उत्सव आत्ममग्नतेचा : एक प्रातिभ आजार
*उत्सव आत्ममग्नतेचा : एक प्रातिभ आजार*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
अभिजन असल्याचा भाव जपणे (आव आणणे?) आणि अशा अभिजनात्मक विशेषाधिकाराच्या आत्मगौरवात आत्ममग्न असणे हा एक प्रकारचा प्रातिभ-आजारच असतो. अशाप्रकारे स्वपोषित व स्वयंघोषित स्वरूपाच्या तथाकथित विशेषाधिकारात आत्ममग्न असणारी छद्म/प्रच्छन्न प्रतिभा धारण करणाऱ्या व्यक्तींना कोठेही व कोणत्याही विषयावर अधिकारवाणीने बोलत असल्यासारखे भासवण्याची गरज भासत असते. हा एक अकादमिक-आजाराचाही प्रकार असतो. वस्तूतः अधिकारवाणीने बोलण्याऐवजी ढोबळमानाने ठाम विधान करण्याची सूक्ष्म इच्छा राखणे/ठेवणे हे यथार्थ प्रतिभेचे एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. (संदर्भ : 'परिवर्तनाचा वाटसरु' या पाक्षिकाच्या दिवाळी अंक 2024 मध्ये प्रकाशित अवधूत डोंगरे यांच्या 'राम-रुकुनची पुस्तकी कहाणी' ह्या लेखातील रुकुन अडवाणी यांच्या एका वाक्याचा ओझरता उल्लेख)
कोणतेही संशोधन/आरेखन/संकल्पन हे अंतिम होण्यापूर्वी त्याला विविध अशा कठीणतम व कठोरतम चाचण्यांमधून यशस्वीरीत्या पार व्हावे लागते. म्हणूनच कोणत्याही संशोधकाने/प्रतिभावंताने अधिकारवाणीने बोलत असल्यासारखे भासवून आपण एखाद्या छद्म/प्रच्छन्न/भ्रामक विशेषाधिकारात आत्ममग्न असण्याची वृत्ती जोपासणे, ही बाब त्या संशोधक/प्रतिभावंताच्या क्षरणाचीच द्योतक असते. त्यामुळेच अशा आत्ममग्नतेचा उत्सव साजरा करण्यात अत्युत्सुक असलेले/असणारे तथाकथित संशोधक/प्रतिभावंत अखेर प्रातिभ आजाराचे बळी ठरून दयेचे पात्र ठरतात. पर्यायाने त्यांच्याकडे पाहण्याचा इतरांचा दृष्टिकोन दयाभावाचा होऊन त्यांचे संशोधन/लेखन संशयास्पद ठरत जाऊन ते सहज दुर्लक्षिले जातात.
प्रातिभ-आजाराची काही मुख्य लक्षणे अगदी छुपा-रुस्तम सारखी झाकलेली असतात. प्रेम, आदर, सद्भावना आदि सद्गुणांपेक्षा घृणा, अनादर आणि वैरभाव पसरवणे अधिक सहजसोपे ठरत जाण्याची अगदी संथ प्रक्रिया छुप्या/प्रच्छन्न पद्धतीने राबवणे, हा प्रातिभ-आजार झालेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग ठरू लागतो. साम, दाम, दंड, भेद सारख्या क्लृप्त्यांचा प्रच्छन्न अवलंबन करून वरवर साळसूदपणाचा आव आणत आपले तथाकथित अकादमिक कथन अल्पज्ञांच्या माथी मारणे सुद्धा एक हातचलाखीच होऊन बसते. सोबतच स्वतःच्या जाणिवेच्या मर्यादा ओलांडण्याची क्षमता अंगिकारता येत नसल्याने त्यांचे विचार उत्क्रांत होत जाण्याची प्रक्रिया सुद्धा अवरुद्ध होऊन जाते. अशावेळेस मग निर्बुद्ध दंतकथा रचून त्या दंतकथा बिनडोक समाजमाध्यमातून इमानेइतबारे(?) सर्वत्र प्रसृत होतील याची तजवीजही केली जाते. जेणेकरून बहुतेक हलक्या मेंदूत या निर्बुद्ध दंतकथा रुजणे सोपे होऊ लागते. आणि अशा विविध लोणकढ्या पसरवून सर्वसामान्यांचा बुद्धिभेद करण्याला वेग येऊ लागतो.
एकंदरीत प्रातिभ-आजाराने ग्रसित संशोधक/विचारवंत अकादमिक-आजार पसरवण्यात सफल होणे, तथ्यात्मक मांडणी व तद्जनित संशोधनासाठी किती भयानक व विघातक ठरू शकते याचे विशेष भान प्रत्येक सच्च्या/यथार्थ संशोधक/विचारवंताने बाळगणे किती परमावश्यक आहे/ठरते, हे स्पष्ट व्हावे.
(माझे हे अल्पबुद्धि-आकलन जर लहान तोंडी मोठा घास घेण्यासारखे किंवा अव्यापारेषु व्यापाराचे द्योतक वाटल्यास, त्याबद्दल मी अर्थातच क्षमाप्रार्थी असून माझे हे अल्पबुद्धि-आकलन यथाविहितरीत्या साधार व सप्रमाण दुरुस्त करण्यात, सच्च्या/यथार्थ संशोधक/विचारवंतांनी मला साह्यभूत ठरावे ही सविनय विनंती आहे.)
¤ (#410)
@ॲड.लखनपाल सिंह कटरे,
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
(04 नोव्हेंबर 2024)
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment