घोडापुराण : [घोडा : एक इमानदार प्राणी...!]

*घोडापुराण : [घोडा : एक इमानदार प्राणी...!]*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
(प्रकाशित : श्री दीपलक्ष्मी : दिवाळी अंक 2024)
-----------------------------------------------------------
     माझ्या पणजोबा पासून, म्हणजे सुमारे 1890 पासून माझ्या वडिलांच्या कार्यक्षम काळापर्यंत, (सुमारे 1995 पर्यंत) आमच्या पूर्वजांकडील त्यांच्या 'प्रवासा'चे मुख्य साधन म्हणजे घोडागाडीच होती. वस्तूतः आमचा पोवार समाज हा एक प्राचीनतम समाज असून तशाच प्राचीनतम क्षत्रिय समाजाचा एक घटक असल्यानेच सम्भवतः आमच्या समाजात विसाव्या शतकाच्या शेवटापर्यंत घोडापालनाची व घोडागाडीने प्रवास करण्याची प्रथा/परंपरा/फॅशन(?) होती. उजाखो*त्तर कालावधीत सर्वच क्षेत्रात घडून आलेल्या उलटापालटासम बदलांच्या परिस्थितीत इ.स.2000 नंतर आमच्या समाजातील घोडापालनाची व घोडागाडीने प्रवासाची स्थिती थंडावत गेली. एकतर ते आर्थिक व मजूरीविषयक दृष्ट्या सुद्धा न परवडणारे झाले होते/आहे. असे असले तरी काही सन्माननीय अपवाद आजही आहेत. मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्याचे रहिवाशी असलेल्या माझ्या साडूंच्या (श्यामकिशोर कटरे यांच्या) एकत्रित कुटुंबाकडे सुमारे सव्वाशे/125 एकर विविध पिकांची बारमाही शेती असल्याने त्यांनी अजूनही शेतफेरी व गावफेरीच्या सवारीसाठी घोडा पोसला आहे. पण असा अपवाद एखादाच! 
        माझ्या वडिलांनीही त्यांच्या कार्यक्षम जीवनापर्यंत घोडापालन व घोडागाडीचा वापर कायम ठेवला होता. (2003 मध्ये मी माझी पहिली कार खरेदी केली असली तरी माझे वडील क्वचितच कारमध्ये बसत असत किंवा कारमध्ये बसायला ते नाखूष असत. इतकी त्यांना त्यांची घोडागाडीच प्रिय होती.) माझे वडील उत्कृष्ट घोडातज्ज्ञ व घोडागाडीचे उत्कृष्ट सारथी-मालक होते. ते स्वतः घोडागाडी हाकत असत, सोबत घोडकी मागे (कंडक्टर/हेल्पर सारखा) सोबत बसलेला असायचा. घोड्यांची पारख करण्यात ते अतिशय तरबेज/निष्णात होते. घोड्याच्या शरीरावरील विविध खुणा व चिन्हे, त्यांचे रंग व रंगांचे विविध प्रकार, मानेवरील आयाळीचा आकार व प्रकार, कानांची उंची व प्रकार, घोड्याच्या अंगावरील काही चक्रादि, घोड्यावर स्वार झाल्यावर घोड्याची प्रतिक्रिया व अशा प्रतिक्रियांचे प्रकार अशा या सर्व बाबींचा साकल्याने तथा सर्वंकषपणे विचार करून घोड्याची खरीखुरी प्रत ठरविणे यात माझ्या वडिलांना जणू प्राविण्य प्राप्त होते. म्हणूनच आमच्या गावाजवळील आमगांव येथे भरणाऱ्या चंपाषष्ठीच्या वार्षिक यात्रेतील घोडाबाजारातून घोडे घेणारे/विकणारे पाटील, जमीनदार, मालगुजारादि माझ्या वडिलांच्या घोडा-निकषावरच मुख्यतः अवलंबून असत. आणि अर्थातच माझ्या वडिलांच्या या एका गुणविशेषामुळे आमच्याकडील घोडे नेहमीच उच्च प्रतीचे राहिले आहेत. 
        माझ्या वडिलांनी त्यांच्या तरुणपणी व नंतर आमच्या आग्रहाखातर त्यांच्या प्रौढवयातही सायकल चालवायला शिकून घ्यायचे काही प्रयत्न अवश्य केलेत. पण त्या प्रयत्नांत सायकलसकट पडून उकसवाकस झाल्यामुळे त्यांनी त्या प्रयत्नांना तिलांजली दिली व आपल्या घोडा-ज्ञानावर विसंबून उत्तम प्रतीचे घोडे खरेदी करून घोडागाडी हेच साधन आपल्या दैनंदिन व नियमित दळणवळण/प्रवासासाठी जीवनभर वापरले. एका दिवसात सुमारे 40-50 किलोमीटर जाणे व परत येण्यासाठी सुद्धा ते घोडागाडीचाच वापर करीत असत.
       त्याकाळी आजच्यासारखे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत बांधण्यात आलेले ग्रामीण भागातील डांबरी रस्ते नव्हते. त्यामुळे त्याकाळी गाव-जोडणीसाठी असलेल्या ओबडधोबड व उबडखाबड गाडदानीच्या रस्त्याने रात्री-बेरात्री सुद्धा माझे वडील एका घोडकीसोबत नातेवाईकांकडे व इतरत्रही जाणेयेणे करीत असत. अशा रात्री-बेरात्रीच्या जाण्यायेण्यात त्यांचा सामना त्यावेळेस आमच्याभागातील जंगलात सहज दिसून येणाऱ्या वाघ-तडश्या सारख्या हिंस्त्र प्राण्यांशी सुद्धा व्हायचा. पण घोड्यांना अशा हिंस्त्र प्राण्यांची चाहूल दुरूनच लागत असल्याने वडील सावध होऊनच तो रस्ता पार करीत. सोबत घोडकी(कंडक्टर/हेल्पर???) आणि गावठी बंदूक असायचीच. माझ्या वडिलांनी आमच्या गावातीलच स्व.परसराम पाटील कटरे यांच्यासोबत त्याकाळी काही लहान-मोठ्या शिकारी केल्या असल्याने त्यांची हिंस्त्र प्राण्यापासूनची भितीच लोप पावली होती. अशाप्रकारे माझ्या वडिलांनी आपल्या घोडा-ज्ञानाचा आपल्या संपूर्ण सफल जीवनात यशस्वी वापर करून एक उदाहरणच प्रस्तुत केले असे म्हटल्यास वावगे वा अतिशयोक्ती ठरू नये. 
         घोडाज्ञानाने संपृक्त असलेले माझे वडील, माजी मालगुजार व माजी पोलीस पाटील स्व.मोहनलाल उर्फ मोहनभाऊ कटरे, हे आम्हाला नेहमी सांगायचे की घोडा हा अत्यंत इमानदार प्राणी आहे, फक्त त्याची योग्य पारख करता आली पाहिजे. घोडा आपल्या स्वाराला कधीच दगा देत नाही. यासाठी माझे वडील नेहमी महाराणा प्रताप यांच्या चेतक नामक घोड्याचे उदाहरण देत असत.
        पण...., पण त्याची एक कमजोरी(!) आहे/असते. घोडागाडीला जुंपतांना त्याला झापड बांधणे परमावश्यक असते. म्हणजे तो झापडबंद होऊन इकडेतिकडे न बघता/ताकझाकता न करता अगदी सरळ चालतो. अन्यथा घोड्याची नजर अतिशय तीक्ष्ण असल्याने तो आजूबाजूला पाहून चलबिचल होऊ शकतो. झापड बांधण्यात आल्याने तो ईकडेतिकडे काय चाललेय याची तो उस्तपास्त करीत नसल्याने घोडागाडीच्या चालकाला घोडागाडी हाकताना कोणताच अनाठायी त्रास(!) होत नाही. "झापडबंद इमानदारी"चा घोडा हा एक उत्कृष्ट प्रतीकच असतो, असेही माझे वडील नेहमी सांगायचे.
       असे माझे घोडातज्ज्ञ वडील दि.25 जानेवारी 2018 ला वयाच्या 88 व्या वर्षी वयोमानानुसार निसर्गशरण झाले व त्यांच्या प्रत्यक्ष स्वानुभवाधारित सर्वव्यापक मार्गदर्शनाला मी मुकलो. पण त्यांचे घोडाविषयक विचार मला माझ्या जीवनात नेहमीच/अजूनही उपकारक तथा उपयोगीच ठरत आले आहेत.
        आमच्याकडील अशाच घोडापुराणातील एक सत्यकथा अशी की, वडिलांनी एक सोनेरी-कोसा रंगाचा जणू चकाकणारा घोडा खरेदी केला होता. सन 1963 मधली घटना असावी ती. मी नुकताच तिसरीत (1963-1964) गेलो होतो. आमचे वर्गशिक्षक स्व.सीताराम भूराजी चुटे हे आमच्या वाड्याला लागूनच असलेल्या स्व.हरीभाऊ भांडारकर (तत्कालीन सरपंच, ग्राम पंचायत, बोरकन्हार) यांच्या घरी एका खोलीत त्यांच्या काही अन्य शिक्षक मित्रांबरोबर, आजच्या भाषेत सांगायचे तर पेईंग गेस्ट सारखे, रहायचे. (त्याकाळी आमच्या गावात तरी घर भाड्याने देण्याची प्रथा नव्हती.) त्यामुळे ते आमच्या कडील त्या सोनेरी-कोसा रंगाच्या घोड्याला रोजच देखत असत आणि एखाद्या निमित्ताने वर्गात सुद्धा आमच्या त्या सोनेरी घोड्याचा कुतुहलपूर्वक उल्लेख करीत. म्हणून मला त्या घोड्याचा आमच्या कडील आगमन कालावधी लक्षात राहिलाय.
        तर झाले असे की, माझ्या पणजोबांच्या कालावधीपासूनच आमच्याकडे प्रवासासाठी घोडागाडी व पर्यायाने घोडेपालन ही प्रथा होती, हे वर आले आहेच. माझे वडील घोड्यांच्या लक्षण-परीक्षण विद्येत तज्ज्ञ होते व त्यांची घोड्याची निवड कधीच चुकली नाही. पर्यायाने त्यांनी घोडागाडी व घोडेपालन ही प्रथा सुद्धा त्यांच्या कार्यक्षम जीवनापर्यंत कटाक्षाने पाळली. आमच्या गावापासून सहा किमी अंतरावरील आमगांव या तत्कालीन जमीनदारीच्या गावात (सद्यकालीन तहसील-स्थळ असलेल्या निमशहरात), यापूर्वीच जिचा थोडक्यात उल्लेख केला आहे अशी, चंपाषष्ठीची मोठ्ठी यात्रा साधारणतः दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरायची. आजकाल ही यात्रा फक्त नावापुरतीच असली तरी आमच्या बालपणी ही भव्य यात्रा पंधरा-वीस दिवस सुद्धा 'चालायची’. या यात्रेत घोड्यांचा बाजार सुद्धा भरत असे. दूरदूरचे घोडे व त्यांचे मालक, (पाटील/जमीनदार/मालगुजारादि) आठ-दहा दिवसांच्या मुक्कामाने आमगांव येथे तंबू ठोकून थांबायचे व घोडा-व्यापार करीत असत.
       अशाच 1963 च्या चंपाषष्ठीच्या यात्रेत माझ्या वडिलांनी हा सोनेरी-कोसा रंगाचा सुंदर घोडा पाहिला आणि त्याचे 'सर्वांगीण' परीक्षण करून तो सर्व शुभ लक्षणांनी संपृक्त घोडा कोणत्याही परिस्थितीत व किंमतीत खरीदण्याच्या मागे लागले. अखेर आपली सर्व युक्ति-शक्ती वापरून माझ्या वडिलांनी तो सोनेरी घोडा खरेदी करून घरी आणला.
      त्या घोड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याचा चकाकता सुंदर सोनेरी-कोसा रंग आणि त्याचे खुंटावर नित्य झुलणे. शिवाय आणखी काही अभूतपूर्व वैशिष्ट्यपूर्ण खुणा/चिन्ह/लक्षणे त्या घोड्याच्या शरीरावर असल्याचे वडील सांगत, जे मला कधीच समजले व उमजलेही नाही. असा भाग्यवान घोडा भाग्यवंतांच्याच भाग्यात असतो, असेही वडील सांगायचे. योगायोग म्हणावा की काय ते ज्याचे त्याने ठरवावे, पण यापूर्वी ज्या दोन घोडामालकांनी हा घोडा विकला त्यांना खूप नुकसानीला/वाईट परिस्थितीला सामोरे जावे लागले होते व तो प्रकार म्हणजे अगदी 'घोडाविकण्या'चाच दुष्परिणाम असल्याची माझ्या वडिलांना पूर्ण खात्री होती. पर्यायाने आता हा घोडा मरेपर्यंत विकायचा नाही हे वडीलांनी ठरवून टाकले. 
      एकाद वर्ष दुसऱ्या एका तशाच शुभलक्षणी घोड्यासोबत त्याला घोडागाडीला जूंपून वडील 40-50 किमी वरील माझ्या आत्यांच्या गावी सुद्धा जात-येत असत. पण पुढच्याच चंपाषष्ठीच्या यात्रेत वडीलांनी या सोनेरी घोड्याला यापुढे घोडागाडीला न जुंपण्याचा निर्धार करून आणखी एक तिसरा घोडा खरेदी केला. व या सोनेरी घोड्याचे खावो-पिवो-झुलो-आराम करो चे जीवन सुरू झाले. अशाप्रकारे आमच्याकडे तीन घोडे नेहमी असण्याची प्रक्रिया शेवटपर्यंत टिकून राहिली. 
           घोड्याला सतत चुस्त आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी दररोज त्यांची मालिश, खरारा करणे व त्यानंतर त्याला पाच-सहा वेळा फुर्रावयाला लावणे आवश्यक असते. त्यासाठी एक पहिलवान शरीरयष्टीचा घोडकी असणे क्रमप्राप्त असते. आमच्याकडे रावजी आंबेडारे, चुन्नीलाल सर्राटे व लोंढू उर्फ रूपचंद मेंढे असे तीन मुख्य घोडकी होऊन गेले. (आज हे तिन्ही हयात नाहीत!) या घोडक्यांचे दररोजचे महत्त्वाचे काम म्हणजे अगदी झुंझुरकाच घोड्यांना त्यांच्या पागेतून बाहेर काढून अंगणातील खुंटांना बांधणे. त्यानंतर सुमारे अर्धा-पाऊण तास त्यांची मालिश करून त्यांना खरारा करणे. यानंतरची घोड्यांना फुर्रावयाला लावण्याची प्रक्रिया जरा जटिल व जिकीरीची असायची. त्यासाठी घोड्याच्या मागील दोन्ही पायांना एका दहा-बारा फूट लांबीच्या मजबूत दोरीने बांधून दोन्ही दोरींचे टोक एकत्रित करून ते टोक घोड्यांच्या मागे गाडून ठेवलेल्या एका मजबूत खांबाला आवळून बांधावे लागे. याला आमच्या झाडीपट्टीत पाछी बांधणे असे म्हणतात. अशी पाछी बांधल्यावर घोड्याचे मागील पाय ताणले जाऊन घोडा फुर्रावयाचा. पाछी बांधल्यावरही घोडा फुर्रावला नाही तर घोडकी घोड्याला चाबकाचा डोस द्यायचा. असा पाच-सहा वेळा घोडा फुर्रावला की घोड्यांची सकाळची दैनंदिन सेवा पूर्ण होऊन घोडकी सकाळच्या आंबिल न्याहारीसाठी घरी जायचा, इतका तो घोडकी या प्रक्रियेत थकून जायचा.
         घोड्यांचे असे फुर्रावणे म्हणजे, स्वामी रामदेव यांच्या भाषेत, तो घोड्यांचा कपालभातीचा व्यायामच असायचा जणू. असा दैनंदिन व्यायाम करून घेणे हे घोड्यांना सतत चुस्त व तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनिवार्यच असे. अर्थातच हे काम करायला पहिलवान शरीरयष्टीचा घोडकीच आवश्यक असे. आमच्याकडील उपरोल्लेखित तिन्ही घोडकी आमच्या गावकुसात पहिलवान म्हणून सुपरिचित होते. पोळ्याच्या दुसर्‍या दिवशीच्या मारबत-दिवशी होणाऱ्या वार्षिक मैदानी कुस्तीत आमच्याकडील हे तिन्ही घोडकी सहज विजयी होत असत.
       वर नमूद केल्यानुसार आमच्याकडील या सोनेरी-कोसा रंगाच्या घोड्याला घोडागाडीला जुंपणे थांबवल्यावर घोडागाडीसाठी आणखी दोन घोडे ठेवावे लागत, हे यापूर्वी आले आहेच. अशा या जुंपण्यात येणाऱ्या घोड्यांचा उपरनिर्दिष्ट व्यायाम अग्रक्रमाने झाल्यावरच या सोनेरी घोड्याचा क्रम लागायचा. ही बाब या सोनेरी घोड्याला कदाचित आवडत नसावी म्हणून तो घोडागाडीच्या घोड्यांचा व्यायाम सुरू असताना आपल्या खुंटावरच फुर्रावयाचा, जोरजोरात झुलायचा, पाय आपटायचा, जणू नाराजी प्रकट करायचा. वडीलांचा तो अर्थातच लाडका असल्याने अशावेळेस वडील त्याच्याजवळ जाऊन त्याला थोपटायचे. तो सुद्धा याला प्रतिसाद देऊन मस्त खिंकाळायचा. 
       वडील पोलीस पाटील व माजी मालगुजार राहिल्याने त्यांच्याकडे गावातील तंटे आणि तक्रारी सतत येत असत. अशाच एखाद्या तंटा/तक्रारीच्या सोडवणूकीत वडील व्यस्त राहिल्यास या सोनेरी घोड्याच्या खिंकाळण्याला वेळीच प्रतिसाद देऊ शकले नाही तर तो खिंकाळून खिंकाळून जणू वाडा दणाणून सोडत असे. अखेर वडीलांना मध्येच उठून जावे लागे व त्याची पाठ थोपटावी लागे. 
       आमच्या कुटुंबातील सर्वच सदस्यांना तो ओळखत असे. कोणीही त्याच्याजवळ गेल्यावर तो खिंकाळून आपली खुशी जाहीर करायचा. माझा पुत्र ॲड.अनिकेतसिंह त्याच्या बालपणी त्याच्यावर बसून गावभर फेरफटका मारायचा, गावातील एकमेव असलेल्या मारवाड्याच्या दुकानातून बिस्कुट खरेदी करून घोड्याला चारायचा. मी नोकरीनिमित्ताने महाराष्ट्रात इतरत्र पदस्थापित असताना कुटुंबासह गावी येताना तो आम्हाला पाहून खिंकाळायचा व आम्ही जात असू तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रू घळायचे. असा हा आमच्या कुटुंबापैकीच एक घटक झालेला लाडका सोनेरी घोडा होता. 
       पूर्वीच लिहिल्याप्रमाणे माझ्या वडिलांना सायकल आदि कोणतेही वाहन चालविता येत नव्हते. सायकल चालवायला शिकण्याच्या प्रयत्नात टोंगरे उकसल्याने त्यांनी तो नादच सोडला. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचे मुख्य साधन म्हणजे घोडागाडीच. या घोडागाडीने ते एका दिवसात कधीकधी 60-70 किमी पर्यंतचा सुद्धा जाऊन-येऊन प्रवास करून रात्रीपर्यंत घरी परतत असत. आपल्या पूर्ण 88 वर्षाच्या जीवनात त्यांनी; खूप झाले तर आठेक रात्रीच; घराबाहेर काढल्या असतील. कोणत्याही परिस्थितीत रात्री घरी परत परतायाचेच हे स्वतःवरील बंधन त्यांनी आपल्या जीवनभर पाळले. 
      त्या सोनेरी-कोसा रंगाच्या घोड्यानंतर कितीतरी घोडे आमच्याकडे आले आणि गेले. पण तो सोनेरी घोडा, घोडागाडीला न जुंपता खुंटावर झुलत उभा रहायचा. त्याच्या चारापाण्याची उत्तम व्यवस्था होती. त्याला नंतर कधीच घोडागाडीला जुंपण्यात आले नाही. (घोड्यांचे एक वैशिष्ट्य असते की घोडे दिवसा सहसा कधीच बसत नाहीत. घोडागाडीने प्रवासात असताना काही कामानिमित्त थोडा वेळ/दोन-तीन तास सुद्धा कोठे थांबणे भाग पडल्यास घोडे घोडागाडीला जुंपलेल्या अवस्थेतच घोडक्याच्या देखरेखीत उभे राहत असत, बसत नसत/बसत नाहीत. रात्री अंधार झाल्यावरच आपल्या खुंटावरच ते बसतात आणि पहाटेच पुन्हा उठून उभेच राहतात.) तर असा तो आमच्याकडील सोनेरी-कोसा रंगाचा चकाकणारा झुलणारा घोडा आमच्या कुटुंबाचा एक अभिन्न घटकच होऊन गेला होता.
      मला निश्चित वर्ष आठवत नसले तरी मी त्यावेळी रामटेक येथे कार्यरत होतो असे स्मरत असल्यामुळे मला वाटते तो 1993 चा पावसाळा असावा. मी एके रात्री नेहमीप्रमाणे एसटीडी बुथ वरून घरी फोन केला असता कळले की तो सोनेरी घोडा गेला. 
       झाले असे की पावसाळ्याचे दिवस असल्याने शेतात रोवणीचे काम जोरात सुरू होते. (आमच्या झाडीपट्टीत धानाचे पीक घेण्यात येत असून जुलै-ऑगस्ट महिन्यात रोवणीची कामे जोरात सुरू असतात. त्या कालावधीत गावात प्रौढ स्त्री-पुरुष सापडणे जरा कठीणच.) वडील नेहमीप्रमाणे शेतातच होते. घरी वाड्यात एकटी माझी म्हातारी आई आणि सोबत घरधंद्या व भसकी-गायकी असे दोनच सालदार होते. आई वाड्यात समोरच्या छपरीत काहीतरी वाचत बसली होती. (माझ्या आईला वाचन आणि गणिताचा जणू छंदच होता.) आमच्याकडील त्या; म्हातारा झाल्याने अशक्त झालेल्या; सोनेरी घोड्याने मानेला जोरदार झटका देत आपला दावा/दोर तोडला व कसातरी डुलत डुलत आईसमोर छपरीजवळ आला आणि वाड्याकडे तोंड करून एकदम कोसळला. गेला होता तो.
      वडीलांना शेतात बोलावणे गेले. हातचे काम सोडून वडील चार-पाच मजूरांना व बैलांना शेतातून सोबतच घेऊन आले. बैलबंडी जुंपण्यात आली. बैलबंडीवर तो सोनेरी घोडा, त्याचे शव, चढवण्यात आले व त्या 'सोनेरी घोड्या'ला आमच्या शेतातच साश्रू नयनाने रीतसर दफन करण्यात आले.
      असा हा/तो आमचा सोनेरी-कोसा रंगाचा घोडा व अशी ही त्याची सत्यकथा! 
      आणि असे हे माझ्या पणजोबापासून आमच्याकडील जवळ/लांब-दूर प्रवासाचे मुख्य साधन राहिलेल्या घोडागाडीसह घोड्याचे घोडापुराण!!
(*उजाखा = उदारीकरण, जागतिकीकरण व खाजगीकरण)
¤¤¤ (शब्दसंख्या : सुमारे 1985)
@ॲड.लखनसिंह कटरे,
बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902, 
ता.आमगांव, जि.गोंदिया.
(विदर्भ-महाराष्ट्र)
चलभाष : 7066968350.
ईमेल : lskatre55@gmail.com 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन