदिस्त राहिल्याने, सध्याच्या कोरोनाच्या या घरकोंडीच्या अदम्य अशा अवकाशीय काळात माणसाची तडफड होणे स्वाभाविकच होते. अशावेळी हे दोन्ही पर्याय डिजिटल माध्यमाच्या मदतीने सुद्धा माणसाला यशस्वीपणे वापरता व हाताळता(!) येतात हे सिद्ध करण्याचे काम या कोरोना काळाने केले आहे. डिजिटल माध्यमांचे हे योगदान अतिशय मोलाचे ठरले/ठरत आहे.
>> कोरोना काळाने माणसावर अचानकच लादलेले एकाकीपण जर सतत तसेच राहिले असते तर माणूस स्वमग्न सारख्या मनोविकारांचा शिकार होण्याची भीती नाकारता येत नव्हती. आणि अशा स्वमग्न माणसांच्या जथ्यात मिसळून इतर सुदृढ माणसेही मनोरोगी होण्याची शक्यता सुद्धा नाकारता येत नव्हती. प्रत्येक माणसाला आपला 'स्व' प्रकट करण्याची व त्यासाठी स्वेतराची अनिवार्य आवश्यकता असतेच असते. परंतु कोरोना काळाने प्रत्येकच माणसाला घरकोंडीत अडकवून ठेवल्याने माणसाची ही स्वाभाविक गरजच त्याची शत्रू होण्याची शक्यता होती. अशावेळी डिजिटल माध्यमाने आपले सर्वसमावेशक दालन खुले करून माणसाची ही स्वाभाविक गरज भागविण्यात आपले योगदान दिले आहे.
>> कोरोना काळात प्रिंट मिडिया आणि प्रिंटिंग व्यवस्था/यंत्रणा/व्यवसाय सुद्धा पूर्णतः मोडकळीस आल्याने साहित्यिक क्षेत्रात आणि समूहाला मज्जाव असल्याने सांस्कृतिक क्षेत्रात एक अकाट्य अशी पोकळी निर्माण झाली होती. पर्यायाने साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील घटकांना तथा वाचक/प्रेक्षकांना आपापल्या अभिव्यक्तीची, स्वप्रकटीकरणाची, मनोरंजनाची स्वाभाविक गरज भागविणे दुरापास्त होऊ लागले होते. अशा कठीण परिस्थितीत डिजिटल माध्यमाने ही गरज फक्त भागवलीच नाही तर साहित्य व सांस्कृतिक क्षेत्राला त्यासाठी एक नवीनच आणि अद्भूत असे दालन उघडून दिले. आजवर साहित्य तथा सांस्कृतिक क्षेत्राची जी मजल होती तिची झेप आता कितीतरी पटीने वाढली व सुदृढही झाली. झूम, गूगल मीट, यू ट्यूब, फेसबुक लाईव्ह, ....., आदि आभासी प्लॅटफॉर्मच्या साह्याने साहित्य/साहित्यिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात एक नवीन क्रांतीच झाली आणि कोरोना काळ या दोन क्षेत्रासाठी जणू इष्टापत्तीच ठरला. याकामी सुद्धा डिजिटल माध्यमांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले
>> याच संदर्भात आचरणशास्त्रातील काही मूलभूत संकल्पना तपासून पाहताना असे आढळून येते की, आचरणशास्त्रानुसार मनुष्याला नेहमी देशकालपरिस्थितीचा विचार करून स्वैराचाराकडून संयमाकडे आणि अनिर्बंध चैनीकडून निरपवाद आवश्यकतेकडे नेणारी वृत्ती जोपासावी व अनुसरावी लागते. शिवाय सगळे विधिनिषेध सारख्याच महत्त्वाचे नसतात याचे तारतम्य सुद्धा व्यवहारात/आचरणात ठेवावे लागते. आणि कोरोना काळात या आचरणशास्त्राची जपणूक करणे सुकरच ठरत गेल्याने त्याचा स्वाभाविक असा सुपरिणाम साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रातील डिजिटल माध्यमाच्या सकस वापरात होऊ लागला. हे डिजिटल माध्यमाचे योगदान साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीच्या क्षेत्रात अविस्मरणीयच ठरले आहे व ठरत आहे.
>> याचा एक सुपरिणाम असाही झाला की, साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीत शिरू पाहणारा/शिरलेला वेळ-काळ पाळण्याबाबतच्या बेशिस्तीच्या आचरणाला आळा सुद्धा बसला. साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीतील सर्वच घटकांना वेळेचे महत्त्व आणि विचारप्रकटीकरणातील शिस्तीचे यथार्थ सुद्धा कळू लागले/वळूही लागले. आणि कोणत्याही प्रसंगाची वेळकाळ न बघता अनावश्यक शब्दांचा व माहिती(?) चा फापटपसारा वापरत वापरत वाचिक अतिसाराची लागण होण्याच्या अपरिपक्व व अजागळ वक्त्यांच्या एका विकृत सवयीवर आळा सुद्धा बसण्याची शक्यता निर्माण होऊ शकली.
>> सांस्कृतिक क्षेत्र व सांस्कृतिक चळवळीत सुद्धा डिजिटल माध्यमांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले/ठरत आहे. यासंदर्भात माझा एक स्वानुभव असा की, फेब्रुवारी 2002 मध्ये मी माझ्या गावी, बोरकन्हार येथे झाडीबोली साहित्याचे नववे साहित्य संमेलन घेतले होते. तेव्हा स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रमांतर्गत दंढारचे आयोजन करण्यात आले होते. त्या दंढारचे चित्रीकरण सुद्धा करण्यात आले होते. परंतु त्या ग्रामसंस्कृतीच्या लोककलेच्या आयोजनाला काही विशिष्ट भागात व अल्प काळापुरताच सिमीत 'अवकाश' मिळू शकला होता. डाॅ.हरिश्चंद्र बोरकर यांनी या दंढार कलेचे पुनरुज्जीवन करून महाराष्ट्रभरच नव्हे तर भारतातील इतर राज्यांतही या कलेचा प्रचार-प्रसार केला होता. पण ही झाडीपट्टीतील प्राचीनतम लोककला जागतिक स्तरावरुन मात्र विशेषत्वाने दखलपात्र ठरल्याचे दिसत नव्हते. अशातच पुन्हा माझ्या गावातच डिसेंबर 2018 मध्ये सव्वीसावे झाडीबोली साहित्य संमेलन घेण्यात आले असता त्यात पुन्हा दंढारचे आयोजन करण्यात आले होते. ह्या दंढार सादरीकरणाचे मी यावेळी फेसबुकवर लाईव्ह प्रसारण केले आणि ही लोककला जगभर उजळून निघाली. आमच्या डाॅ.हरिश्चंद्र बोरकरांचा भीमप्रयत्न अशाप्रकारे पुनर्साकार होऊ शकला. हे डिजिटल माध्यमाचे सांस्कृतिक क्षेत्रातील व चळवळीतील योगदान सुद्धा आज आपण अनुभवतो आहोत.
>> अशाप्रकारे साहित्य आणि सांस्कृतिक चळवळीमध्ये डिजिटल माध्यमांचे योगदान अतिशय मोलाचे ठरले/ठरत असल्याचे आढळून येते. (शब्दसंख्या सुमारे 1350)
¤
@ॲड.लखनसिंह कटरे
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया
(27.04.2021)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment