अनैतिकतेच्या अतिरेकास नैतिकतेच्या अतिरेकाचे प्रत्युत्तर

*"अनैतिकतेच्या अतिरेकास नैतिकतेच्या अतिरेकाचे प्रत्युत्तर"*
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
     .....आपल्या महाराष्ट्रातून मराठीत प्रकाशित होणाऱ्या एका मासिकाचे हे "बोधवाक्य" आहे. हे वाक्य चूक की बरोबर, योग्य की अयोग्य, संयत की असंयत, संवैधानिक की असंवैधानिक, इत्यादी संबंधाने विचार करण्यापूर्वी असे "बोधवाक्य" निर्माणच का झाले, याचा निष्पक्ष, तटस्थ, निरपेक्ष(absolute), स्थितप्रज्ञ, प्रज्ञावंत, विचारवंतांनी सखोल, समर्पक, सम्यक,... विचार करण्याची तातडीची व अनिवार्य अशी वेळ आता येऊन ठेपली आहे, असे माझे अल्पमतीचे आकलन आहे. 
            हिंदू या अनैतिहासिक शब्दाने संबोधित केल्या जाणाऱ्या धर्माच्या रामायण, महाभारत, अन्य पुराणे, इतर वाङ्मय संबंधाने कोणतीही सकारात्मक वा नकारात्मक टिपणी करताना त्या त्या वाङ्मयातील फक्त निवडक भागच विचारात घ्यायचा की मग संपूर्ण प्रतिपादन विचारात घ्यायचे, हा कळीचा मुद्दा ठरतो. रामायणातील शंबुक, धोबी, आदि "दंतकथा(?)" सत्य मानायच्या असतील तर त्यातीलच पुष्पक विमान, हनुमानाने उड्डाण करून संजीवनी बूटीसाठी संपूर्ण पर्वतच उखडून आणणे, सारख्या "दंतकथा(?)" सुद्धा सत्य का मानू नयेत, तसेच महाभारतातील एकलव्याची दंतकथा(?) सत्य मानली तर कर्ण व पाचही पांडवांच्या आणि शंभरही कौरवांच्या जन्माची दंतकथा(?) सुद्धा सत्य का मानू नये, इ., अशी ही तर्कशक्ती(?) कार्य करू लागते. आणि या तर्कशक्ती(?) ला समुचित प्रत्युत्तर देणे विवेकवादालाही मग अशक्य(!) ठरू लागते. 
        अशा या असमंजसजन्य स्थितीने देशाच्या विचाराची व प्रज्ञेची दिशा ठरू लागली, तर विवेकवाद, अंधश्रद्धा निर्मूलन, वैज्ञानिक दृष्टिकोन, समतोल विचारधारा, शांततापूर्ण सहअस्तित्व, इतिहास, पुराणादि ग्रंथ व बखर यातील सत्यान्वेषण, सारख्या बाबी आपले महत्वच नव्हे तर अस्तित्वही गमावून बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
    सबब यावर आरोप/द्वेष/मत्सर/क्रोधादि निरपेक्ष/तटस्थ भावनेने व क्षमतेने सर्वंकष विचार मान्यवर प्रज्ञावंतांनी, विचारवंतांनी करावा/मांडावा, या प्रार्थनेसह इथेच थांबतो.
    (माझ्या या लिखाणातील अर्थाचा अनर्थ होणार नाही, अशी अपेक्षा बाळगतो तथा भूल-चूक क्षमस्व या माझ्या मूलभूत भूमिकेतच राहू इच्छितो.)
@ॲड.लखनसिंह कटरे, 
बोरकन्हार-441902, जि.गोंदिया.
~~~~~~~~(09.07.2018)~~~~~~~

Comments

Popular posts from this blog

एक शोकांतिकाच (?)

ॲड.लखनसिंह कटरे : शब्द, समाज आणि संवेदनांचा संगम (साहित्यिक अभिमत : by ChatGPT)

झाडीपट्टी/झाडीमंडळ आणि तेथील झाडीबोली व पोवारीबोली (कला, साहित्य, संस्कृती व परंपरा) : एक आकलन