काही गोड, काही कटू वास्तव
*काही गोड, काही कटू वास्तव*
*************************
तसा तर माझ्या आईच्या संस्कारामुळे मी वयाच्या सहाव्या-सातव्या वर्षापासूनच अवांतर वाचण्यासाठी लालायित असायचो. 1970-71च्या दरम्यान माझ्या वर्गशिक्षिका डाॅ.मंदाकिनी सगदेव यांच्या प्रेरणेने माझी ही सवय आणखी दुणावली/तिनावली, वगैरे. 1972-73 पासून मी वाचलेल्या व मला आवडलेल्या पुस्तकाच्या/लेखाच्या/कवितेच्या रचनाकाराचा संपर्क सूत्र मिळवून त्यांना प्रतिसाद पत्रे लिहू लागलो. काही वर्षांनंतर दूरध्वनी ची सोय उपलब्ध झाल्यावर त्याचाही "त्या" साठी वापर करू लागलो. आता चलभाष यंत्र आणि FB/WA/TWITER/TELEGRAM/INSTAGRAM, etc च्या युगात त्या/त्या साधनांचाही "त्या"साठी वापर करू लागलो. माझी मातृभाषा हिंदी(पोवारी) असणे, मॅट्रीक पर्यंतचे शिक्षण (गणित वगळता) मराठी माध्यमातून होणे, पुढील सर्व शिक्षण इंग्रजी माध्यमातून होणे, त्यामुळे मला तिन्ही माध्यमातील रचनाकार समरसून वाचता/अभ्यासता आले/येतात. (असे मला वाटते!)
या रचनाकारांशी मी वरील साधनांच्या माध्यमातून, माझ्या अल्पबुद्धीच्या प्रतिक्रियेसह, एकतर्फी संपर्कात राहण्याचा यशस्वी/अयशस्वी प्रयत्न करीतच होतो/असतो/आहे. या "प्रक्रियेत" मला आलेले अनुभव आज शेअर करायची इच्छा झालीये.
हिंदी व इंग्रजी च्या, (एखाद दुसरा अपवाद सोडता,) सर्वच रचनाकारांनी माझ्या वरीलप्रमाणे एकतर्फी संपर्काला अतिशय नम्रपणे व वाचकाभिमुख पद्धतीने प्रतिसाद दिला व काही तर आजही देत आहेत. सर्वेश्वरदयाल सक्सेना, रघुवीर सहाय, ज्ञानरंजन, धर्मवीर भारती, कमलेश्वर, नेमीचंद जैन आणि दयानंद वर्मा तर, त्यांच्या माझ्या वयातील अंतर विसरून, अगदी मित्रत्वानेच वागवत असत मला, त्यांच्या प्रतिसादाद्वारे! जय हो! 🙏🙏
पण मराठी रचनाकारांचा अनुभव मात्र खूपच संमिश्र व विचित्र सुद्धा होता/आहे. मागच्या पिढीतील बहुतेक रचनाकार तर पत्रोत्तरासाठी टपालसाहित्य पाठविल्यावरही कधीच "व्यक्त" झाले नाहीत. काही सन्माननीय अपवाद होते/आहेत, पण त्यांची संख्या मोजायला एकाच हाताची बोटे पुरेशी आहेत.
मधल्या पिढीतील मराठी रचनाकार मात्र थोडेसे लिबरल झाल्याचे माझे अनुभव आहेत. या पिढीतील सुमारे 50% तरी रचनाकार सुंदर प्रतिसाद देतात व वाचकांसोबत संवादही साधतात, त्यांच्या प्रतिसादामध्ये अहंभाव नसतो. मी जपून सुद्धा ठेवलेत, काही असे सुंदर प्रतिसाद!
नव्या पिढीतील मात्र सुमारे 95% रचनाकार चांगलेच लिबरल झाल्याचे माझे अनुभव आहेत. नव्या पिढीतील रचनाकारांच्या लिखाणात जशी व्यामिश्रता आणि परीघ "फोडून" अभिव्यक्त होण्याची सफल जिज्ञासा दिसून येते तशीच त्यांच्या संपर्कातही सहजता आढळून येते. वाचकांच्या प्रतिक्रियेंवर हे नव्या पिढीतील रचनाकार चांगला प्रतिसाद देतात, वाचकांना आपला वेळही देतात, त्यामुळे त्यांच्या लिखाणातील ताजेपणा व जीवंतपणा कायम राहतो, असे माझे नम्र निरीक्षण आहे.
एक गोष्ट/बाब मी आवर्जून नमूद करू इच्छितो की, मराठीतील नव्या पिढीतील, विशेषतः कवींच्या कविता हिंदी, इंग्रजी, जर्मन, फ्रेंच आदि भाषेत अनुवादित होऊ शकल्या तर मराठी ला पहिले वहिले नोबेल मिळणेही अशक्य ठरणार नाही. ही अतिशयोक्ती नसून वस्तुस्थिती आहे, हे आवर्जून लक्षात घ्यावे. या नव्या पिढीतील रचनाकारांतही काही थोडेसे अहंभावी, मानभावी असे अपवाद आढळतात, पण त्यांची मोजमाप करण्यासाठीही एकाच हाताची बोटे पुरेशी ठरतील.
अजून एक खंत, एक वाचक म्हणून मला वाटते, ती अशी की, मुंबई, पुणे सारख्या शहरी भागातील रहिवाशी असलेले काही साहित्यिक, विशेषतः काही महिला रचनाकार मात्र मुंबई, पुणे सारख्या बोन्साय "जगा"शिवायच्या इतर निर्बंध व अवाढव्य वाढीच्या निसर्गारण्य "जगा"चा काहीच प्रत्यक्ष अनुभव न घेतल्याने, ग्रामीण भागातील वाचकांना क्षुल्लक, अल्पज्ञ, गावंढळ, कच्चे, वगैरे समजण्याच्या त्यांच्या वाढत्या प्रवृत्ती मुळे अवास्तव, आकाशमहली(?) कल्पनेतच जास्त रमतात व फक्त "तेवढेच" जीवन समजण्याची भूल करून बसतात, असेही माझे नम्र निरीक्षण आहे.
त्यांचे काही लिखाण एखाद्या वाचकाला पुरेसे आवडले/भावले नाही व त्या वाचकाने त्यांना तसे नम्र भाषेतही कळविले, तरी त्या वाचकाला त्यांचा दीर्घद्वेषी रोष सहन/वहन करावा लागतो, चलभाषवर असभ्य "संवाद"ही ऐकावे लागतात. अर्थातच अशा महिला/पुरुष रचनाकारांची संख्या अतिशय नगण्य असली तरी ही बाब एक वाचक म्हणून माझ्यासारख्याला मनस्तापजनक ठरते. असो.
माझे दहा मराठी व एक हिंदी असे अकरा कवितासंग्रह, एक अभंगसंग्रह, एक कथासंग्रह व चार संकीर्ण (पोवारी बोली व झाडीबोलीसह) संग्रह प्रकाशित असले तरी मी स्वतःला सर्वप्रथम वाचकच मानतो/समजतो. (आहेही, मी मुख्यतः वाचकच!) माझी मुख्य भूमिका वाचकाचीच आहे. रचनाकार म्हणून माझी भूमिका (असल्यास) ती 'मुन्नाभाई एमबीबीएस' मधील नवाजुद्दीन सिद्दीकी च्या पाकेटमार(?) च्या भूमिकेपेक्षा मोठी नाही, याची मला नम्र जाणीव आहे. म्हणूनच माझे हे विचार(???) एका वाचकाचे मनोगत या स्वरूपातच घ्यावे. भूल-चूक; देणे-घेणे...... आणि क्षमस्व सुद्धा......!!!
@ॲड.लखनसिंह कटरे, बोरकन्हार(झाडीपट्टी)-441902,
जि.गोंदिया (पुनर्लेखन:-23.08.2018/2024)
¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤¤
Comments
Post a Comment