ललित मासिक : सप्टें 2024 अंकावरील प्रतिक्रिया.

 बोरकन्हार-441902, दि.24.09.2024
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मा.संपादक
'ललित' मासिक 
गिरगाव, मुंबई-400004,
सस्नेह सादर नमस्कार. 
      मी 'ललित' चा जुना वर्गणीदार-वाचक आहे. सप्टेंबर 2024 चा अंक खूप विलंबाने आज दि.24.09.2024 ला प्राप्त झाला. या अंकातील शर्मिला फडके यांचा ग्रंथओळख लेख खूप खूप आवडला. त्या लेखा-संदर्भातील माझ्या विस्मृत स्मृतीच्या अनुषंगाने कळवू इच्छितो की, 
     इंग्रज कालीन मध्य प्रांत आणि वऱ्हाड (इंग्रजी उच्चार सेन्ट्रल प्राॅव्हिन्स एण्ड बेरार/सी.पी.एण्ड बेरार) चा अविभाज्य भाग राहिलेल्या ज्या झाडीपट्टीचा (पूर्व विदर्भ + दक्षिण-पश्चिम मध्यप्रदेश + पूर्व-उत्तर छत्तीसगढ) मी जन्मापासूनचा रहिवासी आहे त्या झाडीपट्टीतील दोन महान विभूती म्हणजे मध्ययुगीन कालावधीतील संस्कृत कवी, नाटककार भवभूति व दुसरे आमच्या गोंदियाच्या शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून अल्पकालिक कारकीर्द सुरू करून जगप्रसिद्ध झालेले समकालीन सुप्रसिद्ध प्रतिभावंत चित्रकार सैयद हैदर रझा. कान्हा-किसली, नागझिरा, नवेगावबांध, पेंच सारख्या राखीव वन्यबहुल प्रदेशाच्या अंतरंगात वसलेली आमची वैशिष्ट्यपूर्ण झाडीपट्टी बहुप्रसवा आहे. अशा या झाडीपट्टीतील मी सुद्धा एक क्षुल्लकसा जीव असून मी जन्मापासूनचा इथला रहिवासी असल्याचा मला सार्थ अभिमान आहे. 
       प्रारंभिक शिक्षकी पेशातून हळूच फारकत(?) घेऊन मी एमपीएससी मार्फत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात राजपत्रित/नागरी सेवेचा एक तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झालो. या नोकरी निमित्ताने (1984-2013) मला कोंकण व खान्देश वगळता उर्वरित जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्यक्ष राहून काम करण्याची संधी मिळाली. त्यामुळेच मला त्या उर्वरित महाराष्ट्रातील ग्रामस्तर ते नागरस्तरावरील जनजीवन, अर्थव्यवहार, सामाजिक व सांस्कृतिक स्तर आणि अर्थातच राजकीय वातावरण यांचा स्वानुभवाधारित अनुभव घेता आला, ही बाब माझ्या जीवनाच्या ताळेबंदातील एक महत्त्वाची संपत्ती/assets बाजूच म्हणावी लागेल. मला या संपत्तीचा अतिरेकी मोह झाला नाही आणि कदाचित त्याच स्वानुभवाधाच्या प्रभावाने मी निवृत्तीनंतर कोणत्याच शहरात व इतरत्र कुठेही वास्तव्याला न राहता झाडीपट्टीतील माझ्या जन्मगावी बोरकन्हार, या लहानशा गावातच पुनर्स्थायी झालो. (संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातही माझ्या बोरकन्हार या गावाच्या नावाचे दुसरे गाव वा शहर नाही, अशा अद्वितीय(?) नावाच्या गावात मी सध्या स्थायिक आहे.)
        हे सगळे पोथीपुराण लिहायला कारणीभूत ठरला तो, "ललित"च्या सप्टेंबर 2024 अंकातील सैयद हैदर रझा यांच्या जीवनावर आधारित "सैयद हैदर रझा : एका प्रतिभावंत चित्रकाराचा प्रवास" (यशोधरा डालमिया, अनुवाद - दीपक घारे) या महाग्रंथाची ओळख करुन देणारा शर्मिला फडके यांचा सुंदर वाचनीय लेख. मी गोंदियात महाविद्यालयीन शिक्षण घेताना (1972-1981) कविता, मुक्त रेखाटने यातही थोडासा इंटरेस्ट घेत असे. एखाद्या प्रोफेसरचा क्लास बोर होत असेल तर मी माझ्या नोटबुकमध्ये काहीतरी सटरफटर मुक्त रेखाटने आखत असे किंवा हिंदी/मराठीत कविता रचत(?) असे. अर्थातच समान रुचीच्या मित्रांबरोबर यावर फालतू वाटतील अशा सटरफटर चर्चाही व्हायच्या. अशाच काही चर्चांतून सैयद हैदर रझा यांच्या गोंदिया येथील शाळेत काही काळ चित्रकला शिक्षक असण्याची बाब कळली. ही गोष्ट आहे/असावी, 1972-1973 दरम्यानची. यावेळेपर्यंत सैयद हैदर रझा एक जगप्रसिद्ध असे प्रतिभावंत चित्रकार म्हणून नावाजले गेले होते. अशी ही माझ्या विस्मृतीत जाऊ पाहणारी स्मृती या ओळख-लेखाच्या वाचनाने पुनर्जागृत झाली व मी ताजातवाना(?) झालो, असेच म्हणावे लागेल. 
       या सुंदर, माहितीपूर्ण ओळख-लेखात रझा यांच्या वडिलांच्या व त्यांच्याही 'थडग्या'च्या गावाचे नाव मांडला असे झाले आहे, ते मांडला नसून मंडला आहे/असावे. मंडला हे मध्यप्रदेशातील एक जिल्हास्तरीय शहर तथा तीर्थक्षेत्र असून ऐतिहासिक गोंड राजांची काहीकाळ राजधानी सुद्धा राहिल्याचे सांगितले जाते. राणी दुर्गावती आणि राणी अवंतीबाई लोधी यांची येथे राजधानी राहिल्याचेही इतिहासकार सांगतात. येथे नर्मदा नदी व स्थानिक बंजर नदीच्या संगमावर हिंदूंच्या मृत्यूपश्चातच्या पिंडदानादि क्रिया सुद्धा केल्या जातात. या शहरात आदिवासी संस्कृतीविषयक एक सुप्रसिद्ध असे संग्रहालय सुद्धा आहे. असो. 
         या निमित्ताने माझ्या विस्मृतीत गडप होऊ पाहणाऱ्या स्मृती जागृत झाल्या, त्याबद्दल मी 'ललित' मासिक व शर्मिला फडके यांचा आभारी आहे. मी दीपक घारे यांचा फॅन-वाचक सुद्धा आहे. मी लवकरच हे पुस्तक मागवतो. 
¤
आपला, एक जुना वर्गणीदार-वाचक,
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
दि.24.09.2024.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन