विदर्भ : एक दुर्लक्षित विभाग : प्रति, लोकसत्ता
बोरकन्हार-441902, दि.31.10.2024
===========================
प्रति,
मा.संपादक,
"लोकसत्ता",
सस्नेह सादर नमस्कार.
आज दि.31ऑक्टोबर 2024 च्या 'लोकसत्ता'मधील आमचे मित्रश्रेष्ठ श्रीनिवास खांदेवाले यांचा 'विदर्भ : निवडणुकीतील एक विस्मृत प्रदेश' हा कटूतम तथ्याधारित लेख वाचला. विदर्भाकडे नैसर्गिक सौंदर्य व संपत्ती, जल संपत्ती, विविध धान्य उपजाऊ सुपीक जमीन, वनसंपत्ती, खनिजसंपत्ती, पीकपाणी यांची अक्षरशः लयलूट असूनही विदर्भ उर्वरित महाराष्ट्राच्या तुलनेत मागास/अप्रगत, गरीब व शेतकरी आत्महत्याग्रस्त असा बदहाल का असावा? या प्रश्नाच्या यथोचित उत्तराच्या दृष्टिकोनातून त्यासाठी प्रामुख्याने जबाबदार असलेल्या कारणमीमांसेचे काहीसे संक्षिप्त व त्रोटक तरी स्फोटक असेच विवरण श्री.खांदेवाले यांनी या लेखात केले आहे. वस्तुतः यापेक्षा कितीतरी भयंकर व भयानक अशा, शासनप्रणित अन्यायच नव्हे तर धडधडीत अत्याचाराने सुद्धा आमचा विदर्भ पिडीत आहे. याचा जाब विचारण्यासाठी व वर नमूद विदर्भ-विकासातील अडथळ्यांचे घटक दूर करण्याच्या कामासाठी येथील जनतेने निवडून पाठविलेले लोकप्रतिनिधी, यासाठी जबाबदार ठरून सर्वसाधारण लोकांच्या नजरेत ना-लायक सुद्धा ठरू लागले आहेत.
आमच्या विदर्भातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, साहित्यिक या सर्वच क्षेत्रातील धुरीणांपैकी मोठ्या संख्येतील धुरीण हे विविध क्षेत्रात निवडून आल्यावर/गेल्यावर किंवा त्या-त्या क्षेत्रात येनकेन प्रकारे प्रस्थापित झाल्यावर मुंबईच्या अप्सरेवर पौराणिक विश्वामित्रासारखे लट्टू होऊन जातात, असा येथील सर्वसाधारण लोकांचा स्वानुभवाधारित आरोप आहे.
उदाहरणादाखल सांगायचे झाल्यास, महाराष्ट्राची सीमा पश्चिम-पूर्व अशी मुंबई ते नागपूर येवढीच मर्यादित नसून व आमच्या विदर्भातीलच सुपुत्र मुख्यमंत्री असताना आमचा तथाकथित समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर असाच मान्यता पावतो. त्यावर माझ्यासारख्या सामान्य लोकांनी विविध प्लॅटफॉर्मवर ओरड(?) केल्यावर कसातरी तो समृद्धी महामार्ग गोंदिया या महाराष्ट्राच्या अगदी पूर्वटोकापर्यंत मंजूर होऊ शकला. तो पूर्ण केव्हा होईल, हे मात्र गोसीखुर्दच्या कटूतम अनुभवाच्या आलोकात सांगता येणे शक्य नाही.
उर्वरित महाराष्ट्रातील कोणीही जबरीने विदर्भावर अन्याय केलेला आहे असे सरसकट म्हणता यावयाचे नाही; त्यासाठी आमचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील ढुलमूल, परजीवी व कणाहीन नेतृत्व जबाबदार व कारणीभूत आहे, हे नाकारता येत नाही. मी 1985 दरम्यान कोल्हापुर, सांगली, सातारा, पुणे या भागात अत्यल्पकाळ नोकरीनिमित्त कार्यरत असताना, मी या बाबीचा चांगला अनुभव घेतला आहे.
असा आमचा झाडीपट्टीमय विदर्भ, छत्तीसगढ व तेलंगणा सारखा स्वतंत्र राज्य होण्यासाठी तडपतो/तडफडतो आहे, पण कोणत्याही सक्षम आधाराशिवाय!
¤
¤आपला, एक जुना/नियमित वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे,
निवृत्त डीडीआर, बोरकन्हार, जि.गोंदिया.
(31.10.2024)
~~~~~~~~~~||~~~~~~||~~~~~~~~~~~
Comments
Post a Comment